उपदेशक 3
3
प्रत्येक गोष्टीस उचित काळ
1सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो; भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो :
2जन्मसमय व मृत्युसमय; रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय असतो;
3वधण्याचा समय व बरे करण्याचा समय; मोडून टाकण्याचा समय व बांधून काढण्याचा समय असतो;
4रडण्याचा समय व हसण्याचा समय; शोक करण्याचा समय व नृत्य करण्याचा समय असतो;
5धोंडे फेकून देण्याचा समय व धोंडे गोळा करण्याचा समय; आलिंगन देण्याचा समय व आलिंगन देण्याचे आवरून धरण्याचा समय असतो;
6शोधण्याचा समय व गमावण्याचा समय; राखून ठेवण्याचा समय व टाकून देण्याचा समय असतो;
7फाडून टाकण्याचा समय व शिवण्याचा समय; मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो;
8प्रेम करण्याचा समय व द्वेष करण्याचा समय; युद्ध करण्याचा समय व सख्य करण्याचा समय असतो.
9मनुष्य ज्यासाठी कष्ट करतो त्यात त्याला काय लाभ?
10मानवपुत्रांना जे कष्ट देव भोगण्यास लावत असतो ते मी पाहिले आहेत.
11आपापल्या समयी होणारी हरएक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे; त्याने मनुष्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे; तरी देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही.
12मनुष्याने आमरण सुखाने राहावे व हित साधावे यापरते इष्ट त्याला काही नाही हे मला कळून आले आहे.
13तरी प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे हीही देवाची देणगी आहे.
14मला हेदेखील समजून आले की देव जे काही करतो ते सर्वकाळ राहणार; ते अधिक करता येत नाही व उणे करता येत नाही; मनुष्याने त्याचे भय धरावे म्हणून देव असा क्रम चालवतो.
15जे काही होत आहे ते पूर्वीच होऊन चुकले आहे; आणि जे काही होणार आहे ते आधीच होऊन चुकले आहे; आणि देव गत गोष्टी पुन्हा आपल्यापुढे आणतो.
जीवनातील अन्याय
16शिवाय ह्या भूतलावर न्यायाचे स्थान पाहावे तर तेथे दुष्टता आहे; नीतीचे स्थान पाहावे तर तेथे दुराचार आहे.
17मी आपल्या मनात म्हटले, देव नीतिमानाचा आणि दुष्टाचा न्याय करील; कारण हरएक गोष्टीचा व हरएक कामाचा नेमलेला समय आहे.
18मी आपल्या मनात म्हटले, देव हे असे मानवपुत्राकरता करतो, ते ह्या हेतूने की त्यांना कसोटीस लावावे आणि आपण केवळ पशू आहोत हे त्यांना कळून यावे.
19मानवपुत्रावर प्रसंग येतात तसेच पशूंवर येतात; दोघांवरही एकच प्रसंग येतो; हा मरतो तसाच तोही मरतो; त्या सर्वांचा प्राण सारखाच आहे; पशूंपेक्षा मनुष्य काही श्रेष्ठ नाही; कारण सर्वकाही व्यर्थ आहे!
20सर्व एकाच स्थानी जातात; सर्वांची उत्पत्ती मातीपासून आहे व सर्व पुन्हा मातीस मिळतात.
21मानवपुत्राचा प्राण वर जातो आणि पशूचा प्राण खाली जमिनीत जातो की काय हे कोणास ठाऊक?
22ह्यावरून मी असा विचार केला की मनुष्याने आपले व्यवसाय करून सुख मिळवावे, ह्यापरते इष्ट त्याला काही नाही. त्याच्या वाट्यास एवढेच आहे; त्याच्यामागे जे काही होणार ते त्याने पाहावे म्हणून त्याला परत कोण आणील?
Currently Selected:
उपदेशक 3: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.