योहान 6

6
पाच हजारांना भोजन
1ह्यानंतर येशू गालीलच्या म्हणजे तिबिर्या सरोवराच्या पलीकडे गेला. 2मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग गेला कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करत असे, ती त्यांनी पाहिली होती. 3येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला. 4यहुदी लोकांचा ओलांडण सण जवळ आला होता. 5येशू दृष्टी वर करून व आपल्याकडे लोकसमुदाय येत आहे असे पाहून, फिलिपला म्हणाला, “ह्यांना भोजन द्यायला आपण भाकरी कोठून विकत आणाव्यात?” 6हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले, कारण आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होते.
7फिलिपने त्याला उत्तर दिले, “ह्यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले, तरी चांदीची दोनशे नाणी देऊन आणलेल्या भाकरीदेखील पुरणार नाहीत.”
8त्याच्या शिष्यांपैकी दुसरा एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्याला म्हणाला, 9“येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या पाच भाकरी व दोन मासे आहेत. परंतु त्या इतक्या लोकांना कशा पुरणार?”
10येशू म्हणाला, “लोकांना बसवा.” त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते म्हणून सर्व लोक बसले. तेथे सुमारे पाच हजार पुरुष होते. 11येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या. तसेच त्या माशांतूनही त्यांना पाहिजे तितके दिले. 12ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “काही वाया जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा.” 13जेवणाऱ्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या पाच भाकरींचे उरलेले तुकडे गोळा करून बारा टोपल्या भरल्या.
14त्याने केलेले हे चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, “जगात जो संदेष्टा येणार आहे, तो खरोखर हा होय.” 15त्यानंतर लोक येऊन आपल्याला राजा करण्याकरता बळजबरीने धरून नेण्याच्या बेतात आहेत, हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला.
येशू पाण्यावरून चालतो
16संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य सरोवराकडे गेले. 17ते मचव्यात बसून सरोवराच्या पलीकडे कफर्णहूमला जाऊ लागले. अंधार पडला तोवर येशू त्यांच्याजवळ आला नव्हता. 18जोरदार वारा सुटून सरोवराचे पाणी खवळू लागले. 19मचवा सुमारे पाच-सहा किलोमीटर वल्हवून नेल्यावर त्यांनी येशूला पाण्यावरून मचव्यापर्यंत चालत येताना पाहिले आणि त्यांचा थरकाप उडाला. 20तो त्यांना म्हणाला, “मी आहे, भिऊ नका.” 21त्यांनी आपणहून त्याला मचव्यात घेण्याची इच्छा दर्शवली. परंतु त्यांना जायचे होते त्या ठिकाणी मचवा लवकरच किनाऱ्याला लागला.
येशू - जीवनाची भाकर
22दुसऱ्या दिवशी, सरोवराच्या दुसऱ्या बाजूला जमलेल्या लोकांच्या लक्षात आले की, ज्या मचव्यात त्याचे शिष्य चढले होते त्याशिवाय तेथे दुसरा मचवा नव्हता. येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या मचव्यात चढला नव्हता, तर त्याचे शिष्य एकटे निघून गेले होते. 23जेथे प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्‍ली होती, त्या ठिकाणाजवळ तिबिर्याहून दुसरे लहान मचवे आले. 24तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नाहीत, असे लोकांनी पाहिले, तेव्हा ते त्या लहान मचव्यांत बसून येशूचा शोध घेत कफर्णहूमला आले.
25तो त्यांना सरोवराच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, “गुरुवर्य, येथे कधी आलात?”
26येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला निक्षून सांगतो, तुम्हांला माझ्या चिन्हांचा अर्थ समजला म्हणून नव्हे, तर भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून तुम्ही माझा शोध घेता. 27नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर शाश्वत जीवनासाठी, टिकणाऱ्या अन्नासाठी श्रम करा. ते मनुष्याचा पुत्र तुम्हांला देईल; कारण परमेश्वर पित्याने त्याच्यावर मान्यतेचा शिक्का मारला आहे.”
28ह्यावरून त्यांनी त्याला विचारले, “देवाची कार्ये आमच्या हातून व्हावीत म्हणून आम्ही काय करावे?”
29येशूने त्यांना उत्तर दिले, “देवाचे कार्य हेच आहे की, ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.”
30ह्यावरून ते त्याला म्हणाले, “असे कोणते चिन्ह आपण दाखवता की, जे पाहून आम्ही आपल्यावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता? 31आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्‍ला. असे लिहिले आहे: ‘त्याने त्यांना स्वर्गातून भाकर खायला दिली.’”
32येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मोशेने तुम्हांला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हांला देतो. 33कारण जो स्वर्गातून उतरतो व जगाला जीवन देतो तो परमेश्वराची भाकर आहे.”
34ते त्याला म्हणाले, “प्रभो, ही भाकर आम्हांला नित्य द्या.”
35येशू त्यांना म्हणाला, “मी जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो, त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याला कधीही तहान लागणार नाही. 36परंतु तुम्ही मला पाहिले असताही विश्वास ठेवत नाही, असे मी तुम्हांला सांगितले. 37ज्याला पिता माझ्याकडे सोपवतो, असा प्रत्येक जण माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो, त्याचा मी मुळीच अव्हेर करणार नाही. 38कारण स्वतःच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून मी स्वर्गातून उतरलो आहे 39आणि ज्याने मला पाठवले, त्याची इच्छा हीच आहे की, त्याने जे सर्व माझ्या स्वाधीन केले आहेत त्यांतून मी कुणालाही गमावू नये, तर शेवटच्या दिवशी मी त्या सर्वांना उठवावे. 40जे कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्यांना शाश्वत जीवन प्राप्त व्हावे आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवावे ही माझ्या पित्याची इच्छा आहे.”
41‘मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे’, असे तो म्हणाला म्हणून यहुदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले. 42ते म्हणाले, “हा योसेफचा मुलगा येशू आहे ना? ह्याचे आईबाप आपल्याला ठाऊक आहेत, तर मग ‘मी स्वर्गातून उतरलो आहे’, असे हा कसे काय म्हणतो?”
43येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आपसात कुरकुर करू नका. 44ज्याने मला पाठवले, त्या पित्याने ओढून घेतल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही आणि अशा माणसाला शेवटच्या दिवशी मी उठवीन. 45संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिले आहे की, ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील. जो पित्याचे ऐकून शिकला आहे, तो माझ्याकडे येतो. 46पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही, मात्र जो देवाकडचा आहे त्याने पित्याला पाहिले आहे. 47मी तुम्हांला ठामपणे सांगतो, जो विश्वास ठेवतो, त्याला शाश्वत जीवन मिळते. 48मी स्वतः जीवनाची भाकर आहे. 49तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्‍ला परंतु ते मरण पावले. 50मात्र स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की, ती जर कोणी खाल्‍ली, तर तो मरणार नाही. 51स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मी स्वतः आहे, ही भाकर जो कोणी खाईल, तो सर्व काळ जगेल, जी भाकर मी देईन, ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.”
52हे ऐकून यहुदी आपसात वाद घालू लागले व म्हणाले, “हा आपला देह आम्हांला खायला कसा देऊ शकतो?”
53येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला निश्चितपणे सांगतो, तुम्ही जोवर मनुष्याच्या पुत्राचा देह खात नाही व त्याचे रक्‍त पीत नाही, तोवर तुम्हांला जीवन मिळणार नाही. 54जो माझा देह खातो व माझे रक्‍त पितो, त्याला शाश्वत जीवन लाभले आहे आणि मी स्वतः त्याला शेवटच्या दिवशी उठवीन. 55माझा देह खरे अन्न आहे व माझे रक्‍त खरे पेय आहे. 56जो माझा देह खातो व माझे रक्‍त पितो, तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. 57जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसे जो मला खातो, तोही माझ्यामुळे जगेल. 58स्वर्गातून उतरलेली भाकर ती हीच आहे. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्‍ली, तरी ते मरण पावले. हे मात्र तसे नाही. ही भाकर जो खातो, तो सर्वकाळ जगेल.”
59कफर्णहूम येथील सभास्थानात शिकवण देत असताना त्याने ह्या गोष्टी सांगितल्या.
अल्पविश्‍वासू शिष्य
60त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, “हे वचन फार कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो?”
61आपले शिष्य ह्याविषयी वितंडवाद करत आहेत, हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, “ह्यामुळे तुमच्या मनात शंका दाटली आहे काय? 62मग मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता, तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहिले तर? 63आत्मा जीवन देणारा आहे, देहाचा काही लाभ नाही, मी जी वचने तुम्हांला सांगितली आहेत, ती आत्मा व जीवन आहेत. 64तरी पण विश्वास ठेवत नाहीत, असे तुमच्यात कित्येक आहेत.” विश्वास न ठेवणारे कोण आणि आपल्याला धरून देणारा कोण, हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होते. 65पुढे तो म्हणाला, “म्हणून मी तुम्हांला सांगितले की, पित्याने त्याला समर्थ केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही.”
पेत्राची येशूवरील दृढ श्रद्धा
66ह्यामुळे त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याकडे आले नाहीत. 67म्हणूनच येशू बारा जणांना म्हणाला, “तुमचीही निघून जायची इच्छा आहे काय?”
68शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, “प्रभो, आम्ही कोणाकडे जाणार? शाश्वत जीवन देणारी वचने आपल्याजवळ आहेत. 69आणि आता आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की, देवाचा पवित्र तो आपणच आहात.”
70येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्हां बारा जणांना मी निवडून घेतले नाही काय? तरी तुमच्यापैकी एक जण सैतान आहे.” 71हे शिमोन इस्कर्योतचा मुलगा यहुदा ह्याच्याविषयी तो बोलला, कारण तो बारा जणांपैकी एक होता व त्याचा विश्‍वासघात करणार होता.

Kleurmerk

Deel

Kopieer

None

Wil jy jou kleurmerke oor al jou toestelle gestoor hê? Teken in of teken aan

Gratis leesplanne en oordenkings oor योहान 6

YouVersion gebruik koekies om jou ervaring persoonlik te maak. Deur ons webwerf te gebruik, aanvaar jy ons gebruik van koekies soos beskryf in ons Privaatheidsbeleid