YouVersion Logo
Search Icon

उत्पत्ती 26

26
गरार आणि बैर-शेबा येथे इसहाक
1पूर्वी अब्राहामाच्या दिवसांत दुष्काळ पडला होता तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला, तेव्हा इसहाक हा पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख ह्याच्याकडे गरार येथे गेला.
2तेव्हा परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, “खाली मिसरात जाऊ नकोस; मी सांगेन त्या देशात राहा.
3त्या देशात उपरा असा राहा; मी तुझ्याबरोबर असेन, आणि तुला आशीर्वादित करीन; कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन आणि मी तुझा बाप अब्राहाम ह्याच्याशी वाहिलेली शपथ खरी करीन.
4मी आकाशातील तार्‍यांइतकी तुझी संतती वाढवीन, हे सर्व देश तुझ्या संततीला देईन, आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील;
5कारण अब्राहामाने माझा शब्द मानला, माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले.”
6तेव्हा इसहाक गरारात वस्ती करून राहिला.
7तेथल्या लोकांनी त्याच्या बायकोसंबंधाने त्याच्याकडे चौकशी केली; तेव्हा तो म्हणाला, “ही माझी बहीण;” कारण “ही माझी बायको आहे” असे म्हणण्याची त्याला भीती वाटली; तो मनात म्हणाला, “रिबका देखणी आहे. तेव्हा येथले लोक तिच्यासाठी मला जिवे मारतील.”
8तो तेथे बराच काळ राहिल्यावर एके दिवशी पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख ह्याने खिडकीतून पाहिले तर इसहाक आपली बायको रिबका हिच्याशी प्रणयलीला करताना त्याच्या दृष्टीस पडला.
9तेव्हा अबीमलेखाने त्याला बोलावून म्हटले, “खचीत ही तुझी बायको आहे, तर ही माझी बहीण आहे असे तू कसे सांगितलेस?” इसहाक त्याला म्हणाला, “मी विचार केला की, तिच्यामुळे माझ्या जिवाला अपाय होईल.”
10अबीमलेख म्हणाला, “तू आमच्याशी असे का केलेस? बरे झाले, नाहीतर ह्या लोकांपैकी कोणी तुझ्या बायकोपाशी सहज गेला असता आणि तू आम्हांला दोष लावला असतास.”
11मग अबीमलेखाने लोकांना ताकीद दिली की, “जो कोणी ह्या मनुष्याला किंवा ह्याच्या बायकोला हात लावील त्याला खरोखर देहान्त शासन होईल.”
12इसहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी शंभरपट पीक मिळाले, आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले;
13तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पावून मोठा संपन्न झाला.
14तो कळप, खिल्लारे व पुष्कळ दासदासी ह्यांचा धनी झाला; तेव्हा पलिष्टी लोक त्याचा हेवा करू लागले.
15त्याचा बाप अब्राहाम ह्याच्या हयातीत त्याच्या चाकरांनी ज्या विहिरी खणल्या होत्या त्या सर्व पलिष्ट्यांनी मातीने बुजवल्या.
16अबीमलेख इसहाकाला म्हणाला, “तू आमच्यातून निघून जा, कारण तू आमच्याहून फारच सामर्थ्यवान झाला आहेस.”
17तेव्हा इसहाक तेथून निघाला आणि गरार खोर्‍यात डेरा देऊन तेथे राहिला.
18आणि त्याचा बाप अब्राहाम ह्याच्या हयातीत ज्या विहिरी खणल्या होत्या व ज्या त्याच्या मृत्यूनंतर पलिष्ट्यांनी बुजवून टाकल्या होत्या, त्या त्याने पुन्हा उकरल्या, आणि त्याच्या बापाने जी नावे दिली होती तीच त्याने त्यांना पुन्हा दिली.
19इसहाकाचे चाकर त्या खोर्‍यात खणत असता तेथे त्यांना जिवंत पाण्याचा झरा लागला.
20तेव्हा गरार येथील गुराखी इसहाकाच्या गुराख्यांशी भांडले व म्हणाले की, “हे पाणी आमचे आहे.” त्यावरून त्याने त्या विहिरीचे नाव एसेक (कलह) असे ठेवले; कारण त्यांनी त्याच्याशी कलह केला.
21मग त्यांनी दुसरी विहीर खणली, तिच्यावरूनही ते भांडले. म्हणून त्याने तिचे नाव सितना (वैर) असे ठेवले.
22तो तेथून पुढे गेला आणि तेथे त्याने आणखी एक विहीर खणली; तेव्हा तिच्यावरून ते भांडले नाहीत, म्हणून त्याने तिचे नाव रहोबोथ (विस्तार) असे ठेवले, आणि तो म्हणाला, “परमेश्वराने आमच्या भूमीचा विस्तार केला आहे आता ह्या देशात आमची वाढ होईल.”
23तेथून पुढे तो वरती बैर-शेबा येथे गेला.
24त्याच रात्री परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, “तुझा बाप अब्राहाम ह्याचा मी देव आहे; भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी आपला सेवक अब्राहाम ह्याच्यासाठी तुला आशीर्वादित करीन व तुझी संतती बहुगुणित करीन.”
25मग त्याने तेथे एक वेदी बांधून परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली; व तेथे आपला डेरा दिला, तेथे इसहाकाच्या चाकरांनी एक विहीर खणली.
इसहाक आणि अबीमलेख ह्यांच्यातील सलोखा
26त्यानंतर अबीमलेख आपला मित्र अहुज्जाथ व आपला सेनापती पीकोल ह्यांना बरोबर घेऊन गराराहून त्याच्याकडे गेला.
27तेव्हा इसहाक त्याला म्हणाला, “तुम्ही तर माझा द्वेष करता आणि मला तुम्ही आपल्यामधून घालवून दिले; असे असता माझ्याकडे आता का आलात?”
28त्यांनी म्हटले, “परमेश्वर तुमच्याबरोबर आहे हे आम्हांला स्पष्ट दिसून आले आहे; म्हणून आम्ही विचार केला की, आपल्यामध्ये म्हणजे आमच्या-तुमच्यामध्ये आणभाक व्हावी आणि आम्ही तुमच्याशी करार करावा.
29आम्ही तुम्हांला काही उपद्रव केला नाही; आम्ही केवळ तुमचे बरे केले व तुम्हांला शांतीने रवाना केले, तसे तुम्ही आमचे काही वाईट करू नये; आता तुमच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे.”
30तेव्हा त्याने त्यांना मेजवानी दिली आणि त्यांचे खाणेपिणे झाले.
31त्यांनी पहाटेस उठून एकमेकांशी शपथ वाहिली; मग इसहाकाने त्यांना निरोप दिला; आणि ते त्याच्यापासून शांतीने गेले.
32त्याच दिवशी असे झाले की इसहाकाचे चाकर जी विहीर खणत होते तिच्याविषयी त्यांनी वर्तमान आणले की विहिरीस पाणी लागले आहे.
33त्याने तिचे नाव शेबा (शपथ) असे ठेवले, तिच्यावरून त्या नगराचे नाव बैर-शेबा (शपथेची विहीर) असे पडले. ते आजपर्यंत चालू आहे.
34एसाव चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने बैरी हित्ती ह्याची मुलगी यहूदीथ आणि एलोन हित्ती ह्याची मुलगी बासमथ ह्या बायका केल्या;
35त्या इसहाक व रिबका ह्यांच्या मनास दु:खदायक झाल्या.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in