YouVersion Logo
Search Icon

अनुवाद 5

5
दहा आज्ञा
(निर्ग. 20:1-17)
1मोशेने सर्व इस्राएल लोकांना बोलावून सांगितले : “अहो इस्राएल लोकहो, जे विधी व नियम आज मी तुम्हांला ऐकवत आहे ते ऐका; तुम्ही ते शिका आणि काळजीपूर्वक पाळा.
2आपला देव परमेश्वर ह्याने होरेबात आपल्याबरोबर करार केला.
3हा करार परमेश्वराने आपल्या पूर्वजांबरोबर केला नाही, तर आज जे आपण सर्व जिवंत आहोत त्या आपल्याबरोबर केला आहे.
4परमेश्वराने त्या पर्वतावर अग्नीमधून तुमच्याशी तोंडोतोंड भाषण केले;
5त्या अग्नीच्या भीतीने तुम्ही पर्वतावर चढला नाहीत, परमेश्वराचे वचन तुम्हांला प्रकट करावे म्हणून त्या प्रसंगी मी परमेश्वराच्या व तुमच्यामध्ये उभा राहिलो; तेव्हा तो म्हणाला, 6‘ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे.
7माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत.
8तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस.
9त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची सेवा करू नकोस, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे; जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना तिसर्‍या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करतो;
10आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो.
11तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव व्यर्थ घेऊ नकोस, कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही.
12तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळण्याकडे लक्ष असू दे.
13सहा दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर;
14पण सातवा दिवस तुझा देव परमेश्वर ह्याचा शब्बाथ आहे; म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नकोस; तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझा बैल, तुझे गाढव, तुझा कोणताही पशू अथवा तुझ्या वेशीच्या आत असलेला उपरा ह्यानेही करू नये; म्हणजे तुझ्याप्रमाणे तुझ्या दासदासींनाही विसावा मिळेल.
15तू मिसर देशात दास होतास आणि तेथून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला पराक्रमी बाहूंनी व उगारलेल्या हाताने बाहेर आणले ह्याची आठवण ठेव; म्हणूनच तुझा देव परमेश्वर ह्याने तुला शब्बाथ दिवस पाळण्याची आज्ञा केली आहे.
16तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे आपल्या पित्याचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील आणि तुझे कल्याण होईल.
17खून करू नकोस.
18व्यभिचार करू नकोस.
19चोरी करू नकोस.
20आपल्या शेजार्‍याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नकोस.
21आपल्या शेजार्‍याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नकोस; आपल्या शेजार्‍याच्या घराचा लोभ धरू नकोस; त्याचे शेत, दास, दासी, बैल, गाढव अथवा आपल्या शेजार्‍याची कोणतीही वस्तू ह्यांचा लोभ धरू नकोस.’
22ही वचने परमेश्वराने त्या पर्वतावर अग्नी, मेघ व निबिड अंधकार ह्यांमधून तुमच्या सर्व मंडळीला मोठ्या आवाजात सांगितली; अधिक सांगितली नाहीत. त्याने दोन दगडी पाट्यांवर ती लिहून माझ्या हाती दिली.
लोकांना वाटणारी भीती
(निर्ग. 20:18-21)
23पर्वत अग्नीने जळत असता काळोखातून निघत असलेला त्याचा शब्द तुम्ही ऐकला तेव्हा तुम्ही म्हणजे तुमच्या वंशांचे सर्व प्रमुख व तुमचे वडील जन माझ्याजवळ आले;
24तेव्हा तुम्ही म्हणालात, ‘पाहा, आपला देव परमेश्वर ह्याने आम्हांला आपले तेज व महिमा प्रकट केला आहे, आणि अग्नीमधून निघत असलेला त्याचा शब्द आम्ही ऐकला आहे. आज आम्हांला हे दिसले की, देव मानवाशी बोलत असतानाही मानव जिवंत राहतो.
25तर आता आम्ही प्राणाला का मुकावे? कारण हा प्रचंड अग्नी आम्हांला भस्म करील, आम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी आणखी ऐकत राहू तर मरून जाऊ.
26अग्नीमधून निघणारी जिवंत देवाची वाणी ऐकून आम्ही जसे जिवंत राहिलो, तसा प्राणिमात्रांपैकी दुसरा कोण जिवंत राहिला आहे?
27म्हणून तू जवळ जा आणि आपला देव परमेश्वर जे काही बोलेल ते ऐकून घे; आणि मग आपला देव परमेश्वर तुला जे काही सांगेल ते आम्हांला सांग म्हणजे आम्ही ते ऐकून त्याप्रमाणे वागू.’
28तुम्ही मला असे सांगत असताना परमेश्वराने तुमचे बोलणे ऐकले; आणि परमेश्वर मला म्हणाला, ‘ह्या लोकांचे तुझ्याशी झालेले बोलणे मी ऐकले आहे; त्यांनी जे काही म्हटले ते बरोबर म्हटले.
29त्यांचे मन नेहमी असेच राहिले म्हणजे त्यांनी माझे भय धरून माझ्या सर्व आज्ञांचे पालन केले तर किती बरे होईल! तशाने त्यांचे व त्यांच्या संततीचे निरंतर कल्याण होईल.
30त्यांना जाऊन सांग की, तुम्ही आपापल्या डेर्‍यांकडे परत जा;
31पण तू येथे माझ्याजवळ उभा राहा आणि जी आज्ञा आणि जे विधी व नियम तू त्यांना शिकवावेत, ते सर्व मी तुला सांगेन, म्हणजे जो देश मी त्यांना वतन म्हणून देत आहे तेथे त्यांनी ते पाळावेत.’
32म्हणून तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा काळजीपूर्वक पाळा; उजवीडावीकडे वळू नका.
33ज्या मार्गाविषयी तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला आज्ञा केली आहे त्याच मार्गाने तुम्ही चाला म्हणजे तुम्ही जिवंत राहाल व तुमचे कल्याण होईल; आणि जो देश तुम्ही वतन करून घेणार आहात त्यात तुम्ही चिरकाळ राहाल.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in