YouVersion Logo
Search Icon

अनुवाद 3

3
इस्राएल लोक बाशानाच्या ओग राजाला जिंकतात
(गण. 21:31-35)
1मग आपण वळसा घेऊन बाशानाच्या वाटेने चढून गेलो तेव्हा बाशानाचा राज ओग आपली सर्व सेना घेऊन आमच्याशी सामना करण्यासाठी निघाला आणि एद्रई येथे युद्ध करायला आमच्यावर चालून आला.
2तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘त्याला भिऊ नकोस, कारण तो, त्याची सर्व सेना आणि त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे, आणि जसे तू हेशबोन येथे राहणारा अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याचे केले तसेच त्याचेही कर.’ 3आपला देव परमेश्वर ह्याने बाशानाचा राजा ओग व त्याचे सर्व लोक आमच्या हाती दिले आणि आम्ही त्यांना असा मार दिला की त्याचे कोणीच उरले नाही.
4त्या वेळी आम्ही त्याची सर्व नगरे घेतली; आम्ही घेतले नाही असे त्यांचे एकही नगर राहिले नाही, आम्ही साठ नगरे घेतली, म्हणजे अर्गोबाचा सारा प्रदेश घेतला; बाशानातले ओगाचे राज्य ते हेच.
5ही सर्व तटबंदी नगरे असून त्यांचे तट उंच होते आणि त्यांना वेशी व अडसर होते; ह्यांशिवाय तट नसलेली खेडीपाडी पुष्कळच होती.
6हेशबोनाचा राजा सीहोन ह्याच्या नगरांप्रमाणे त्या नगरांचाही आपण समूळ नाश केला; प्रत्येक नगराचा त्यातील पुरुष, स्त्रिया व मुलेबाळे ह्यांच्यासह समूळ नाश केला;
7पण सर्व जनावरे व नगरांतली लूट आपण नेली.
8ह्या प्रकारे त्या वेळी यार्देनेच्या पूर्वेस राहणारे अमोर्‍यांचे दोन्ही राजे ह्यांच्या ताब्यातल्या आर्णोन खोर्‍यापासून हर्मोन पर्वतापर्यंतचा देश आपण घेतला;
9(हर्मोनाला सीदोनी लोक सिर्योन म्हणतात आणि अमोरी लोक सनीर म्हणतात.) 10माळावरील सर्व नगरे, सर्व गिलाद प्रांत आणि बाशानातील ओगाच्या राज्यातील सलका व एद्रई ह्या नगरांपर्यंतचा सर्व बाशान प्रांत आम्ही काबीज केला.
11(रेफाई लोकांपैकी शेष राहिला तो फक्‍त बाशानाचा राजा ओग. त्याचा पलंग लोखंडाचा होता; पाहा, तो अम्मोन्यांच्या राब्बा नगरात आहे ना? पुरुषाच्या हाताने त्याची लांबी नऊ हात व रुंदी चार हात आहे.)
रऊबेन, गाद व अर्धे मनश्शे घराणे यार्देनेच्या पूर्वेस वस्ती करतात
(गण. 32:1-42)
12त्या वेळी आम्ही देश काबीज केला तो येणेप्रमाणे : आर्णोन खोर्‍याच्या कडेला असलेल्या अरोएर नगरापासून गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाचा अर्धा भाग व त्यातील नगरे हा प्रदेश मी रऊबेनी व गादी ह्यांना दिला आहे;
13गिलादाचा उरलेला भाग आणि सर्व बाशान, अर्थात ओगाचे राज्य, अर्गोबाचा सारा प्रदेश, म्हणजे सर्व बाशान हे मी मनश्शेच्या अर्ध्या वंशाला दिले आहे. (ह्यालाच रेफाईचा देश म्हणतात.
14मनश्शेचा मुलगा याईर ह्याने गशूरी व माकाथी ह्यांच्या सीमेपर्यंत अर्गोबाचा सर्व प्रदेश हस्तगत केला आणि बाशानाला आपले नाव म्हणजे हव्वोथ-याईर असे ठेवले, तेच आजवर चालत आहे.)
15गिलाद प्रदेश मी माखीर ह्याला दिला.
16रऊबेनी व गादी ह्यांना गिलादापासून आर्णोन खोर्‍यापर्यंतचा प्रदेश मी दिला त्या खोर्‍याच्या मध्य भागापर्यंत आणि अम्मोन्यांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत त्यांची सरहद्द ठरवली.
17तसाच किन्नेरेथापासून अराबाचा समुद्र म्हणजे क्षारसमुद्र येथवर पिसगाच्या उतरणीच्या तळाशी असलेला अराबा व यार्देनेच्या पूर्वेकडील प्रदेश मी त्यांना दिला.
18त्या वेळी मी तुम्हांला आज्ञा केली की, ‘तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला हा देश वतन म्हणून दिला आहे, तेव्हा तुम्ही सर्व योद्धे सशस्त्र होऊन आपल्या इस्राएल भाऊबंदांच्या आघाडीस पैलतीरी जा;
19पण मी तुम्हांला दिलेल्या नगरात तुमच्या स्त्रिया, मुलेबाळे व गुरेढोरे (तुमची गुरेढोरे पुष्कळ आहेत हे मला ठाऊक आहे) ह्यांनी वस्ती करून राहावे;
20आणि तुमच्याचप्रमाणे तुमच्या भाऊबंदांना परमेश्वर विसावा देईल, व तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना देऊ केलेला यार्देनेपलीकडचा देश तेही ताब्यात घेतील; त्यानंतर जो प्रदेश मी तुम्हांला दिलेला आहे तेथे तुम्ही सर्व आपापल्या वतनावर परत या.’
21मग मी त्या वेळी यहोशवाला असे सांगितले की, ‘तुमचा देव परमेश्वर ह्याने ह्या दोन राजांचे काय केले हे तू आपल्या डोळ्यांनी पाहिले आहेस; तू नदी पार करून ज्या ज्या राज्यात जाशील त्या त्या सर्वांचे परमेश्वर तसेच करील.
22त्यांना भिऊ नका, कारण तुमच्या बाजूने युद्ध करणारा तुमचा देव परमेश्वर आहे.’
कनान देशात प्रवेश करण्यास मोशेला मज्जाव
23त्या वेळी मी परमेश्वराची विनवणी करून म्हटले,
24‘हे प्रभू परमेश्वरा, तू आपल्या दासाला आपला प्रताप व आपला समर्थ हात दाखवू लागला आहेस; तुझ्यासारखी कार्ये करणारा व पराक्रम करणारा देव स्वर्गात किंवा पृथ्वीवर कोण आहे?
25तर मला पलीकडे जाऊ दे आणि यार्देनेपलीकडे असलेला तो उत्तम देश, तो चांगला डोंगराळ प्रदेश आणि लबानोन माझ्या दृष्टीस पडू दे.’
26पण तुमच्यामुळे परमेश्वर माझ्यावर रुष्ट झाला आणि त्याने माझे ऐकले नाही. परमेश्वर मला म्हणाला, ‘पुरे, ही गोष्ट पुन्हा माझ्याजवळ काढू नकोस.
27पिसगाच्या शिखरावर जा आणि पश्‍चिम, उत्तर, दक्षिण व पूर्व अशा चारही दिशांकडे दृष्टी लावून तो देश पाहून घे, कारण तुला यार्देनेपलीकडे जायचे नाही.
28आणि यहोशवाला अधिकारारूढ कर व त्याला धीर देऊन दृढ कर; कारण तोच ह्या लोकांचा पुढारी होऊन त्यांना पलीकडे नेईल आणि जो देश तुझ्या दृष्टीस पडेल तो त्यांना वतन म्हणून मिळवून देईल.’
29म्हणून आम्ही बेथ-पौराच्या समोरील खोर्‍यात मुक्काम केला.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in