YouVersion Logo
Search Icon

आमोस 2

2
1परमेश्वर म्हणतो, “मवाबाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्याने अदोमाच्या राजाची हाडे भाजून त्यांचा चुना केला.
2त्यामुळे मी मवाबावर अग्नी पाठवीन, तो करियोथाचे महाल जाळून भस्म करील व त्या दंगलीत रणशब्द व शिंगाचा आवाज होत असता, मवाब नष्ट होईल;
3मी त्याच्यातल्या शास्त्यांना कापून टाकीन, व त्याच्याबरोबर त्याच्या सर्व सरदारांना मारून टाकीन,” असे परमेश्वर म्हणतो.
4परमेश्वर म्हणतो, “यहूदाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्यांनी परमेश्वराचे नियमशास्त्र धिक्कारले आहे, त्यांनी त्याचे विधी पाळले नाहीत; व त्यांचे वाडवडील ज्या खोट्या गोष्टींना अनुसरले त्यांच्या योगे ते बहकले आहेत.
5त्यामुळे मी यहूदावर अग्नी पाठवीन, तो यरुशलेमेचे महाल जाळून भस्म करील.”
इस्राएलाचा न्याय
6परमेश्वर म्हणतो, “इस्राएलाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण ते रुप्यासाठी नीतिमानास विकतात, एका जोड्यासाठी गरिबास विकतात;
7ते गरिबांची मस्तके धुळीत लोळवतात, ते दीनांच्या मार्गात आडवे येतात, माझ्या पवित्र नामास बट्टा लावण्याकरता मुलगा व बाप एकाच तरुणीकडे जातात.
8गहाण घेतलेली वस्त्रे घालून ते प्रत्येक वेदीजवळ निजतात आणि आपल्या दैवतांच्या1 मंदिरात घेतलेल्या दंडाचा द्राक्षारस प्राशन करतात.
9मी तर त्यांच्यापुढून अमोरी लोकांचा संहार केला; त्यांची उंची गंधसरूच्या उंचीसारखी होती. ते अल्लोन झाडांसारखे मजबूत होते; मी वरून त्यांचे फळ व खालून त्यांचे मूळ नासवले.
10मी तुम्हांला अमोरी लोकांच्या देशाचे वतन देण्यास मिसर देशातून आणले व चाळीस वर्षे रानातून फिरवले.
11तुमच्या पुत्रांतील काहींना संदेष्टे होण्यासाठी व तुमच्या तरुणांतील काहींना नाजीर होण्यासाठी मी वाढवले, इस्राएल वंशजहो, असे नव्हे काय?” असे परमेश्वर म्हणतो.
12“तरीपण तुम्ही नाजीरांना द्राक्षारस पाजला व संदेष्ट्यांना ‘संदेश देऊ नका’ अशी आज्ञा केली.
13ह्यामुळे पाहा, धान्याच्या पेंढ्यांनी गच्च भरलेला गाडा जसा खाली दबतो तसे मी तुम्हांला दाबीन.
14जो चपळ त्याला पलायन साधायचे नाही. बळकट आहे त्याला आपली शक्ती चालवता यायची नाही, वीराला आपला जीव वाचवता येणार नाही;
15धनुर्धार्‍याला उभे राहता येणार नाही; चपळ पायांच्या इसमाला आपला बचाव करता येणार नाही; घोडेस्वाराला आपला जीव वाचवता येणार नाही.
16वीरांपैकी महाधैर्यवानही त्या दिवशी उघडाबोडका पळून जाईल,” असे परमेश्वर म्हणतो.

Currently Selected:

आमोस 2: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in