YouVersion Logo
Search Icon

उत्पत्ती 25

25
कटूरेपासून झालेली अब्राहामाची संतती
(१ इति. 1:32-33)
1अब्राहामाने दुसरी बायको केली, तिचे नाव कटूरा.
2तिला त्याच्यापासून जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूह हे मुलगे झाले.
3यक्षानास शबा व ददान हे झाले; आणि ददानाचे मुलगे अश्शूरी, लटूशी व लऊमी हे होते.
4मिद्यानाचे मुलगे एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा हे होते. हा सर्व कटूरेचा वंश.
5अब्राहामाने आपले सर्वस्व इसहाकाला दिले.
6पण अब्राहामाच्या उपपत्नी होत्या. त्यांच्या मुलांना त्याने देणग्या देऊन आपल्या हयातीतच आपला मुलगा इसहाक ह्याच्यापासून वेगळे करून पूर्वेकडे पूर्वदेशी लावून दिले.
अब्राहामाचा मृत्यू व त्याचे दफन
7अब्राहामाच्या आयुष्याची वर्षे एकशे पंचाहत्तर होती.
8अब्राहाम पुर्‍या वयाचा चांगला म्हातारा होऊन मरण पावला व आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला.
9मग त्याचे मुलगे इसहाक व इश्माएल ह्यांनी त्याला एफ्रोन बिन सोहर हित्ती ह्याच्या मम्रेसमोरील शेतातल्या मकपेलाच्या गुहेत पुरले.
10हे शेत अब्राहामाने हेथींपासून विकत घेतले होते, आणि तेथेच अब्राहाम व त्याची बायको सारा ह्यांना पुरले.
11अब्राहामाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा इसहाक ह्याला देवाने आशीर्वादित केले; इसहाक हा त्या वेळी लहाय-रोई विहिरीजवळ राहत असे.
इश्माएलाचे वंशज
(१ इति. 1:28-31)
12सारेची मिसरी दासी हागार हिच्यापासून अब्राहामाला इश्माएल नावाचा मुलगा झाला, त्याची वंशावळ ही :
13इश्माएलच्या मुलांची नावे त्यांच्या वंशाप्रमाणे ही होत : नबायोथ हा इश्माएलचा पहिला मुलगा आणि केदार, अदबील, मिबसाम,
14मिश्मा, दुमा, मस्सा,
15हदद, तेमा, यतूर, नापीश व केदमा
16हे इश्माएलचे मुलगे; त्यांच्या गावांवरून व त्यांच्या गोटांवरून त्यांना पडलेली ही नावे. हे आपापल्या वंशाचे बारा सरदार होते.
17इश्माएलच्या आयुष्याची वर्षे एकशे सदतीस झाल्यावर तो मरण पावला व आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला.
18त्याचे वंशज हवीलापासून शूर देशापर्यंत वस्ती करून राहिले; हा देश मिसरासमोर असून अश्शूराकडे जाताना लागतो; ह्याप्रमाणे तो आपल्या भाऊबंदांच्या देखत पूर्वेस जाऊन राहिला.
एसाव व याकोब ह्यांचा जन्म
19अब्राहामाचा मुलगा इसहाक ह्याची ही वंशावळ : अब्राहामाने इसहाकास जन्म दिला.
20इसहाक चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने अरामी लाबान ह्याची बहीण पदन-अरामातील अरामी बथुवेल ह्याची कन्या रिबका ही बायको केली.
21इसहाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली, कारण ती वांझ होती; परमेश्वराने त्याची विनवणी ऐकली आणि त्याची स्त्री रिबका गर्भवती झाली.
22तिच्या उदरात मुले एकमेकांशी झगडू लागली. तेव्हा ती म्हणाली, “हे असे मला काय होत आहे?” हे काय असेल ते परमेश्वराला विचारण्यास ती गेली.
23परमेश्वर तिला म्हणाला,
“तुझ्या गर्भाशयात दोन राष्ट्रे आहेत;
तुझ्या उदरातून दोन वंश निघतील;
एक वंश दुसर्‍या वंशाहून प्रबळ होईल;
आणि वडील धाकट्याची सेवा करील.”
24तिचे दिवस भरून प्रसूतिसमय आला; तेव्हा पाहा, तिच्या उदरात जुळे मुलगे होते.
25पहिला तांबूस वर्णाचा असून त्याचे सर्व अंग केशवस्त्रासारखे होते; त्याचे नाव एसाव ठेवले.
26त्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला; एसावाची टाच त्याच्या हाती होती; आणि त्याचे नाव याकोब (टाच धरणारा किंवा युक्तीने हिरावून घेणारा) असे ठेवले. तिने त्यांना जन्म दिला तेव्हा इसहाक साठ वर्षांचा होता.
एसाव आपला जन्मसिद्ध हक्क विकतो
27ते मुलगे मोठे झाले; एसाव हा रानात फिरणारा हुशार पारधी झाला; तर याकोब हा साधा मनुष्य असून तंबूत राहत असे.
28एसाव हरणाचे मांस आणत असे ते इसहाक खाई म्हणून तो त्याचा आवडता होता, आणि याकोब रिबकेचा आवडता होता.
29एकदा याकोब वरण शिजवत असता एसाव रानातून थकूनभागून आला.
30तेव्हा तो याकोबाला म्हणाला, “ते तांबडे दिसते ना, त्यातील काही मला चटकन खाऊ घाल, मी अगदी गळून गेलो आहे!” ह्यावरून त्याचे नाव अदोम (तांबडा) पडले.
31याकोब त्याला म्हणाला; “पहिल्याने तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला मोबदला दे.”
32एसाव म्हणाला, “हे पाहा, मी मरणोन्मुख झालो आहे; मला आपल्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा काय उपयोग?”
33याकोब म्हणाला, “तर आताच्या आता माझ्याशी शपथ वाहा;” तेव्हा त्याने शपथ वाहून आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबाला मोबदला म्हणून दिला.
34तेव्हा याकोबाने एसावाला भाकर व मसुरीचे वरण दिले; तो खाऊनपिऊन उठला व चालता झाला; ह्याप्रमाणे एसावाने आपला ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ लेखला.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in