मत्तय 14

14
बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचा शिरच्छेद
1त्यावेळी प्रांताधिकारी हेरोदाने#14:1 हेरोद येशूंच्या जन्माच्या वेळी जो महान हेरोद होता त्याचा पुत्र येशूंविषयी ऐकले, 2तो आपल्या सेवकांना म्हणाला, “हा मेलेल्यातून जिवंत होऊन आलेला बाप्तिस्मा करणारा योहानच आहे! म्हणूनच आश्चर्यकर्म करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये दिसत आहे.”
3आता हेरोदाने आपली पत्नी हेरोदिया, जी पूर्वी त्याचा भाऊ फिलिप्प याची पत्नी होती हिच्या मागणीनुसार योहानाला बांधून तुरुंगात ठेवले होते. 4कारण योहान त्याला म्हणत असे: “तू तिला ठेवावे हे नियमाने योग्य नाही.” 5म्हणून हेरोद त्याचा जीव घेण्यास पाहत होता, पण लोकांना तो भीत होता, कारण योहान संदेष्टा आहे असे लोक मानत होते.
6हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियेच्या कन्येने पाहुण्यांसाठी नृत्य करून हेरोदाला खूप संतुष्ट केले. 7त्यामुळे वचन देऊन ती जे मागेल ते देण्याची त्याने शपथ वाहिली. 8तिने आपल्या आईच्या संकेताप्रमाणे म्हटले, “बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचे शिर एका तबकात मला द्या.” 9तेव्हा राजा अस्वस्थ झाला, पण आपल्या शपथेमुळे आणि भोजनाला आलेल्या पाहुण्यांमुळे त्याने मुलीची मागणी अंमलात आणण्यासाठी हुकूम दिला, 10आणि योहानाचा तुरुंगात शिरच्छेद करण्यात आला. 11त्याचे शिर एका तबकात आणून त्या मुलीला देण्यात आले व तिने ते आपल्या आईला दिले. 12योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शव घेतले आणि पुरले. नंतर जे घडले ते त्यांनी येशूंना सांगितले.
येशू पाच हजारांना जेवू घालतात
13जे घडले ते ऐकल्यानंतर, येशू एका होडीत बसून एकटेच दूर एकांतस्थळी गेले, परंतु हे गर्दीतील लोकांनी ऐकले, तेव्हा शहरातील लोक त्यांच्याकडे पायी चालत आले. 14जेव्हा येशू होडीतून उतरले, त्यांनी मोठा समुदाय पाहिला, तेव्हा त्यांना त्यांचा कळवळा आला व त्यांनी आजार्‍यांना बरे केले.
15संध्याकाळ झाल्यावर शिष्य येशूंकडे येऊन म्हणाले, “ही ओसाड जागा आहे शिवाय उशीरही होत आहे. लोकांना आसपासच्या गावात जाऊन काही अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या.”
16यावर येशूंनी उत्तर दिले, “त्यांना जाण्याची गरज नाही; तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.”
17त्यांनी उत्तर दिले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.”
18येशू म्हणाले, “ते माझ्याकडे आणा.” 19येशूंनी लोकांना गवतावर बसावयास सांगितले. मग येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले, स्वर्गाकडे पाहून त्याबद्दल आभार मानले आणि मग त्या भाकरी मोडून शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले. 20ते सर्वजण जेवले आणि तृप्त झाले आणि शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांनी बारा टोपल्या उचलल्या. 21जेवणार्‍या पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार होती. यात स्त्रिया व मुले यांची संख्या धरलेली नाही.
येशू पाण्यावरून चालतात
22लगेच येशूंनी आपल्या शिष्यांना होडीत बसून पुढे सरोवराच्या पैलतीराला जाण्यास सांगितले आणि ते स्वतः लोकांना निरोप देण्यासाठी मागे राहिले. 23त्यांना निरोप दिल्यावर, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेले. रात्र झाली तरी तिथे ते एकांती होते. 24तेव्हा होडी किनार्‍यापासून बरीच दूर गेली होती आणि वारा त्यांच्याविरुद्ध दिशेने वाहत असल्यामुळे लाटांनी हेलकावे खात होती.
25पहाटेच्या सुमारास येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आले. 26शिष्यांनी येशूंना सरोवरावरून चालताना पाहिले, तेव्हा ते फार घाबरले आणि ओरडून म्हणाले, “हे भूत आहे.”
27पण येशू त्यांना तत्काळ म्हणाले, “धीर धरा, मीच आहे. भिऊ नका.”
28मग पेत्र म्हणाला, “प्रभूजी, जर आपण असाल, तर पाण्यावरून चालत आपल्याकडे येण्यास मला सांगा.”
29ते म्हणाले “ये.”
तेव्हा पेत्र होडीतून उतरला आणि पाण्यावरून येशूंकडे चालत जाऊ लागला. 30परंतु उंच लाटांकडे त्याचे लक्ष गेले, तेव्हा तो घाबरला आणि लागला, “प्रभूजी, मला वाचवा!” त्याने आरोळी मारली.
31तत्क्षणी येशूंनी हात पुढे करून त्याला धरले. येशू म्हणाले, “अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?”
32मग जेव्हा ते होडीत चढले तेव्हा वादळ शांत झाले. 33होडीत असलेले दुसरे शिष्य त्यांच्या पाया पडून म्हणाले, “खरोखर तुम्ही परमेश्वराचे पुत्र आहात.”
34ते पलीकडे गेल्यावर गनेसरेत येथे उतरले. 35तेथील लोकांनी येशूंना ओळखले व आसपासच्या सर्व भागात संदेश पाठविला. लोकांनी सर्व आजारी लोकांना त्यांच्याकडे आणले. 36“तुमच्या झग्याच्या काठाला तरी आम्हाला शिवू द्या.” अशी त्यांनी त्यांना विनंती केली आणि जितक्यांनी त्यांना स्पर्श केला तितके सर्व बरे झाले.

Okuqokiwe okwamanje:

मत्तय 14: MRCV

Qhakambisa

Dlulisela

Kopisha

None

Ufuna ukuthi okuvelele kwakho kugcinwe kuwo wonke amadivayisi akho? Bhalisa noma ngena ngemvume