मत्तय 18

18
नम्रतेचे महत्त्व
1एकदा शिष्य येशूकडे येऊन विचारू लागले, “स्वर्गाच्या राज्यात सर्वांत मोठा कोण?”
2तेव्हा त्याने एका लहान मुलाला घेऊन त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, 3“मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुमचे परिवर्तन होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुम्हांला मुळीच प्रवेश मिळणार नाही. 4म्हणजेच जो कोणी स्वतःला ह्या बालकासारखे नम्र करतो, तो स्वर्गाच्या राज्यात मोठा होय. 5तसेच जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो.
अडखळण होणाऱ्यांना इशारा
6माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानांतील एकाला जो कोणी पापास प्रवृत्त करील त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे, हे त्याच्या हिताचे आहे. 7अडखळण होणे ही जगासाठी किती भयानक गोष्ट आहे! अशी अडखळणे अवश्य घडणार. परंतु ज्याच्याकडून ती अडखळणे घडतील त्याची केवढी दुर्दशा होणार!
8तुझा हात किंवा तुझा पाय तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असेल, तर तो तोडून फेकून दे, दोन हात किंवा दोन पाय असून न विझणाऱ्या अग्नीत पडण्यापेक्षा लुळे किंवा लंगडे होऊन जीवनात जावे, हे तुझ्या हिताचे आहे. 9तुझा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असेल, तर तो उपटून फेकून दे. दोन डोळे असून नरकाग्नीत पडण्यापेक्षा एक डोळा असून जीवनात जावे, हे तुझ्या हिताचे आहे.
10सांभाळा, ह्या लहानांतील एकालाही तुच्छ मानू नका. मी तुम्हांला सांगतो, त्यांचे दिव्य दूत माझ्या स्वर्गातील पित्यापुढे नित्य उपस्थित असतात.
हरवलेल्या मेंढराचा दाखला
11[जे हरवलेले आहे, त्याचा शोध घेण्यासाठी मनुष्याचा पुत्र आला आहेर्.]
12तुम्हांला काय वाटते? एका माणसाजवळ शंभर मेंढरे असली आणि त्यांतून एखादे भटकले तर टेकडीवर चरत असलेल्या नव्याण्णव मेंढरांना सोडून जे एक भटकले आहे त्याला शोधायला तो जाणार नाही काय? 13आणि समजा, ते त्याला सापडले तर न भटकलेल्या नव्याण्णवांपेक्षा तो सापडलेल्या मेंढराबद्दल अधिक आनंद व्यक्त करणार नाही का? 14त्याप्रमाणे ह्या लहानांतील एकाचाही नाश व्हावा, अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही.
अपराध करणाऱ्याबरोबर कसे वागावे?
15तुझा भाऊ तुझा अपराधी असेल तर त्याच्याकडे जा. तुम्ही दोघे एकांती असताना त्याचा अपराध काय ते त्याला सांग. त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळवलास, असे होईल. 16परंतु त्याने जर ऐकले नाही, तर तू आणखी एका दोघांना आपणाबरोबर घे. अशासाठी की, दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द सिद्ध व्हावा 17आणि जर त्याने त्यांचेही ऐकले नाही तर मंडळीला कळव. जर त्याने मंडळीचेही ऐकले नाही, तर तो तुला निधर्मी किंवा जकातदार ह्यांच्यासारखा होवो.
18मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल, ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल, ते स्वर्गात मोकळे केले जाईल.
सामुदायिक प्रार्थना
19मी आणखी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करतील, तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी मान्य केली जाईल; 20कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतात, तेथे त्यांच्यामध्ये मी असतो.”
कृतघ्न दासाचा दाखला
21त्या वेळी पेत्र येशूकडे येऊन म्हणाला, “प्रभो, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? सात वेळा काय?”
22येशू त्याला म्हणाला, “सात वेळा असे मी तुला सांगत नाही, तर सात गुणिले सत्तर वेळा. 23कारण स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे, त्या राजाला त्याच्या दासांकडून हिशोब घ्यावा असे वाटले. 24तो हिशोब घेऊ लागला तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्याच्यापुढे आणण्यात आले. 25त्या कर्जदाराकडे फेड करायला काही नसल्यामुळे धन्याने हुकूम सोडला की, तो, त्याची बायको व मुले आणि त्यांचे जे काही असेल, ते विकून फेड करून घ्यावी. 26त्या दासाने त्याच्या पाया पडून विनंती केली, “मला समजून घ्या, म्हणजे मी तुमचे सर्व कर्ज फेडेन.’ 27त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने दासाचे कर्ज माफ केले व त्याला जाऊ दिले.
28तोच दास बाहेर गेल्यावर त्याला त्याच्या सोबतीचा एक दास भेटला. त्याच्याकडून त्याचे थोडे कर्ज येणे होते. तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, “तुझ्याकडून माझे येणे आहे, ते देऊन टाक.’ 29त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, “मला समजून घे म्हणजे मी तुझे कर्ज फेडेन.’ 30पण त्याचे न ऐकता त्याने सोबतीच्या दासाला कर्ज फेडेपर्यंत तुरुंगात टाकले. 31घडलेला हा प्रकार पाहून त्याच्या सोबतीचे इतर दास अतिशय अस्वस्थ झाले. त्यांनी ते वृत्त त्यांच्या धन्याला सांगितले. 32त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, “अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी तुझे सर्व कर्ज माफ केले. 33मी जशी तुझ्यावर दया केली, तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय?’ 34आणि त्याचा धनी त्याच्यावर रागावला व त्याचे कर्ज फिटेपर्यंत त्याने त्याला हालहाल करणाऱ्यांच्या हाती तुरुंगात पाठवले.
35म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण स्वतःच्या भावाला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिताही तुम्हांला क्षमा करणार नाही.”

المحددات الحالية:

मत्तय 18: MACLBSI

تمييز النص

شارك

نسخ

None

هل تريد حفظ أبرز أعمالك على جميع أجهزتك؟ قم بالتسجيل أو تسجيل الدخول