YouVersion Logo
Search Icon

उपदेशक 4

4
1मग ह्या भूतलावर चालू असलेल्या सर्व जुलमांचे मी पुन्हा निरीक्षण केले; तेव्हा पाहा, गांजलेल्यांचे अश्रू गळत आहेत, पण त्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही; त्यांच्यावर जुलूम करणार्‍यांच्या ठायी बळ आहे, पण गांजलेल्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही.
2म्हणून जे अद्यापि हयात आहेत त्यांच्यापेक्षा जे मरून गेले आहेत ते अधिक सुखी असे मी म्हटले.
3जो अजून उत्पन्न झाला नाही, ज्याने ह्या भूतलावर घडणारी दुष्कर्मे पाहिली नाहीत, त्याची दशा ह्या दोघांपेक्षाही बरी.
4मग मी सर्व उद्योग व कारागिरी पाहिली; ही सर्व चढाओढींमुळे होतात. हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.
5मूर्ख हात जोडून बसतो व आपल्याच देहाचा नाश करून घेतो.1
6कष्टाने व वायफळ उद्योगाने भरलेल्या दोन मुठींपेक्षा शांतीने भरलेली एक मूठ पुरवली.
7मग मी पुन्हा भूतलावरील व्यर्थ गोष्टी पाहिल्या :
8कोणी एकटाच असून त्याला दुसरा कोणी नाही; त्याला पुत्र किंवा बंधू नाही; तरी त्याच्या कष्टाला अंत नाही, व धनाने त्याच्या नेत्रांची तृप्ती होत नाही. तो म्हणतो, “मी हे श्रम करतो व माझ्या जिवाचे सुख दवडतो, हे कोणासाठी?” हेही व्यर्थ, कष्टमय होय.
9एकट्यापेक्षा दोघे बरे; कारण त्यांच्या श्रमांचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते.
10त्यांच्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल; पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते; त्याची दुर्दशा होते.
11दोघे एकत्र निजले तर त्यांना ऊब येते; एकट्याला ऊब कशी येईल?
12जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल; तीनपदरी दोरी सहसा तुटत नाही.
13अधिकाधिक बोध ग्रहण करण्याचे कळत नाही अशा वृद्ध पण मूढ राजापेक्षा गरीब पण शहाणा तरुण बरा.
14कारण हा कारागृहातून निघून राजा झाला; पण तो आपल्या राज्यात जरी जन्मला तरी कंगाल झाला.
15हा जो दुसरा तरुण पहिल्याच्या जागी आला त्याच्या पक्षाचे भूतलावरील सगळे लोक होते असे माझ्या नजरेस आले.
16ज्यांचा तो अधिपती झाला ते अगणित होते; तरी पुढील काळातील लोक त्याच्याविषयी आनंद पावणार नाहीत. निःसंशय हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in