YouVersion Logo
Search Icon

यहेज्केल 9

9
गुन्हेगारांची कत्तल
1मग त्याने मला ऐकू येईलसे मोठ्याने म्हटले, “नगररक्षकहो, तुम्ही सगळे आपली विध्वंसक हत्यारे हाती घेऊन इकडे या.”
2तेव्हा पाहा, उत्तरेकडील वरच्या वेशीने सहा पुरुष आपल्या हाती विध्वंसक हत्यारे घेऊन आले; त्यांच्यामध्ये शुभ्र तागाचे वस्त्र ल्यालेला एक मनुष्य होता; त्याच्या कंबरेनजीक कारकुनाची दऊत होती. ते आत जाऊन पितळी वेदीजवळ उभे राहिले.
3करूबारूढ असलेल्या इस्राएलाच्या देवाचे तेज तेथून निघून मंदिराच्या उंबरठ्यावर आले; आणि कंबरेनजीक कारकुनाची दऊत असलेल्या व शुभ्र तागाचे वस्त्र ल्यालेल्या त्या मनुष्यास त्याने हाक मारली.
4परमेश्वर त्याला म्हणाला, “नगरामधून, यरुशलेमेमधून जाऊन जी माणसे आपल्यात होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत त्यांच्या कपाळावर चिन्ह कर.”
5मला ऐकू येईलसे तो त्या बाकीच्यांना म्हणाला, “त्याच्यामागून नगरात जा व संहार करा; कृपादृष्टी करू नका; गय करू नका,
6वृद्ध, तरुण व कुमारी, मुले व स्त्रिया ह्यांची निखालस कत्तल करा; पण ज्यांच्यावर चिन्ह असेल त्यांना स्पर्श करू नका; माझ्या पवित्रस्थानापासून आरंभ करा.” तेव्हा मंदिरापुढे असलेल्या वडिलांपासून त्यांनी आरंभ केला.
7त्याने त्यांना म्हटले, “मंदिर भ्रष्ट करा; अंगणे वधलेल्यांनी भरून टाका; चला, निघा.” तेव्हा त्यांनी जाऊन नगरात संहार चालवला.
8त्यांनी अशी कत्तल चालवली असता मी सुटलो, तेव्हा मी उपडा पडून ओरडून म्हणालो, “हायहाय! प्रभू परमेश्वरा, तू यरुशलेमेवर आपल्या क्रोधाचा वर्षाव करून अवघ्या अवशिष्ट इस्राएलांचा विध्वंस करशील काय?”
9तेव्हा तो मला म्हणाला, “इस्राएल व यहूदा ह्यांच्या घराण्याचा अधर्म अत्यंत भारी आहे; देश रक्तपाताने भरला आहे; कारण ते म्हणतात, ‘परमेश्वराने देशाचा त्याग केला आहे, परमेश्वर पाहत नाही.’
10मी तर कृपादृष्टी करणार नाही, गय करणार नाही, त्यांच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्या शिरी लादीन.”
11तेव्हा पाहा, कंबरेनजीक कारकुनाची दऊत असलेल्या व शुभ्र तागाचे वस्त्र ल्यालेल्या त्या मनुष्याने परत येऊन कळवले की, “तुझ्या आज्ञेप्रमाणे मी केले आहे.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in