निर्गम 21
21
गुलामासंबंधी नियम
(अनु. 15:12-18)
1आता जे नियम तू त्यांना लावून द्यावेत ते हेच :
2तू एखादा इब्री गुलाम विकत घेतला तर त्याने सहा वर्षे काम करावे आणि सातव्या वर्षी तू त्याच्याबद्दल काही न घेता त्याला मुक्त होऊन जाऊ द्यावे.
3तो सडा आला असेल तर त्याने सडेच जावे, तो बायको घेऊन आला असेल तर त्याच्या बायकोनेही त्याच्याबरोबर जावे.
4त्याच्या धन्याने त्याला बायको करून दिली असेल व तिला मुलगे किंवा मुली झाल्या असतील, तर ती व तिची मुलेबाळे धन्याची; त्याने एकट्यानेच जावे.
5पण जर तो दास स्पष्टपणे म्हणेल की, माझ्या धन्यावर व माझ्या बायकोमुलांवर मी प्रेम करतो, मी मुक्त होऊन जाणार नाही, 6तर त्याच्या धन्याने त्याला देवासमोर1 आणून दाराजवळ किंवा दाराच्या चौकटीजवळ उभे करावे व आरीने त्याचा कान टोचावा म्हणजे तो आयुष्यभर त्याची चाकरी करील.
7कोणी आपली मुलगी दासी म्हणून विकली तर तिने दासांप्रमाणे निघून जाता कामा नये.
8तिच्या धन्याने तिला आपली बायको करून घेण्याचे ठरवले, आणि पुढे तिच्यावरून त्याची मर्जी उडाली, तर त्याने खंड घेऊन तिला जाऊ द्यावे; त्याने तिला धोका दिल्यामुळे तिला परक्या लोकांना विकून टाकण्याचा त्याला अधिकार नाही.
9तिला आपल्या मुलासाठी ठेवून घ्यायचे असल्यास त्याने तिला मुलीप्रमाणे वागवावे.
10त्याने दुसरी बायको केली तरी हिला अन्नवस्त्र व वैवाहिक व्यवहार ह्यांत काही कमी पडू देऊ नये.
11ह्या तिन्ही गोष्टी तो करीत नसेल तर त्याने काही खंड न घेता तिला मुक्त होऊन जाऊ द्यावे. शारीरिक इजा करण्याच्या गुन्ह्यांसंबंधी नियम 12कोणी एखाद्याला मारले व त्यामुळे तो मेला तर त्याला अवश्य जिवे मारावे.
13एखाद्याला मारून टाकण्याच्या हेतूने कोणी टपून बसला नव्हता; पण देवाने त्याला त्याच्या हाती पडू दिले, तर त्याला पळून जाण्यासाठी मी तुला स्थान नेमून देतो.
14पण जर कोणी जाणूनबुजून आपल्या शेजार्यावर चालून गेला व कपटाने त्याचा घात केला, तर त्याचा वध करण्यासाठी माझ्या वेदीपासूनदेखील त्याला घेऊन जावे.
15कोणी आपल्या बापाला किंवा आईला मारहाण केली तर त्याला अवश्य जिवे मारावे.
16एखाद्या मनुष्याला चोरून नेऊन कोणी त्याला विकील किंवा चोरलेला त्याच्याजवळ सापडेल तर त्याला अवश्य जिवे मारावे.
17कोणी आपल्या बापाला किंवा आईला शिव्याशाप दिले तर त्याला अवश्य जिवे मारावे.
18माणसे भांडत असता एकाने दुसर्याला दगड मारला किंवा ठोसा मारला व त्यामुळे त्याला मृत्यू न येता केवळ अंथरूण धरावे लागले,
19आणि तो उठून काठी घेऊन हिंडूफिरू लागला तर मारणार्याला सोडून द्यावे; मात्र तो घरी बसल्याबद्दल त्याचे झालेले नुकसान मारणार्याने भरून द्यावे आणि त्याला पूर्ण बरे करवावे.
20कोणी आपल्या दासाला किंवा दासीला काठीने मारील आणि मारता मारता तो किंवा ती मरेल तर त्याला अवश्य शिक्षा व्हावी.
21पण तो एकदोन दिवस जगला तर धन्याला दंड करू नये; कारण तो त्याचेच धन होय.
22माणसे आपसात झोंबाझोंबी करीत असताना एखाद्या गर्भवती स्त्रीला मार लागून तिचा गर्भपात झाला, पण तिला दुसरी काही इजा पोहचली नाही, तर त्या स्त्रीचा पती लादेल तो दंड त्याला करावा, आणि न्यायाधीशांच्या ठरावाप्रमाणे2 त्याने तो भरावा.
23पण दुसरी काही इजा झाली तर जिवाबद्दल जीव,
24डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय,
25डागण्याबद्दल डागणे, जखमेबद्दल जखम, फटक्याबद्दल फटका, असा बदला घ्यावा.
26जर कोणी प्रहार करून आपल्या दासाचा किंवा दासीचा डोळा फोडला, तर तो डोळा गेल्यामुळे त्याने त्याला दास्यमुक्त करावे;
27आणि जर कोणी प्रहार करून आपल्या दासाचा किंवा दासीचा दात पाडून टाकला, तर तो दात गेल्यामुळे त्याने त्याला दास्यमुक्त करावे.
धन्याच्या जबाबदारीविषयी नियम
28एखाद्या बैलाने कोणा पुरुषाला किंवा स्त्रीला हुंदडून जिवे मारले, तर त्या बैलाला दगडमार करून अवश्य जिवे मारावे, व त्याचे मांस कोणी खाऊ नये; बैलाच्या धन्याला मात्र सोडून द्यावे.
29तथापि त्या बैलाला आधीचीच हुंदडण्याची सवय असेल आणि त्याच्या धन्याला त्याबद्दल सूचना केली असूनही त्याने त्याला आवरले नाही, आणि मग त्या बैलाने कोणा पुरुषाला किंवा स्त्रीला मारून टाकले, तर त्याला दगडमार करावा आणि त्याच्या धन्यालाही जिवे मारावे.
30त्याच्यावर खंडणी लादल्यास आपला जीव वाचवण्या-साठी त्याने आपल्यावर लादलेली खंडणी देऊन टाकावी.
31बैलाने मुलाला किंवा मुलीला हुंदडून मारले तरीही त्या बाबतीत हाच न्याय लागू करावा.
32जर बैलाने कोणाच्या दासाला किंवा दासीला हुंदडून मारले, तर त्याच्या धन्याने त्यांच्या धन्याला तीस शेकेल रुपे द्यावे आणि त्या बैलाला दगडमार करावा.
33एखाद्या मनुष्याने बुजलेला खड्डा उकरला किंवा नवा खड्डा खणला आणि त्याच्यावर झाकण न ठेवल्यामुळे त्यात कोणाचा बैल किंवा गाढव पडून मेले,
34तर खड्ड्याच्या मालकाने झालेले नुकसान भरून द्यावे; जनावराच्या धन्याला त्याचे मोल द्यावे आणि मेलेले जनावर खड्ड्याच्या मालकाचे व्हावे.
35एखाद्याच्या बैलाने दुसर्याच्या बैलाला दुखापत करून मारून टाकले, तर जिवंत राहिलेला बैल विकून त्याचा पैसा दोन मालकांनी सारखा वाटून घ्यावा; मेलेला बैलही त्यांनी वाटून घ्यावा.
36पण बैलाला आधीचीच हुंदडण्याची सवय आहे हे ठाऊक असूनही धन्याने त्याला आवरले नाही, तर त्याने बैलाबद्दल बैल द्यावा आणि मेलेला बैल त्याचा व्हावा.
Currently Selected:
निर्गम 21: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.