यहेज्केल 8
8
संदेष्ट्याला यरुशलेमेतील अमंगळ कृत्यांचा दृष्टान्त
1सहाव्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या पंचमीस असे झाले की मी आपल्या घरी बसलो होतो व यहूदाचे वडील माझ्यासमोर बसले होते. तेव्हा तेथे प्रभू परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला.
2मी पाहिले तेव्हा एक पुरुष असल्याचा भास मला झाला;1 त्याच्या कंबरेपासून खाली अग्नीचा भास झाला व त्याच्या कंबरेपासून वर तृणमण्याच्या तेजासारखा मला भास झाला.
3त्याने हाताच्या आकृतीचे काही पुढे करून माझ्या डोक्यावरील एक बट धरली आणि आत्म्याने आकाश व पृथ्वी ह्यांच्या दरम्यान मला उचलून नेऊन दिव्यदृष्टीने यरुशलेम येथे उत्तरेस असलेल्या आतल्या अंगणाच्या दरवाजाजवळ आणले; तेथे ईर्ष्येस पेटवणार्या मूर्तीचे आसन होते.
4मग पाहा, मी खोर्यात दृष्टान्त पाहिला होता त्यासारखे इस्राएलाच्या देवाचे तेज येत होते.
5तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, आपले डोळे वर करून उत्तर दिशेकडे पाहा. मी उत्तरेस दृष्टी लावली तर वेदी-वेशीच्या उत्तरेस मंदिराच्या प्रवेशमार्गात ही ईर्ष्येस पेटवणारी मूर्ती होती.”
6तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ते काय करीत आहेत ते पाहतोस ना? मी आपल्या पवित्रस्थानातून दूर निघून जावे म्हणून अशी अमंगळ कृत्ये इस्राएल घराणे येथे करीत आहे; ह्याहूनही अधिक अमंगळ कृत्ये तुझ्या दृष्टीस पडतील.”
7मग त्याने मला अंगणाच्या प्रवेशमार्गात आणले; मी पाहिले तर भिंतीला भोक पडले होते.
8त्याने मला म्हटले, “मानवपुत्रा, भिंत खण”; मी भिंत खणली तर पाहा, एक दार लागले.
9तेव्हा तो मला म्हणाला, “येथे हे लोक कसली दुष्ट व अमंगळ कृत्ये करत आहेत ती पाहा.”
10मी आत जाऊन पाहिले तर सरपटणारे प्राणी, अमंगळ पशू व इस्राएल घराण्याच्या सर्व मूर्ती ह्यांची चित्रे भिंतींवर चोहोकडे काढलेली होती.
11त्यांच्यापुढे इस्राएल घराण्याच्या वडिलांतले सत्तर पुरुष उभे असून त्यांच्यामध्ये याजन्या बिन शाफान हा उभा होता; त्या प्रत्येक माणसाच्या हाती धुपाटणे होते; तेथे धूपाच्या धुराचा दाट ढग वर जात होता.
12तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएल घराण्याचा प्रत्येक वडील आपल्या मूर्तिगृहात अंधारामध्ये काय करीत आहे हे तुला दिसते ना? ते तर म्हणतात की, ‘परमेश्वर आम्हांला पाहत नाही; परमेश्वराने देशाचा त्याग केला आहे.”’
13तो मला आणखी म्हणाला, “ते ह्यांहूनही अधिक अमंगळ कृत्ये करीत आहेत, ती तुला दिसून येतील.”
14तेव्हा त्याने मला परमेश्वराच्या मंदिराच्या उत्तरेस असलेल्या दरवाजाजवळ आणले, तर तेथे स्त्रिया बसून तम्मुजासाठी शोक करत होत्या.
15तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुला हे दिसते ना? ह्याहून अधिक अमंगळ गोष्टी तुझ्या दृष्टीस पडतील.”
16तेव्हा त्याने मला परमेश्वराच्या मंदिराच्या आतल्या अंगणात नेले, तो पाहा, परमेश्वराच्या मंदिराच्या द्वारी देवडीच्या व वेदीच्या दरम्यान सुमारे पंचवीस इसम परमेश्वराच्या मंदिराकडे पाठ करून व पूर्वेकडे तोंड करून उभे होते; ते पूर्व दिशेस सूर्याची उपासना करीत होते.
17तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुला हे दिसते ना? यहूदाचे घराणे येथे ही अमंगळ कृत्ये करत आहे, हे थोडे झाले काय? देश जुलमाच्या कृत्यांनी भरून ते मला पुनःपुन्हा संतापवतात; पाहा, ते आपल्या नाकास डाहळी लावत आहेत.
18ह्यामुळे मी संतापून करायचे ते करीन, मी त्यांच्यावर कृपादृष्टी करणार नाही; त्यांची गय करणार नाही; त्यांनी मोठ्याने माझ्या कानी आरोळी मारली तरी मी त्यांचे ऐकणार नाही.”
Currently Selected:
यहेज्केल 8: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.