अनुवाद 4
4
लोकांनी आज्ञाधारक असावे असा मोशेचा उपदेश
1आता, अहो इस्राएल लोकहो, जे विधी व नियम मी तुम्हांला शिकवत आहे ते पाळावेत म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हांला जो देश देत आहे त्यात प्रवेश करून तो वतन करून घ्याल.
2जी आज्ञा मी तुम्हांला देत आहे तिच्यात काही अधिकउणे करू नका, अशासाठी की, तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या ज्या आज्ञा मी तुम्हांला देत आहे त्या तुम्ही पाळाव्यात.
3बआल-पौराच्या प्रकरणी परमेश्वराने काय केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे; जे लोक बआल-पौरांच्या नादी लागले त्या सर्वांना तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्यामधून नष्ट केले.
4पण जे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला चिकटून राहिलात ते सगळे आज जिवंत आहात.
5पाहा, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही जात आहात त्यात पाळण्यासाठी आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हांला विधी व नियम शिकवले आहेत त्याप्रमाणे तुम्ही चालावे.
6तुम्ही ते काळजीपूर्वक पाळावेत; कारण त्यामुळे देशोदेशीच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ व समंजस असे दिसाल; त्या सर्व विधींसंबंधी ऐकून ते म्हणतील की, ‘हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे.’
7कारण आमचा देव परमेश्वर ह्याचा आम्ही धावा करतो तेव्हा तो आमच्याजवळ असतो. ह्याच्यासारखे देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? 8हे सारे नियमशास्त्र मी आज तुम्हांला देत आहे. त्यातल्यासारखे यथार्थ विधी व नियम असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे?
होरेब येथे घडलेल्या घटनेचे पुन:स्मरण
9मात्र स्वतःविषयी सावधगिरी बाळग आणि स्वत:ला फार जप, नाहीतर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील; तू आपल्या पुत्रपौत्रांना त्यांची माहिती द्यावी;
10ज्या दिवशी तू होरेबाजवळ आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर उभा राहिलास त्या दिवशी परमेश्वर मला म्हणाला की, ‘ते इहलोकी असेपर्यंत त्यांनी माझे भय बाळगायला शिकावे व आपल्या मुलाबाळांनाही तसे शिकवावे म्हणून ह्या लोकांना माझ्याजवळ जमव म्हणजे मी आपली वचने त्यांना ऐकवीन.’
11त्या दिवशी तुम्ही पुढे येऊन त्या पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिलात, तेव्हा पर्वत पेटला होता आणि त्याच्या ज्वाला गगनमंडळ भेदून चालल्या होत्या आणि त्याच्यावर काळोख, मेघ व निबिड अंधकार पसरला होता.
12तेव्हा परमेश्वराने त्या अग्नीमधून तुमच्याशी भाषण केले; तुम्ही बोलण्याचा आवाज ऐकला पण काही आकृती पाहिली नाही; वाणी मात्र ऐकली.
13त्याने तुम्हांला आपला करार विदित करून तो पाळण्याची आज्ञा केली; हा करार म्हणजे त्या दहा आज्ञा होत; त्या त्याने दोन दगडी पाट्यांवर लिहिल्या.
14तुम्ही पैलतीरी जाऊन ज्या देशाचे वतन मिळवणार आहात त्यात तुम्ही त्या पाळाव्यात म्हणून परमेश्वराने त्या वेळेस तुम्हांला विधी व नियम शिकवण्याची मला आज्ञा केली.
मूर्तिपूजेविरुद्ध ताकीद
15म्हणून तुम्ही अतिशय सावधगिरी बाळगा, कारण परमेश्वराने तुमच्याशी होरेब पर्वतावर अग्नीतून भाषण केले त्या दिवशी तुम्ही काही आकृती पाहिली नाही,
16ह्यासाठी की, तुम्ही बिघडून जाऊन एखाद्या पुरुषाची अथवा स्त्रीची,
17पृथ्वीवर संचार करणार्या एखाद्या पशूची किंवा अंतराळात उडणार्या एखाद्या पक्ष्याची,
18भूमीवर रांगणार्या एखाद्या जंतूची अथवा पृथ्वीखालच्या जलामध्ये राहणार्या एखाद्या माशाची प्रतिमा करू नये;
19अथवा आकाशाकडे नजर लावून सूर्य, चंद्र, तारे अर्थात आकाशातील तारांगण पाहून बहकून जाऊन त्यांना दंडवत घालू नये व त्यांची पूजा करू नये; हे तुमचा देव परमेश्वर ह्याने आकाशाखालील सर्व लोकांना देऊन ठेवले आहेत.
20तुम्ही आज आहात त्याप्रमाणे परमेश्वराची खास1 प्रजा व्हावे म्हणून त्याने तुम्हांला लोखंडी भट्टीतून, म्हणजे मिसर देशातून बाहेर काढले आहे.
21मग तुमच्यामुळे परमेश्वराने माझ्यावर रागावून अशी शपथ वाहिली की, तुला यार्देनेच्या पलीकडे जायचे नाही, व जो उत्तम देश इस्राएलाचा देव परमेश्वर त्यांना वतन म्हणून देत आहे त्यात तू प्रवेश करणार नाहीस;
22म्हणून मला ह्या देशात मरणे भाग आहे; मला यार्देनेच्या पलीकडे जायचे नाही; पण तुम्ही पार जाऊन तो उत्तम देश ताब्यात घ्या.
23तुम्ही स्वत:विषयी सावधगिरी बाळगा; नाहीतर तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्याशी केलेला करार विसरून तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला मनाई केलेल्या एखाद्या वस्तूच्या आकाराची कोरीव मूर्ती कराल.
24कारण तुझा देव परमेश्वर हा भस्म करणारा अग्नी आहे; तो ईर्ष्यावान देव आहे.
25तुम्हांला पुत्रपौत्र होऊन त्या देशात तुम्ही दीर्घकाळ राहिल्यावर जर तुम्ही बिघडून कोणत्याही वस्तूची कोरीव मूर्ती केली आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे वाईट ते करून त्याला चीड आणली,
26तर आज आकाश व पृथ्वी ह्यांना तुमच्याविरुद्ध साक्षीला ठेवून मी सांगतो की, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही यार्देन नदी ओलांडून जात आहात तेथून तुमचा लवकरच अगदी नायनाट होईल; तेथे तुम्ही फार दिवस राहणार नाहीत, पण तुमचा समूळ नाश होईल.
27परमेश्वर तुम्हांला इतर राष्ट्रांत विखरील; ज्या ज्या राष्ट्रात परमेश्वर तुम्हांला घालवील तेथे तुमची संख्या अल्प राहील.
28तेथे तुम्ही मनुष्यांच्या हातांनी घडलेले काष्ठ-पाषाणादिकांचे देव, जे पाहत नाहीत, ऐकत नाहीत, खात नाहीत व हुंगत नाहीत अशांची सेवा कराल.
29पण तेथून जरी तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला शरण गेलात आणि पूर्ण जिवेभावे त्याच्या शोधाला लागलात तर तो तुम्हांला पावेल.
30तू संकटात पडलास आणि ही सर्व अरिष्टे तुझ्यावर आली म्हणजे शेवटी तू आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे वळशील आणि त्याची वाणी ऐकशील;
31कारण तुझा देव परमेश्वर हा दयाळू देव आहे; तो तुला अंतर देणार नाही, तुझा नाश करणार नाही आणि तुझ्या पूर्वजांशी त्याने शपथपूर्वक केलेला करार तो विसरणार नाही.
32देवाने पृथ्वीवर मानवाला निर्माण केले तेव्हापासून तुझ्या जन्मापर्यंत होऊन गेलेल्या काळात अशी मोठी गोष्ट कधी घडली होती किंवा ऐकण्यात आली होती काय, हे आकाशाच्या एका सीमेपासून दुसर्या सीमेपर्यंत विचारून पाहा.
33तुम्ही ऐकले त्याप्रमाणे देवाच्या वाणीचे शब्द ऐकूनही दुसरे कोणी लोक जिवंत राहिले आहेत काय?
34त्याप्रमाणेच तुमचा देव परमेश्वर ह्याने मिसर देशातून तुमच्यासाठी तुमच्यादेखत संकटे, चिन्हे, चमत्कार, युद्धे, पराक्रमी बाहू आणि उगारलेला हात ह्यांच्या योगे भयप्रद कृत्ये केली तशी कृत्ये करून देवाने आपल्यासाठी एखादे राष्ट्र इतर राष्ट्रांमधून काढून घेण्याचा कधी प्रयत्न केला काय?
35परमेश्वरच देव आहे व त्याच्याशिवाय दुसरा नाही असे तुला कळावे म्हणून हे तुला दाखवण्यात आले.
36तुला शिक्षण द्यावे म्हणून आकाशातून त्याने आपली वाणी तुला ऐकवली आणि पृथ्वीवर त्याने तुला आपला महाअग्नी दाखवला आणि अग्नीमधून निघालेले त्याचे शब्द तू ऐकलेस.
37त्याने तुझ्या पूर्वजांवर प्रीती केली म्हणून त्यांच्यामागून त्यांच्या संतानाला त्याने निवडून घेतले आणि स्वतः आपल्या महासामर्थ्याने त्याने तुला मिसर देशातून बाहेर आणले.
38तुझ्यापेक्षा महान व सामर्थ्यवान राष्ट्रांना तुझ्यापुढून घालवून देऊन तुला त्यांच्या देशात न्यावे आणि त्यांची भूमी तुला वतन करून द्यावी, म्हणून त्याने तसे केले आहे; आज हे तुम्ही पाहतच आहात.
39म्हणून आज हे समजून घ्या आणि ध्यानात ठेवा की, वर आकाशात व खाली पृथ्वीवर परमेश्वरच देव आहे, दुसरा कोणी नाही.
40तुझे व तुझ्यामागून तुझ्या वंशजांचे बरे व्हावे, आणि तुझा देव परमेश्वर जो देश तुला निरंतरचा देत आहे त्यात तू चिरकाळ राहावेस म्हणून आज मी तुला देत असलेले विधी आणि आज्ञा ह्यांचे पालन कर.”
यार्देनेच्या पूर्वेस असलेली शरणपुरे
41मग मोशेने यार्देनेच्या पलीकडे पूर्वेस तीन नगरे नेमली,
42ह्यासाठी की, एखाद्याने चुकून म्हणजे पूर्वी काही वैर नसताना आपल्या शेजार्याला ठार मारले तर त्याने ह्यांतल्या एका नगरात पळून जाऊन आपला जीव वाचवावा.
43ती नगरे ही : रऊबेन्यांचे रानातील माळावरचे बेसेर, गाद्यांचे गिलादातील रामोथ व मनश्शाचे बाशानातील गोलान.
परमेश्वराने घालून दिलेल्या नियमांच्या कथनाची प्रस्तावना
44मोशेने इस्राएल लोकांना जे नियमशास्त्र नेमून दिले ते हेच;
45इस्राएल लोक मिसर देशातून निघाले तेव्हा त्यांना मोशेने सांगितलेले निर्बंध, विधी व नियम हेच;
46मिसर देशातून बाहेर आल्यावर मोशे आणि इस्राएल लोकांनी जो हेशबोननिवासी अमोर्यांचा राजा सीहोन ह्याला पराजित केले, त्याच्या देशात यार्देनेच्या पूर्वेस बेथपौराच्या समोरील खोर्यात हे सांगण्यात आले;
47आणि त्याचा देश व बाशानाचा राजा ओग ह्याचा देश त्यांनी काबीज केला; हे दोघे अमोर्यांचे राजे यार्देनेच्या पूर्वेस राहत असत.
48त्यांचा देश म्हणजे आर्णोन खोर्याच्या सीमेवरील अरोएर नगरापासून सिर्योन म्हणजे हर्मोन पर्वतापर्यंत,
49आणि पिसगाच्या उतरणीखाली अराबाच्या समुद्रा-पर्यंत यार्देनेच्या पूर्वेकडील सर्व अराबा.
Currently Selected:
अनुवाद 4: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.