YouVersion Logo
Search Icon

होशेय 10

10
1इस्राएल उफाड्याने वाढणारा द्राक्षीचा वेल आहे, त्याला भरपूर फळे येतात; जो जो त्याला जास्त फळे आली तो तो त्याने जास्त वेद्या केल्या; त्याची जमीन जसजशी सुपीक होत गेली तसतसे त्याने अधिक सुरेख मूर्तिस्तंभ उभारले.
2त्यांचे हृदय बेइमान आहे, आता त्यांना प्रायश्‍चित्त मिळालेच पाहिजे; तो त्यांच्या वेद्या मोडून टाकील; तो त्यांचे मूर्तिस्तंभ उद्ध्वस्त करील.
3आता ते निश्‍चये म्हणतील, “आम्हांला राजा नाही, कारण आम्ही परमेश्वराचे भय बाळगले नाही; राजा आमच्या काय कामाचा?”
4ते फक्त वचने बोलतात, खोट्या प्रतिज्ञा करतात, करार करतात, म्हणून शेताच्या तासात विषवल्ली उगवते तसे त्यांच्यासाठी प्रतिफळ उगवेल.
5बेथ-आवेनाच्या वासरांसाठी शोमरोनातले रहिवासी घाबरे होतील; तेथले लोक त्याच्याविषयी शोक करतील, त्याचे पुजारी जे त्याच्या वैभवाबद्दल आनंद करीत असत ते आता त्याकरता विलाप करतील, कारण ते त्यांना अंतरले आहे.
6यारेब राजासाठी भेट म्हणून ते अश्शूरास नेतील; एफ्राईम लज्जेने व्याप्त होईल, इस्राएलास आपल्या स्वतःच्या मसलतीची लाज वाटेल;
7शोमरोन नाश पावला आहे, त्याचा राजा पाण्यावर तरंगणार्‍या ढलप्यासारखा आहे.
8इस्राएलाचे पाप म्हणजे आवेनाची उच्च स्थाने नाश पावतील; त्यांच्या वेद्यांवर काटेकुसळे व काटेरी झुडपे उगवतील; ते पर्वतांना म्हणतील, ‘आम्हांला झाकून टाका, टेकड्यांना म्हणतील, आमच्यावर पडा.’
9हे इस्राएला, गिबात घडलेल्या गोष्टींच्या वेळेपासून तू पाप करीत आला आहेस; तेथेच ते अद्यापि आहेत; गिबात दुष्कर्म्यांबरोबर झालेल्या लढाईत ते सापडले नाहीत.
10मला वाटेल तेव्हा मी त्यांना शासन करीन; त्यांना त्यांच्या दोन्ही पातकांस्तव शासन करण्यास त्यांच्याविरुद्ध राष्ट्रे गोळा होतील.
11एफ्राईम शिकवलेली कालवड आहे, तिला मळणी करण्याची आवड आहे; मी तिच्या सुंदर मानेवर जूं ठेवीन, मी एफ्राइमाला जुंपीन; यहूदा नांगरील; याकोब कोळपील.
12तुम्ही आपणांसाठी नीतिमत्त्वाची पेरणी करा म्हणजे प्रेमाची कापणी कराल; पडीत जमीन नांगरून काढा; कारण परमेश्वराने येऊन तुमच्यावर नीतिमत्त्वाची वृष्टी करावी ह्याकरता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे.
13तुम्ही दुष्टतेच्या पेरणीसाठी नांगरले, अधर्माची कापणी केली, तुम्ही लबाडीचे फळ खाल्ले. कारण तू आपल्या मार्गांवर1 भिस्त ठेवली, आपल्या पराक्रमी वीरसमूहावर भाव ठेवला.
14तुझ्या लोकांमध्ये कलह माजेल; युद्धसमयी शल्मनाने बेथ-आर्बेलास उद्ध्वस्त केले तेव्हा आईला मुलांसह आपटून मारले, तशी सर्व तटबंदीची नगरे नाश पावतील.
15तुमच्या दुष्टतेच्या अघोरतेमुळे बेथेल येथे तुम्हांला असे होईल; प्रभातकाळी इस्राएलाचा राजा नाश पावेल.

Currently Selected:

होशेय 10: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in