२ शमुवेल 1
1
शौलाच्या मृत्यूची बातमी दाविदाला कळते
1शौलाच्या मृत्यूनंतर दावीद अमालेक्यांचा संहार करून परत सिकलाग येथे दोन दिवस राहिला;
2ह्यानंतर तिसर्या दिवशी छावणीतून शौल होता तेथून एक माणूस आला; त्याने आपले कपडे फाडले होते व डोक्यात धूळ घातली होती. तो दाविदाजवळ येऊन पोहचल्यावर त्याने त्याला साष्टांग दंडवत घातले.
3दाविदाने त्याला विचारले, “तू कोठून आलास?” तो त्याला म्हणाला, “मी इस्राएलाच्या छावणीतून निभावून आलो आहे.”
4दाविदाने त्याला विचारले, “कसे काय वर्तमान आहे ते मला सांग बरे.” तो म्हणाला, “लोक रणभूमीवरून पळाले, पुष्कळ लोक पडले व प्राणास मुकले; शौल व त्याचा पुत्र योनाथान हेही प्राणास मुकले.”
5दाविदाने बातमी आणणार्या त्या तरुणाला विचारले, “शौल व त्याचा पुत्र योनाथान हे मेले हे तुला कशावरून कळले?”
6तो बातमी आणणारा तरुण म्हणाला, “मी सहज गिलबोवाच्या डोंगरात फिरत असता शौल आपल्या भाल्यावर टेकलेला आहे आणि रथ व स्वार त्याच्या पाठीशी येऊन अगदी भिडले आहेत असे मला दिसले.
7शौलाने मागे पाहिले तो मी त्याला दिसलो आणि त्याने मला हाक मारली; तेव्हा मी म्हणालो, ‘काय आज्ञा?’
8तो मला म्हणाला, ‘तू कोण आहेस?’ मी त्याला म्हणालो, ‘मी अमालेकी आहे.’ 9तो मला म्हणाला, ‘माझ्याजवळ उभा राहून माझा वध कर; मला यातना होत आहेत तरी माझा प्राण अद्यापि कायमच आहे.’
10तेव्हा मी त्याच्याजवळ उभे राहून त्याचा वध केला, कारण त्याचे असे पतन झाल्यावर तो वाचणार नाही अशी माझी खात्री झाली होती. मी त्याच्या मस्तकावरचा मुकुट व त्याची बाहुभूषणे काढून येथे माझ्या स्वामीजवळ आणली आहेत.”
11हे ऐकून दाविदाने आपली वस्त्रे धरून फाडली आणि जितके लोक त्याच्याबरोबर होते त्यांनीही तसेच केले.
12शौल, त्याचा पुत्र योनाथान, परमेश्वराचे लोक आणि इस्राएलाचे घराणे हे सर्व तलवारीने पडले म्हणून त्यांच्याबद्दल त्यांनी शोक केला, विलाप केला आणि संध्याकाळपर्यंत ते उपाशी राहिले.
13मग दाविदाने आपल्याला बातमी देणार्या त्या तरुण मनुष्याला विचारले, “तू कोठला?” तो म्हणाला, “मी एका परदेशीयाचा पुत्र आहे, मी अमालेकी आहे.”
14दावीद त्याला म्हणाला, “परमेश्वराच्या अभिषिक्ताचा वध करायला हात चालवण्याची तुला भीती कशी नाही वाटली?”
15दाविदाने एका तरुणाला बोलावून सांगितले, “जवळ जाऊन त्याच्यावर हल्ला कर.” त्याने त्याच्यावर असा वार केला की तो मेलाच.
16दावीद त्याला म्हणाला, “तुझा रक्तपात तुझ्याच माथी असो; परमेश्वराच्या अभिषिक्ताचा मी वध केला असे म्हटल्याने तुझ्याच मुखाने तुझ्याविरुद्ध साक्ष दिली आहे.”
शौल व योनाथानासाठी दावीद शोक करतो
17मग दाविदाने शौल व त्याचा पुत्र योनाथान ह्यांच्यासंबंधाने पुढील विलापगीत गाईले;
18आणि हे धनुष्य नामक गीत यहूद्यांना शिकवण्याची आज्ञा केली; पाहा, हे गीत याशाराच्या पुस्तकात लिहिलेले आहे :
19“हे इस्राएला, तुझा शिरोमणी उच्च स्थानी वधला आहे. बलाढ्य पाहा कसे पतन पावले आहेत!
20गथात हे सांगू नका, अष्कलोनच्या आळ्यांत हे जाहीर करू नका; पलिष्ट्यांच्या कन्या आनंदित होतील, बेसुंत्यांच्या कन्या जयघोष करतील; असे न होवो.
21गिलबोवाच्या डोंगरांनो, तुमच्यावर दहिवर न पडो, पर्जन्यवृष्टी न होवो नजराणा म्हणून देण्यास तुमच्यासाठी अर्पणयोग्य शेते न होवोत. कारण तेथे पराक्रम्यांची ढाल भ्रष्ट झाली आहे, शौलाची ढाल तैलाभ्यंगावाचून भ्रष्ट होऊन पडली आहे.
22वधलेल्यांचे रक्त प्राशन केल्यावाचून व बलाढ्यांचे मांदे भक्षण केल्यावाचून योनाथानाचे धनुष्य कधी परत येत नसे, शौलाची तलवार कधी रिकामी परतत नसे.
23शौल व योनाथान प्रेमळ व मनमिळाऊ असत; जीवनात व मरणात त्यांचा वियोग झाला नाही. ते गरुडाहून वेगवान व सिंहाहून बलवान होते.
24इस्राएली कन्यांनो, शौलासाठी रुदन करा; तो तुम्हांला किरमिजी वस्त्रे लेववून शृंगारित असे; तो तुमच्या वस्त्रांवर सोन्याचे अलंकार घालीत असे.
25रणभूमीवर बलाढ्य पाहा कसे पतन पावले आहेत! योनाथाना, तू उच्च स्थानी वधला गेला आहेस!
26माझ्या बंधो, योनाथाना, मी तुझ्याकरिता विव्हळ होत आहे. तू माझ्यावर फार माया करत असायचास. तुझे माझ्यावर विलक्षण प्रेम होते, स्त्रियांच्या प्रेमाहूनही ते अधिक होते.
27बलाढ्य पाहा कसे पतन पावले आहेत! युद्धाची शस्त्रे कशी नाश पावली आहेत!”
Currently Selected:
२ शमुवेल 1: MARVBSI
Highlight
Share
Copy
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapi.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fen.png&w=128&q=75)
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.