YouVersion Logo
Search Icon

१ इतिहास 21

21
इस्राएल व यहूदा येथील शिरगणती
(२ शमु. 24:1-25)
1नंतर सैतानाने इस्राएलाविरुद्ध उठून इस्राएलाची गणती करायला दाविदाला प्रवृत्त केले.
2दाविदाने यवाबाला व लोकांच्या सरदारांना सांगितले, “जा, बैर-शेबापासून दानापर्यंत इस्राएलाची मोजदाद करून मला कळवा म्हणजे त्यांची संख्या किती आहे हे मला समजेल.”
3यवाब म्हणाला, “लोक कितीही असोत, परमेश्वर त्यांना शतगुणित करो; पण माझे स्वामीराज, हे सर्व स्वामींचे दास आहेत ना? माझे स्वामी हे करायला का सांगतात? इस्राएलावर दोष आणण्यासाठी त्यांनी कारण का व्हावे?”
4तथापि राजाज्ञेपुढे यवाबाचे काही चालले नाही, म्हणून यवाब निघून सर्व इस्राएल देशभर फिरून यरुशलेमास आला.
5तेव्हा यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी दाविदाला दिली. सर्व धारकरी पुरुष इस्राएलात अकरा लक्ष आणि यहूदात चार लक्ष सत्तर हजार भरले.
6त्यांच्यात लेवी व बन्यामिनी ह्यांची टीप घेतली नाही; कारण ह्या राजाज्ञेचा यवाबाला वीट आला होता.
7ह्या गोष्टीवरून देवाची इतराजी होऊन त्याने इस्राएलावर मारा केला.
8दावीद देवाला म्हणाला, “हे मी केले त्यात मी मोठे पाप केले आहे, तर आता आपल्या सेवकाला दोषमुक्त कर; कारण मी मोठा मूर्खपणा केला आहे.”
9परमेश्वराने दाविदाचा द्रष्टा गाद ह्याला म्हटले,
10“जा, दाविदाला सांग, परमेश्वर म्हणतो, ‘मी तुझ्यापुढे तीन गोष्टी ठेवतो त्यांपैकी कोणती करावी ती निवड.”’
11तेव्हा गादाने दाविदाकडे जाऊन त्याला सांगितले, “परमेश्वर म्हणतो, ‘पुढील गोष्टींपैकी तुला वाटेल ती एक निवड : 12तीन वर्षे दुष्काळ पडावा, अथवा तीन महिने तुझ्या शत्रूंची तलवार तुझ्यावर चालून तुझा नाश व्हावा, किंवा तीन दिवस परमेश्वराची तलवार म्हणजे मरी देशात पसरून परमेश्वराच्या दूताने सर्व इस्राएली मुलखाचा नाश करावा.’ ज्याने मला पाठवले आहे त्याला मी काय उत्तर द्यावे ते चांगला विचार करून सांग.”
13दावीद गादाला म्हणाला, “मी मोठ्या पेचात पडलो आहे; आता परमेश्वराच्या हातात मला पडू द्या, कारण त्याचे वात्सल्य मोठे आहे; मनुष्याच्या हातात मी पडू नये.”
14मग परमेश्वराने इस्राएलात मरी पाठवली आणि त्यांच्यातले सत्तर हजार लोक पडले.
15देवाने यरुशलेमाचा नाश करायला एक देवदूत पाठवला; तो त्याचा नाश करणार हे परमेश्वराने पाहिले तेव्हा ह्या अरिष्टाविषयी परमेश्वराला वाईट वाटले व त्या नाश करणार्‍या देवदूताला तो म्हणाला, “आता पुरे कर, आपला हात आटोप.” त्या वेळी परमेश्वराचा दूत अर्णान1 यबूसी ह्याच्या खळ्यानजीक होता.
16दाविदाने वर दृष्टी केली तो परमेश्वराचा दूत आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन यरुशलेमावर उगारून आकाश व पृथ्वी ह्यांच्यामध्ये उभा आहे असे त्याला दिसले, तेव्हा दावीद व वडील जन ह्यांनी दंडवत घातले; त्या वेळी त्यांनी गोणपाट नेसले होते.
17दावीद देवाला म्हणाला, “लोकांची मोजदाद करण्याची आज्ञा करणारा मीच ना? मीच हे पाप केले आहे, मीच हे दुराचरण केले आहे; ह्या मेंढरांनी काय केले आहे? हे परमेश्वरा, माझ्या देवा, तुझा हात माझ्यावर व माझ्या पितृकुळावर पडावा, तुझ्या लोकांवर पडून त्यांचा नाश होऊ नये.”
18तेव्हा परमेश्वराच्या दूताने गादाला आज्ञा केली, “तू दाविदाला सांग की तू वरती जाऊन अर्णान यबूसी ह्याच्या खळ्यात परमेश्वराप्रीत्यर्थ एक वेदी बांध.”
19गादाने परमेश्वराच्या नामाने सांगितले त्याप्रमाणे दावीद वरती गेला.
20अर्णान मागे वळून पाहतो तेव्हा देवदूत त्याच्या दृष्टीस पडला, तेव्हा त्याच्याबरोबर असलेले त्याचे चार पुत्र लपून राहिले. ह्या वेळी अर्णान गव्हाची मळणी करत होता.
21दावीद आपल्याकडे येत आहे हे पाहून अर्णान खळ्याबाहेर गेला व त्याने भूमीपर्यंत लवून दाविदाला प्रणाम केला.
22दावीद अर्णानास म्हणाला, “ह्या खळ्याची जागा मला दे; लोकांवरची ही मरी दूर व्हावी म्हणून येथे परमेश्वराप्रीत्यर्थ मला एक वेदी बांधायची आहे; पुरे मोल घेऊन ही मला दे.”
23अर्णान दाविदाला म्हणाला, “ही जमीन आपणाला घ्या, माझ्या स्वामीराजांनी जे काही ठीक दिसेल ते करावे. पाहा, होमबलीसाठी बैल, इंधनासाठी मळणीची औते व अन्नार्पणासाठी गहू ही सर्व मी आपणाला देतो.”
24दावीद राजा अर्णानाला म्हणाला, “नाही, नाही, मी पुरे मोल देऊन ह्या वस्तू घेईन; कारण जे तुझ्या मालकीचे आहे ते मी परमेश्वरासाठी घेणार नाही; फुकट मिळालेला होमबली मी अर्पण करणार नाही.”
25तेव्हा दाविदाने त्या जागेबद्दल सहाशे शेकेल सोने तोलून दिले.
26दाविदाने तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधून होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली आणि परमेश्वराचा धावा केला, परमेश्वराने त्या होमबलीच्या वेदीवर दिव्याग्नी पाडून त्याला उत्तर दिले.
27परमेश्वराने देवदूताला आज्ञा केली; आणि त्याने आपली तलवार म्यानात परत घातली.
मंदिरासाठी जागा
28त्या प्रसंगी परमेश्वराने अर्णान यबूसी ह्याच्या खळ्यात आपली विनंती ऐकली हे पाहून दाविदाने यज्ञ केला.
29मोशेने रानात केलेला परमेश्वराचा निवासमंडप आणि होमार्पणाची वेदी ही दोन्ही त्या वेळेस गिबोन येथल्या उच्च स्थानी होती.
30पण दावीद देवाला प्रश्‍न विचारण्यासाठी त्याच्यापुढे जाण्यास धजेना; परमेश्वराच्या दूताच्या तलवारीचा त्याला धाक पडला होता.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for १ इतिहास 21