YouVersion Logo
Search Icon

अनुवाद 32

32
1“अहो आकाशांनो, लक्ष द्या मी बोलत आहे; पृथ्वी माझ्या तोंडचे शब्द ऐको.
2पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाची वृष्टी होवो, माझे भाषण दहिवराप्रमाणे ठिबको; कोवळ्या गवतावर जशी पावसाची झिमझिम, हिरवळीवर जशा पावसाच्या सरी, तसे ते वर्षो.
3मी परमेश्वराच्या नावाची घोषणा करीन; आमच्या देवाची महती वर्णा.
4तो दुर्ग आहे; त्याची कृती परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्वसनीय देव आहे, त्याच्या ठायी अनीती नाही; तो न्यायी व सरळ आहे.
5ते बिघडले आहेत, ते त्याचे पुत्र नव्हत, हा त्यांचा दोष आहे; ही विकृत व कुटिल पिढी आहे.
6अहो मूढ व निर्बुद्ध लोकहो, तुम्ही परमेश्वराची अशी फेड करता काय? ज्याने तुला घडवले तोच तुझा पिता ना? त्यानेच तुला निर्माण केले व स्थापले.
7पुरातन काळच्या दिवसांचे स्मरण कर, कैक पिढ्यांची वर्षे ध्यानात आण, आपल्या बापाला विचार, तो तुला निवेदन करील; आपल्या वडील जनांस विचार ते तुला सांगतील.
8जेव्हा परात्पराने राष्ट्रांना त्यांची वतने दिली, जेव्हा त्याने मानवांस निरनिराळे वसवले, तेव्हा त्याने इस्राएल लोकांच्या संख्येप्रमाणे राष्ट्रांच्या सीमा आखून दिल्या;
9कारण परमेश्वराचे लोक हाच त्याचा वाटा, याकोब हाच त्याचा वतनभाग.
10तो त्याला वैराण प्रदेशात व घोंघावणार्‍या ओसाड रानात सापडला; त्याने त्याच्या सभोवती राहून त्याची निगा राखली, आपल्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे त्याला सांभाळले.
11गरुड पक्षीण आपले कोटे हलवते, आपल्या पिलांवर तळपत असते, आपले1 पंख पसरून त्यांवर त्यांना घेते व आपल्या पंखांवर वाहते,
12त्याप्रमाणे परमेश्वरानेच त्याला चालवले, त्याच्याबरोबर परका देव नव्हता.
13त्याने त्याला पृथ्वीवरील उंच उंच स्थानांवरून मिरवत नेले, त्याने शेतात उपज खाल्ला; त्याने त्याला खडकातील मध, आणि गारेच्या खडकातील तेल चाटवले;
14गाईचे दही, मेंढ्यांचे दूध, कोकरांची चरबी, बाशानाचे एडके व बकरे, उत्तम गव्हाचे सत्त्व, हे त्याला दिले; द्राक्षांची लालभडक मदिरा तू प्यालास.
15पण यशुरून (इस्राएल) पुष्ट होऊन लाथा झाडू लागला; तू धष्टपुष्ट झालास, तू लठ्ठ झालास, तू तुकतुकीत झालास; तेव्हा त्याने आपल्या निर्माणकर्त्या देवाचा त्याग केला, आणि आपल्या तारणदुर्गाला तुच्छ लेखले.
16त्यांनी अन्य देवांच्या मागे लागून त्याला ईर्ष्येस पेटवले. अमंगळ कृत्ये करून त्याला चीड आणली.
17देव नाहीत अशा भुतांना, जे अलीकडेच नवीन निघाले आहेत, ज्यांना तुमचे पूर्वज भीत नव्हते, अशा अपरिचित देवांना त्यांनी बली अर्पण केले.
18तुला जन्मास घातलेल्या खडकाची तू पर्वा केली नाहीस, व तुला जन्म देणार्‍या देवाला तू विसरलास.
19हे पाहून परमेश्वराला त्यांचा वीट आला, कारण त्याचे पुत्र व कन्या ह्यांनी त्याला चीड आणली.
20मग तो म्हणाला, ‘मी त्यांच्यापासून आपले मुख लपवीन, त्यांचा अंत कसा काय होईल ते मी पाहीन; कारण ही पिढी अतिशय कुटिल आहे, ही मुले अविश्वसनीय आहेत.
21देव नाही अशाच्या योगे त्यांनी मला ईर्ष्येस पेटवले, व्यर्थ वस्तूंच्या योगे त्यांनी मला चिडवले; म्हणून ज्यांचे राष्ट्र नव्हे अशांच्या योगे मी त्यांना ईर्ष्येस पेटवीन, एका मूढ राष्ट्राच्या योगे त्यांना चिडवीन.
22कारण माझ्या कोपाने आग लागली आहे, अधोलोकाच्या तळापर्यंत ती पसरली आहे, पृथ्वी व तिचा उपज ती भस्म करीत आहे, व डोंगरांचे पायथे जाळून टाकीत आहे.
23मी त्यांच्यावर अरिष्टांची रास रचीन, त्यांच्यावर मी आपले बाण सोडीन;
24ते भुकेने कासावीस होतील, प्रखर तापाने व भयंकर मरीने ग्रस्त होतील; श्वापदांचे दात व जमिनीवर सरपटणार्‍या प्राण्यांचे विष मी त्यांच्यावर पाठवीन.
25बाहेर तलवार व घरात दहशत ह्या त्यांचे प्राण हरण करतील, मग तो कुमार असो की कुमारी असो, तान्हे बाळ असो की पिकल्या केसांचा म्हातारा असो.
26‘मी त्यांची दूरवर पांगापांग करीन, मानवातून त्यांची आठवणच बुजवीन’ असे मी म्हणालो असतो,
27पण शत्रूच्या खिजवण्याला मी भ्यालो; त्यांच्या विरोधकांनी ह्याचा भलताच अर्थ लावला असता; ते म्हणाले असते की, ‘आमच्याच हाताने पराक्रम केला आहे. ही काही परमेश्वराची कृती नव्हे.’
28हे राष्ट्र विचारशून्य आहे, ह्यांना समजच नाही.
29ते शहाणे असते, त्यांना हे समजले असते, व आपल्या अंतकाळाचा विचार त्यांनी केला असता तर किती बरे झाले असते!
30त्यांच्या दुर्गाने त्यांचा विक्रय केला नसता, परमेश्वराने त्यांना परकीयांच्या हाती दिले नसते, तर एकाने सहस्रांचा पाठलाग कसा केला असता! दोघांनी दशसहस्रांना कसे पळवले असते!
31त्यांचा दुर्ग आपल्या दुर्गासारखा नाही, हे आपले शत्रूही जाणून आहेत.
32त्यांची द्राक्षलता सदोमाच्या द्राक्षलतेपासून निघाली आहे, ती गमोर्‍यांच्या मळ्यातली आहे, त्यांची द्राक्षे विषारी आहेत; त्यांचे घोस कडू आहेत.
33त्यांचा द्राक्षारस म्हणजे सर्पाचे विषच; भुजंगाचे जालीम गरळच आहे.
34‘हे माझ्या संग्रही नाही काय? माझ्या भांडारात ते मोहरबंद केलेले नाही काय?
35सूड घेणे व उसने फेडणे हे माझ्याकडे आहे; त्यांचे पाय घसरतील तेव्हा हे घडेल; कारण त्यांचा संकटकाळ जवळ आला आहे, त्यांच्यावर ओढवणारे प्रसंग लवकर येत आहेत.’
36आपल्या लोकांचा आश्रय तुटला आहे, बद्ध किंवा मुक्त असा कोणी उरला नाही, हे परमेश्वर पाहील तेव्हा तो त्यांचा न्याय करील, त्याला आपल्या सेवकाचा कळवळा येईल.
37मग तो म्हणेल, ‘त्यांचे देव कोठे आहेत? ज्याच्यावर त्यांनी भिस्त ठेवली तो त्यांचा दुर्ग कोठे आहे?
38त्यांच्या यज्ञातली चरबी खाणारे, त्यांच्या पेयार्पणातला द्राक्षारस पिणारे देव कोठे आहेत? त्यांनी आता उठून तुम्हांला साहाय्य करावे व तुम्हांला आश्रय द्यावा.
39‘आता पाहा, मी, मीच तो आहे, माझ्याशिवाय कोणी देव नाही; प्राणहरण व प्राणदान करणारा मीच आहे. मी घायाळ करतो आणि मीच बरे करतो; माझ्या हातून सोडवणारा कोणी नाही.
40मी आपला बाहू आकाशाकडे उभारून म्हणतो, माझ्या सनातन जीविताची शपथ,
41मी आपली चमकणारी तलवार पाजळली, मी न्याय हाती घेतला, तर मी आपल्या विरोधकांचा सूड घेईन, माझ्या वैर्‍यांचे उसने फेडीन.
42वधलेल्यांचे, पाडाव केलेल्यांचे आणि शत्रूंच्या केसाळ मस्तकांचे रक्त पाजून मी माझ्या बाणांना मस्त करीन; माझी तलवार मांस भक्षील.’
43राष्ट्रांनो, त्याच्या प्रजेचा जयजयकार करा; कारण तो आपल्या सेवकांच्या रक्तपाताचा बदला घेईल, तो आपल्या विरोधकांचा सूड उगवील, तो आपला देश व आपली प्रजा ह्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त करील.”
44ह्या गीताचे सर्व शब्द मोशेने नूनाचा मुलगा होशा1 ह्याला बरोबर घेऊन लोकांना ऐकवले.
45ह्याप्रमाणे मोशेने ही सर्व वचने सर्व इस्राएल लोकांना सांगण्याचे संपवले;
46मग तो त्यांना म्हणाला, “ज्या गोष्टी आज मी तुम्हांला साक्षीदाखल सांगत आहे त्या सर्व लक्षात ठेवा; ह्या नियमशास्त्रातील सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाळण्याची तुम्ही आपल्या मुलांना आज्ञा करा.
47ही बाब तुमच्या दृष्टीने निरर्थक नसावी, कारण हीच तुमचे जीवन होय. तुम्ही यार्देन ओलांडून ज्या देशाचे वतन करून घ्यायला जाणार आहात तेथे हिच्याच योगे चिरकाळ राहाल.”
दुरून कनान देश पाहण्याची मोशेला संधी मिळते
48त्याच दिवशी परमेश्वर मोशेला म्हणाला,
49“मवाब देशात यरीहोसमोर अबारीम पर्वताचे नबो म्हणून जे शिखर आहे त्यावर चढ, आणि जो कनान देश इस्राएल लोकांना वतन म्हणून मी देत आहे तो तेथून पाहा;
50तुझा भाऊ अहरोन हा होर डोंगरावर मृत्यू पावून स्वजनांस मिळाला, तसाच तूही ह्या डोंगरावर चढून जाशील व तेथे मृत्यू पावून स्वजनांस मिळशील.
51कारण त्सीन रानात कादेशच्या मरीबा नावाच्या झर्‍याजवळ तुम्ही इस्राएल लोकांदेखत माझा विश्वासघात केला व त्यांच्यासमोर मला पवित्र मानले नाही.
52ह्यामुळे जो देश मी इस्राएल लोकांना देत आहे तो तू समोर पाहशील; पण तेथे तुझे जाणे होणार नाही.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in