निर्गम 22
22
परतफेडीविषयी नियम
1एखाद्या मनुष्याने बैल किंवा मेंढरू चोरून ते कापले किंवा विकून टाकले, तर त्याने बैलाबद्दल पाच बैल आणि मेंढराबद्दल चार मेंढरे द्यावीत.
2चोर घर फोडत असता सापडला व ठार मरेपर्यंत त्याला मार बसला, तर त्याच्या खुनाचा दोष कोणावर यायचा नाही;
3पण तो चोरी करत असता सूर्योदय झाला, तर मारणार्यावर खुनाचा दोष येईल. चोराने नुकसान अवश्य भरून द्यावे; तो कंगाल असला तर चोरीच्या भरपाईसाठी त्याची विक्री करावी.
4चोरलेला बैल, गाढव, मेंढरू वगैरे चोराच्या हाती जिवंत सापडले तर त्याने एकेकाबद्दल दोन-दोन द्यावी.
5कोणी दुसर्याचे शेत अथवा द्राक्षमळा खाववला, म्हणजे आपले जनावर मोकळे सोडले, आणि त्याने दुसर्याचे शेत खाल्ले, तर आपल्या शेतातील आणि आपल्या द्राक्षमळ्यातील उत्तमोत्तम उपज देऊन त्याचे नुकसान त्याने भरून द्यावे.
6आग भडकून काटेकुटे पेटले आणि त्यामुळे धान्याच्या सुड्या, उभे पीक अथवा शेत जळून गेले, तर ज्याने आग पेटवली असेल त्याने नुकसान भरून दिलेच पाहिजे.
7कोणी शेजार्याजवळ पैसा किंवा काही माल ठेवायला दिला आणि त्याच्या घरातून तो चोरीस गेला, तर चोर सापडल्यास त्याच्या दुप्पट मोबदला चोराने द्यावा;
8पण चोर सापडला नाही तर घरधन्याला देवासमोर1 घेऊन जावे, म्हणजे त्याने आपल्या शेजार्याच्या मालमत्तेला स्वत: हात लावला किंवा नाही ह्याचा निर्णय होईल.
9कारण कोणत्याही प्रकारची आगळीक घडली, मग ती बैल, गाढव, मेंढरू, वस्त्र, अथवा कोणतीही गमावलेली वस्तू हिच्यासंबंधीची असो, आणि ती माझी आहे अशी कोणी तक्रार केली, तर दोघांचे प्रकरण देवासमोर1 यावे व ज्याला देव दोषी ठरवील त्याने आपल्या शेजार्याला तिच्याबद्दल दुप्पट बदला द्यावा.
10कोणी आपल्या शेजार्याजवळ गाढव, बैल, मेंढरू अथवा दुसरे कोणतेही जनावर राखणीस ठेवले आणि जर ते मेले अथवा त्याला काही इजा झाली किंवा कोणी हाकून नेताना ते कोणाच्या दृष्टीस पडले नाही,
11तर त्या दोघांमध्ये परमेश्वराची शपथ व्हावी. आपण शेजार्याच्या मालमत्तेला हात लावला नाही असे राखणार्याने म्हटल्यास त्या मालमत्तेच्या मालकाने ते खरे मानावे; मग त्याला भरपाई करून द्यावी लागणार नाही.
12त्याच्यापासून ते खरोखर चोरीस गेले असले, तर त्याने मालकाची भरपाई करावी.
13ते जनावर जर कोणी खरोखर फाडून टाकले असेल, तर त्याने ते पुराव्यादाखल आणावे; म्हणजे त्याला भरपाई करून द्यावी लागणार नाही.
14कोणी आपल्या शेजार्यापासून कोणतेही जनावर मागून घेतले आणि त्याचा धनी बरोबर नसताना त्याला दुखापत झाली अथवा ते मरून गेले तर त्याने त्या धन्याला त्याची भरपाई अवश्य करून दिली पाहिजे.
15पण त्याचा धनी बरोबर असला तर त्याची भरपाई करावी लागणार नाही; ते भाड्याने घेतले असले तर त्याचे नुकसान भाड्यातच आलेले असते.
नैतिक आणि धार्मिक बाबींसंबंधी काही नियम
16वाग्दान न झालेल्या कुमारीला फूस लावून कोणा पुरुषाने तिच्याशी गमन केले, तर त्याने देज देऊन तिच्याशी विवाह करावा;
17पण तिचा बाप त्याला ती द्यायला मुळीच राजी नसला, तर कुमारीबद्दल देज देण्याच्या वहिवाटीप्रमाणे त्या पुरुषाने पैसा तोलून द्यावा.
18चेटकिणीला जिवंत ठेवू नये.
19पशुगमन करणार्याला अवश्य जिवे मारावे.
20परमेश्वराशिवाय दुसर्या दैवतांना बली अर्पण करणार्याचा अगदी संहार करावा.
21उपर्याला छळू नकोस किंवा त्याच्यावर जुलूम करू नकोस, कारण मिसर देशात तुम्हीही उपरे होता.
22कोणा विधवेला किंवा पोरक्याला गांजू नका.
23तुम्ही त्यांना कोणत्याही प्रकारे गांजले आणि त्यांनी माझ्याकडे गार्हाणे केले, तर मी त्यांचे गार्हाणे अवश्य ऐकेन;
24आणि माझा राग भडकून मी तलवारीने तुमचा वध करीन. मग तुमच्या स्त्रिया विधवा होतील आणि तुमची बालके पोरकी होतील.
25तुझ्याजवळ राहणार्या माझ्या लोकांपैकी कोणा कंगालाला तू पैसे उसने दिले, तर तू त्याच्याशी सावकाराप्रमाणे वागू नकोस, व त्याच्यापासून व्याज घेऊ नकोस.
26तू आपल्या शेजार्याचे पांघरूण गहाण ठेवून घेतलेस, तर सूर्य मावळण्यापूर्वी त्याचे त्याला परत दे;
27कारण त्याच्याजवळ ते एकच पांघरूण असून त्याचे अंग झाकायला तेवढेच असणार; ते घेतले तर तो काय पांघरून निजेल? त्याने माझ्याकडे गार्हाणे केले तर मी त्याचे ऐकेन, कारण मी करुणामय आहे.
28तू देवाला1 दूषण लावू नकोस. आपल्या राज्यकर्त्याला शिव्याशाप देऊ नकोस.
29आपल्या शेताचा उपज व आपल्या फळांचे रस मला अर्पण करण्याची हयगय करू नकोस. तुझ्या मुलांपैकी प्रथमजन्मलेला मला द्यावा.
30तसेच बैल व मेंढरे ह्यांचेही प्रथमवत्स मला द्यावेत; सात दिवसपर्यंत त्या वत्साने आपल्या आईबरोबर असावे; आठव्या दिवशी तू तो मला द्यावास.
31तुम्ही माझे पवित्र लोक आहात म्हणून रानात फाडून टाकलेल्या पशूचे मांस तुम्ही खाऊ नये; ते कुत्र्यांना घालावे.
Currently Selected:
निर्गम 22: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.