YouVersion Logo
Search Icon

इब्री 7

7
मलकीसदेकासारखा प्रमुख याजक प्रभू येशू ख्रिस्त
1‘हा मलकीसदेक, शालेमाचा राजा व परात्पर देवाचा सेवक होता; अब्राहाम जेव्हा राजांना ठार मारून परत आला तेव्हा ह्याने त्याला सामोरे जाऊन आशीर्वाद दिला;’
2व ‘अब्राहामाने’ त्याला ‘सर्व लुटीचा दशमांश’ दिला; तो आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणे एक तर नीतिमत्त्वाचा राजा आणि दुसरे ‘शालेमाचा राजा’ म्हणजे शांतीचा राजा होता.
3त्याची माता-पितरे, वंशावळ, जन्मदिवस अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट (ह्यांचा उल्लेख कोठेही सापडत) नाही, तरी त्याला देवाच्या पुत्रासारखे करण्यात आल्यामुळे तो नित्य याजक राहतो.
4तर आता कुलाधिपती अब्राहाम ह्याने ज्याला लुटीतील उत्तम वस्तूंचा दशमांश दिला तो केवढा मोठा असावा हे ध्यानात घ्या.
5लेवीच्या संतानांपैकी, ज्यांना याजकपण मिळते त्यांना लोकांपासून, म्हणजे अब्राहामाच्या पोटी जन्म घेतलेल्या आपल्या बांधवांपासून, नियमशास्त्राप्रमाणे दशमांश घेण्याची आज्ञा आहे.
6परंतु जो त्यांच्या वंशातला नव्हता त्याने अब्राहामापासून दशमांश घेतला आणि ज्याला वचने मिळाली होती त्याला त्याने आशीर्वाद दिला.
7श्रेष्ठाकडून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो हे निर्विवाद आहे.
8इकडे पाहिले तर, मर्त्य माणसांना दशमांश मिळतात, परंतु तिकडे पाहिले तर, जिवंत आहे अशी ज्याच्याविषयी साक्ष आहे, त्याला मिळाले.
9आणि दशमांश घेणारा लेवी ह्यानेही अब्राहामाच्या द्वारे दशमांश दिलेच असे म्हणता येईल,
10कारण ‘त्याच्या बापाला मलकीसदेक भेटला’ त्या वेळेस तो त्याच्यामध्ये बीजरूपाने होता.
11ह्यावरून ज्या लेवीय याजकपणाच्या संबंधात लोकांना नियमशास्त्र प्राप्त झाले त्यामुळे पूर्णता झाली असती तर ‘मलकीसदेकाच्या संप्रदायाच्या’ निराळ्या ‘याजकाचा’ उद्भव व्हावा व त्याने अहरोनाच्या ‘संप्रदायाप्रमाणे’ म्हटलेले नसावे ह्याचे काय अगत्य राहिले असते?
12कारण याजकपण बदलले म्हणजे नियमशास्त्रही अवश्य बदलते.
13कारण ज्याच्याविषयी हे सांगितले आहे तो निराळ्या वंशातला आहे; त्या वंशातल्या कोणीही वेदीजवळ काम केले नव्हते.
14कारण आपला प्रभू हा यहूदा वंशातून उद्भवला हे उघड आहे. याजकांच्या बाबतीत त्या वंशाविषयी मोशेने काही सांगितलेले नाही.
15,16आणि दैहिक आज्ञेच्या नियमाने नव्हे तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने झालेला असा ‘मलकीसदेकासारखा’ निराळा ‘याजक’ जर उद्भवला आहे, तर ह्यावरून आम्ही सांगितले ते अधिकच स्पष्ट होते.
17त्याच्याविषयी अशी साक्ष आहे, “तू मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुग याजक आहेस.”
18पूर्वीची आज्ञा कमजोर व निरुपयोगी झाल्यामुळे ती रद्द झाली आहे,
19कारण नियमशास्त्राने कशाचीही पूर्णता केली नाही, आणि ज्या आशेच्या द्वारे आपण देवाजवळ जातो, अशा अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली आहे.
20आणि ज्या अर्थी येशू शपथेवाचून याजक झाला नाही,
21(ते तर शपथेवाचून याजक झालेले आहेत; पण ज्याने त्याच्याविषयी [मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे]
“‘तू युगानुयुग याजक आहेस’ अशी शपथ
परमेश्वराने वाहिली आणि ती तो बदलणार नाही,”
असे सांगितले त्याच्या त्या शपथेने हा याजक झाला),
22त्या अर्थी तो अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला आहे.
23ते पुष्कळ याजक होऊन गेले; कारण त्यांना निरंतर याजक राहण्यास मृत्यूचा अडथळा होत असे;
24पण हा ‘युगानुयुग’ राहणारा असल्यामुळे ह्याचे याजकपण अढळ आहे.
25ह्यामुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणार्‍यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे.
26असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते; तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे.
27त्याला त्या प्रमुख याजकांप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याचे अगत्य नाही; कारण त्याने स्वतःला अर्पण केल्याने ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे.
28नियमशास्त्र दुर्बळ अशा माणसांना प्रमुख याजक नेमते; पण नियमशास्त्रानंतरचे शपथ वाहून उच्चारलेले वचन ‘युगानुयुग’ परिपूर्ण केलेल्या ‘पुत्राला’ नेमते.

Currently Selected:

इब्री 7: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in