YouVersion Logo
Search Icon

इब्री 6

6
1तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्‍चात्ताप, देवावरचा विश्वास,
2आणि बाप्तिस्म्यांचे, हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण, हा पाया पुन्हा न घालता, आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करू या.
3देव होऊ देईल तर हे आपण करू.
4कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले,
5आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणार्‍या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली,
6ते जर पतित झाले तर त्यांना पश्‍चात्ताप होईल असे त्यांचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे; कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपुरते नव्याने वधस्तंभावर खिळतात व त्याचा उघड अपमान करतात.
7कारण जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणार्‍यांना उपयोगी अशी वनस्पती उपजवते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो.
8पण जी भूमी काटेकुसळे उपजवते ती नापसंत व शापित होण्याच्या बेतात आलेली आहे; तिचा शेवट जाळण्यात आहे.
9जरी आम्ही असे बोलतो तरी, प्रियजनहो, तुमच्याविषयी आम्हांला ह्यापेक्षा अधिक चांगल्या व तारणाशी निगडित गोष्टींची खातरी आहे.
10कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.
11आमची अशी इच्छा आहे की, तुमच्यापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खातरी करून घेण्याच्या हेतूने तशीच आस्था शेवटपर्यंत व्यक्त करावी;
12म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये, तर विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे.
देवाच्या वचनांनी आशेस स्फूर्ती येते
13देवाने अब्राहामाला वचन दिले तेव्हा त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळे त्याने ‘आपलीच शपथ वाहून’ म्हटले की,
14“मी तुला आशीर्वाद देईनच देईन व तुला बहुगुणित करीनच करीन.”
15त्याने धीर धरला म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला.
16माणसे आपणांपेक्षा मोठ्याची शपथ वाहतात; आणि आपल्या म्हणण्याचे समर्थन करण्यासाठी त्यांच्यामध्ये शपथ सर्व वादाचा शेवट आहे.
17म्हणून आपल्या संकल्पाची अचलता अभिवचनाच्या वतनदारांना विशेषत्वाने दाखवावी ह्या इच्छेने देव शपथेच्या द्वारे मध्ये पडला,
18ह्यासाठी की, जे आपण, स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरता आश्रयाला धावलो, त्या आपणांला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा दोन अचल गोष्टींच्या द्वारे चांगले उत्तेजन मिळावे.
19ती आशा आपल्या जिवासाठी नांगर अशी असून स्थिर व अढळ ‘पडद्याच्या आतल्या भागी पोहचणारी’ आहे.
20‘तेथे मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगाचा’ प्रमुख याजक झालेला येशू अग्रगामी असा आपल्याकरता आत गेला आहे.

Currently Selected:

इब्री 6: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in