YouVersion Logo
Search Icon

आमोस 1

1
इस्राएलाच्या शेजार्‍यांचा न्याय
1तकोवा येथील मेंढपाळांतला आमोस ह्याला, यहूदाचा राजा उज्जीया व इस्राएलाचा राजा योवाशाचा पुत्र यराबाम ह्यांच्या काळात, भूमिकंपापूर्वी दोन वर्षे, इस्राएलाविषयी दृष्टान्तरूपाने प्राप्त झालेली वचने ही :
2तो म्हणाला, “परमेश्वर सीयोनेतून गर्जना करतो, यरुशलेमेतून आपला शब्द ऐकवतो, मेंढपाळांची कुरणे शोक करतात व कर्मेलाचा माथा सुकून गेला आहे.”
3परमेश्वर म्हणतो, “दिमिष्काचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण मळणी करण्याच्या लोखंडी यंत्रांनी त्यांनी गिलादाला मळले.
4पण मी हजाएलाच्या घरावर अग्नी पाठवीन; तो बेन-हदाद ह्याचे महाल जाळून भस्म करील.
5दिमिष्काचा अडसर मोडून टाकीन, आवेन खोर्‍यातील सिंहासनारूढ असलेला व बेथ-एदनाचा राजवेत्रधारी ह्यांचा निःपात करीन; अरामाच्या लोकांना पाडाव करून कीरास नेतील,” असे परमेश्वर म्हणतो.
6परमेश्वर म्हणतो, “गज्जाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्यांनी अदोमाच्या हवाली करण्यासाठी झाडून सर्व लोकांना बंदिवान करून नेले.
7तर मी गज्जाच्या तटावर अग्नी पाठवीन तो त्याचे महाल जाळून भस्म करील.
8मी अश्दोदातील सिंहासनारूढ असलेला व अश्कलोनचा राजवेत्रधारी ह्यांचा निःपात करीन; एक्रोनावर माझा हात चालवीन व पलिष्ट्यांचा निःशेष नाश होईल,” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
9परमेश्वर म्हणतो, “सोराचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्यांनी झाडून सारे बंदिवान अदोमाच्या हाती दिले व ते भाऊबंदांबरोबर केलेला करार स्मरले नाहीत.
10तर मी सोराच्या तटावर अग्नी पाठवीन, तो त्याचे महाल जाळून भस्म करील.”
11परमेश्वर म्हणतो, “अदोमाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; त्याने तलवार घेऊन आपल्या बंधूचा पाठलाग केला, त्याने आपला कळवळा दाबून टाकला, तो आपल्या क्रोधाने एकसारखा भडकत राहिला; त्याने आपला संताप सतत बाळगला.
12ह्यामुळे मी तेमानावर अग्नी पाठवीन, तो बस्राचे महाल जाळून भस्म करील.”
13परमेश्वर म्हणतो, “अम्मोनवंशजांचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्यांनी आपली सीमा वाढवण्यासाठी गिलादाच्या गरोदर स्त्रियांना चिरले.
14तर मी राब्बाच्या कोटात अग्नी पेटवीन, वधाच्या दिवशी रणशब्द होत असता व वावटळीच्या दिवशी तुफान होत असता तो तिचे महाल जाळून भस्म करील.
15आणि त्यांचा राजा व त्यांच्याबरोबर त्याचे सरदार बंदिवान होऊन जातील,” असे परमेश्वर म्हणतो.

Currently Selected:

आमोस 1: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in