YouVersion Logo
Search Icon

२ राजे 20

20
हिज्कीयाचे दुखणे
(२ इति. 32:24-26; यश. 38:1-22)
1त्या दिवसांत हिज्कीया आजारी पडून मरायला टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, आपल्या घराची निरवानिरव कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस.”
2तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली; तो म्हणाला,
3“हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्त्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करत आलो आहे ह्याचे स्मरण कर अशी तुला मी विनंती करतो.” असे म्हणून हिज्कीया मनस्वी रडला.
4तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशया जाऊन पोहचतो तोच त्याला परमेश्वराचा संदेश आला तो हा : 5“परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिज्कीया ह्याला सांग, तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत; मी तुला बरे करतो. तू आजपासून तिसर्‍या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील.
6मी तुझे आयुष्य पंधरा वर्षांनी वाढवतो; मी तुला व ह्या नगराला अश्शूराच्या राजाच्या हातातून सोडवीन; माझ्यासाठी व माझा सेवक दावीद ह्याच्यासाठी मी ह्या नगराचे संरक्षण करीन.”
7यशयाने सांगितले, “अंजिराची एक चांदकी आणा.” ती त्यांनी आणून गळवावर बांधली व त्याला गुण आला.
8हिज्कीयाने यशयाला विचारले की, “तिसर्‍या दिवशी परमेश्वर मला बरे करील व मी परमेश्वराच्या मंदिराकडे चढून जाईन ह्याची खूण काय?”
9यशया म्हणाला, “परमेश्वराने जे सांगितले ते तो करीलच ह्याविषयी परमेश्वराकडून ही खूण आहे : शंकुयंत्रावरील छाया दहा अंश पुढे जावी की मागे यावी?”
10हिज्कीयाने म्हटले, “छाया दहा अंश पुढे जावी ही सोपी गोष्ट आहे; तर छाया दहा अंश मागे यावी.”
11यशया संदेष्ट्याने परमेश्वराची प्रार्थना केली आणि आहाजाच्या शंकुयंत्रावर छाया दहा अंश उतरली होती तेवढी त्याने मागे आणली.
हिज्कीयाला बाबेलचे जासूद भेटतात
(२ इति. 32:27-31; यश. 39:1-8)
12त्या वेळेस बाबेलचा राजा बलदानाचा पुत्र बरोदख बलदान ह्याने हिज्कीयाला पत्र व नजराणा पाठवला. कारण तो आजारी असल्याचे त्याने ऐकले होते.
13तेव्हा हिज्कीयाने जासुदांचे ऐकून आपले सर्व भांडार त्यांना दाखवले; आपले रुपे, सोने, सुगंधी द्रव्ये, उत्तम तेल, सर्व शस्त्रागार व त्याच्या भांडारात होते नव्हते ते सर्व त्याने दाखवले; हिज्कीयाने दाखवले नाही असे त्याच्या घरात व राज्यात काही नव्हते.
14मग यशया संदेष्ट्याने हिज्कीया राजाकडे येऊन विचारले, “ती माणसे काय म्हणाली व ती तुझ्याकडे कोठून आली होती?” हिज्कीयाने उत्तर दिले, “ती दूर देशाहून माझ्याकडे आली होती.”
15मग त्याने विचारले, “त्यांनी तुझ्या घरात काय काय पाहिले?” हिज्कीया म्हणाला, “माझ्या घरातले सर्वकाही त्यांनी पाहिले; माझ्या भांडारातले मी त्यांना दाखवले नाही असे काहीच नाही.”
16तेव्हा यशया हिज्कीयाला म्हणाला, “परमेश्वराचे वचन ऐक :
17पाहा, असे दिवस येत आहेत की तुझ्या घरात जे काही आहे व तुझ्या वाडवडिलांनी जे आजवर साठवून ठेवले आहे ते सर्व बाबेलास घेऊन जातील, काही शिल्लक राहणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.
18तुझ्यापासून होणारे तुझ्या पोटचे पुत्र ह्यांना ते नेतील व बाबेलच्या राजवाड्यात ते खोजे होऊन राहतील.”
19तेव्हा हिज्कीया यशयाला म्हणाला, “आपण सांगितलेले परमेश्वराचे वचन यथायोग्य आहे.” तो आणखी म्हणाला, “माझ्या कारकिर्दीत तरी शांतता व स्थिरता ही राहणार ना?”
हिज्कीयाचा मृत्यू
(२ इति. 32:32-33)
20हिज्कीयाची बाकीची कृत्ये, त्याचा सर्व पराक्रम, त्याने तळे व नळ बांधून नगरात पाणी आणले ह्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?
21हिज्कीया आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याच्या जागी त्याचा पुत्र मनश्शे राजा झाला.

Currently Selected:

२ राजे 20: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in