YouVersion Logo
Search Icon

अनुवाद 33

33
इस्राएल लोकांच्या घराण्यांना मोशे आशीर्वाद देतो
1देवाचा भक्त मोशे ह्याने आपल्या मरणापूर्वी इस्राएल लोकांना आशीर्वाद दिला तो असा :
2तो म्हणाला, “परमेश्वर सीनायहून आला, सेईरावरून आमच्यावर1 उदय पावला; पारान पर्वतावरून तो प्रकटला, लक्षावधी पवित्रांच्या मधून तो आला, त्याच्या उजव्या हातापासून अग्निज्वाला निघाली.
3तो आपल्या लोकांवर2 प्रीती करतो; त्याचे सर्व पवित्र जन तुझ्या हाती आहेत; ते तुझ्या पायाशी बसले आहेत; त्यांनी तुझी वचने ग्रहण केली आहेत.
4मोशेने आम्हांला नियमशास्त्र नेमून दिले, ते याकोबाच्या मंडळीचे वतन होय.
5लोकांचे प्रमुख एकत्र जमले, इस्राएलाचे वंश एकवटले, तेव्हा तो यशुरूनामध्ये राजा झाला.
6‘रऊबेनाचे लोक मोजके असले तरी तो जिवंत राहो, मृत्यू न पावो.’
7यहूदाला हा आशीर्वाद : तो म्हणाला, ‘हे परमेश्वरा, यहूदाचे म्हणणे ऐक, त्याला त्याच्या लोकांमध्ये आण. तो आपल्या हातांनी झगडला; म्हणून त्याच्या शत्रूंविरुद्ध त्याला साहाय्य हो.’
8मग लेवीविषयी तो म्हणाला, ‘तुझे थुम्मीम व उरीम तुझ्या भक्ताजवळ राहोत;’ त्याला तू मस्सा येथे पारखले, मरीबाच्या झर्‍याजवळ तू त्याच्याशी झुंजलास;
9तो आपल्या मातापित्याविषयी म्हणाला, मी त्यांना ओळखत नाही; त्याने आपल्या भाऊबंदांना मानले नाही, व स्वत:च्या मुलांची ओळख ठेवली नाही. कारण त्यांनी तुझा शब्द पाळला आहे आणि ते तुझा करार राखतात.
10ते याकोबाला तुझे नियम व इस्राएलाला तुझे नियमशास्त्र शिकवतील; ते तुला धूपाचा सुवास अर्पण करतील, तुझ्या वेदीवर नि:शेष होमबली अर्पण करतील.
11हे परमेश्वरा, त्याच्या मालमत्तेला बरकत दे, त्याच्या हातचे काम मान्य करून घे; त्याचे विरोधक आणि द्वेष्टे ह्यांची कंबर अशी मोड की, ते पुन्हा उठणार नाहीत.’
12बन्यामिनाविषयी तो म्हणाला, ‘परमेश्वराचा हा प्रियजन त्याच्याजवळ सुरक्षित राहील; तो दिवसभर त्याच्यावर छाया करील, तो त्याच्या पाठीशी राहील.’
13योसेफाविषयी तो म्हणाला, ‘परमेश्वर त्याच्या देशाला आशीर्वाद देवो, आकाशातल्या अमूल्य वस्तू, दहिवर आणि खाली पसरलेले जलाशय,
14सूर्यामुळे मिळणारे मोलवान पदार्थ, चंद्रकलांमुळे मिळणारे बहुमोल पदार्थ,
15पुरातन पर्वतांतील उत्तम वस्तू, सनातन टेकड्यांवरील अमूल्य जिन्नस,
16आणि पृथ्वी व तिच्या भांडारातील अमूल्य वस्तू ह्यांचा आशीर्वाद, आणि जो झुडपात राहत होता त्याची प्रसन्नता, योसेफाच्या मस्तकावर येवो; जो आपल्या भाऊबंदांत प्रमुख होता, त्याच्या मस्तकावर हे सर्व येवो.
17प्रथमजन्मलेल्या गोर्‍ह्यासारखा त्याचा प्रताप आहे; त्याची शिंगे रानबैलाच्या शिंगांप्रमाणे होत; त्यांनी तो सर्व राष्ट्रांना पृथ्वीच्या दिगंतापर्यंत हुंदडील; असे एफ्राइमाचे लाखो व मनश्शेचे हजारो आहेत.
18जबुलूनाविषयी तो म्हणाला, ‘हे जबुलूना, तू बाहेर जाताना आनंद कर; हे इस्साखारा, तू आपल्या डेर्‍यात आनंद कर.
19ते राष्ट्रांना डोंगरावर बोलावतील; तेथे ते योग्य यज्ञ करतील, कारण ते समुद्रांतले धन आणि वाळूतले गुप्तनिधी काढून घेतील.’
20गादाविषयी तो म्हणाला, ‘गादाचा विस्तार करणारा तो धन्य; तो सिंहासारखा बसतो, तो बाहू व मस्तक फोडतो.
21त्याने आपल्यासाठी उत्तम भाग निवडून घेतला; सरदाराला योग्य असा वाटा तेथे राखून ठेवला होता; तो प्रमुखांबरोबर आला व इस्राएलासह परमेश्वराचे न्याय व त्याचे नियम त्याने अंमलात आणले.’
22दानाविषयी तो म्हणाला, दान हा सिंहाचा छावा आहे; त्याने बाशानावरून उडी मारली आहे.
23नफतालीविषयी तो म्हणाला, ‘हे नफताली, तू परमेश्वराच्या प्रसादाने तृप्त आहेस, व त्याच्या आशीर्वादाने परिपूर्ण आहेस; तू पश्‍चिम व दक्षिण भाग ह्यांचे वतन करून घे.’
24आशेराविषयी तो म्हणाला, ‘सर्व पुत्रांत आशेर आशीर्वादित होवो; तो आपल्या भावांना प्रिय होवो, तो आपला पाय तेलात बुडवो.
25तुझे अडसर लोखंडाचे व पितळेचे असोत; तुझे सामर्थ्य आयुष्यभर कायम राहो.’
26हे यशुरूना, देवासमान कोणी नाही, तो तुझ्या साहाय्यासाठी मेघमंडळावर आरूढ होऊन आपल्या प्रतापाने आकाशमार्गाने धाव घेतो.
27अनादी देव तुझा आश्रय आहे, सनातन बाहूंचा तुला आधार आहे; त्याने शत्रूला तुझ्यापुढून हाकून दिले व म्हटले, त्याचा नाश कर.
28इस्राएल सुरक्षित राहतो; धान्य व द्राक्षारस ह्यांनी समृद्ध अशा प्रदेशी याकोबाचा झरा अलग उफाळत आहे, आणि त्याच्यावरचे आकाश दहिवर वर्षते.
29हे इस्राएला, तू धन्य आहेस! परमेश्वराने उद्धरलेल्या राष्ट्रा, तुझ्यासमान कोण आहे? तो तुझ्या साहाय्याची ढाल आहे, तुझ्या प्रतापाची तलवार आहे. ह्यामुळे तुझे शत्रू तुला शरण येतील, तू त्यांची उच्च स्थाने पादाक्रांत करशील.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in