योहान 19
19
येशूंना क्रूसावर खिळण्याची शिक्षा दिली जाते
1मग पिलाताने येशूंना फटके मारविले. 2सैनिकांनी एक काट्यांचा मुकुट गुंफून त्यांच्या मस्तकांवर घातला. त्यांच्या अंगावर जांभळा झगा घातला. 3ते त्यांच्याकडे वारंवार जाऊन म्हणाले, “यहूद्यांचा राजा, तुझा जयजयकार असो!” आणि त्यांनी त्याच्या तोंडावर चापटा मारल्या.
4मग पिलात पुन्हा एकदा बाहेर आला आणि तिथे जमलेल्या यहूद्यांना म्हणाला, “पाहा, मी आता त्याला तुमच्यापुढे बाहेर आणत आहे, परंतु लक्षात ठेवा की मला त्याच्या ठायी कोणताही अपराध सापडला नाही.” 5येशू काट्यांचा मुकुट व जांभळा झगा घातलेले असे बाहेर आले, तेव्हा पिलात यहूद्यांना म्हणाला, “हा तो मनुष्य!”
6येशूंना पाहताच मुख्य याजक व त्यांचे अधिकारी ओरडू लागले, “क्रूसावर खिळा! क्रूसावर खिळा!”
परंतु पिलाताने उत्तर दिले, “तुम्हीच त्याला घेऊन जा आणि त्याला क्रूसावर खिळा. कारण माझ्या दृष्टीने पाहिले तर, त्याच्यावर दोष ठेवण्यासाठी मला कोणताही आधार सापडत नाही.”
7तेव्हा यहूदी अधिकार्यांनी आग्रहपूर्वक म्हटले, “आमचे नियमशास्त्र आहे, त्यानुसार त्याने मरण पावलेच पाहिजे, कारण त्याने स्वतःला परमेश्वराचा पुत्र म्हटले आहे.”
8हे ऐकल्यावर पिलात, अधिकच घाबरला. 9आणि तो राजवाड्यामध्ये परत गेला. “तू कुठून आला आहेस?” त्याने येशूंना विचारले, परंतु येशूंनी त्याला उत्तर दिले नाही. 10पिलाताने म्हटले, “तू माझ्याशी बोलण्यास नकार देतोस काय? तुला सोडण्याचा अथवा तुला क्रूसावर खिळण्याचा अधिकार मला आहे, हे तुला कळत नाही का?”
11तेव्हा येशू उत्तरले, “जर तुम्हाला वरून अधिकार दिला गेला नसता तर तो माझ्यावर चालला नसता. यास्तव ज्यांनी मला तुमच्या स्वाधीन केले त्यांचा पापदोष अधिक मोठा आहे.”
12तेव्हापासून, पिलात येशूंना मुक्त करण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु यहूदी पुढारी ओरडत राहिले, “तुम्ही या मनुष्याला सोडले, तर तुम्ही कैसराचे मित्र नाही; कारण जो कोणी स्वतःला राजा म्हणवितो तो कैसराचा विरोधी आहे.”
13हे ऐकल्यावर, पिलाताने येशूंना बाहेर आणले आणि फरसबंदी नावाची जागा, जिला अरामी#19:13 किंवा हिब्रू भाषेत गब्बाथा म्हणतात, तिथे तो न्यायासनावर बसला 14तो वल्हांडणाच्या तयारीचा दिवस असून; ती दुपारची वेळ होती.
“हा पाहा तुमचा राजा,” पिलात यहूदीयांना म्हणाला.
15पण लोकांनी अधिकच मोठ्याने गर्जना केली, “त्याला येथून न्या! त्याला येथून न्या! त्याला क्रूसावर खिळा!”
तेव्हा पिलाताने विचारले, “तुमच्या राजाला मी क्रूसावर खिळावे काय?”
त्यावर मुख्य याजक म्हणाले, “कैसराशिवाय आम्हाला दुसरा राजा नाही.”
16शेवटी पिलाताने येशूंना क्रूसावर खिळण्याकरिता त्यांच्या स्वाधीन केले.
येशूंना क्रूसावर खिळतात
सैनिकांनी त्यांना आपल्या ताब्यात घेतले. 17मग आपला स्वतःचा क्रूस वाहवून, ते कवटी म्हटलेल्या जागी आले, ज्याला अरामी भाषेमध्ये गोलगोथा म्हणतात. 18तिथे त्यांना आणि त्यांच्याबरोबर इतर दोघांना—त्यांच्या दोन्ही बाजूला एकएक व येशूंना त्यांच्यामध्ये असे क्रूसावर खिळले.
19पिलाताने त्यांच्या क्रूसावर एक लेखपत्रक लावले, ते असे होते:
यहूद्यांचा राजा, नासरेथकर येशू.
20अनेक यहूद्यांनी हे पत्रक वाचले, कारण येशूंना ज्या ठिकाणी क्रूसावर खिळले होते ते ठिकाण शहराच्या जवळ होते आणि क्रूसावरील लेख हा हिब्रू, लॅटिन व ग्रीक भाषांमध्ये लिहिलेला होता. 21मुख्य याजक पिलाताला म्हणाले, “यहूद्यांचा राजा असे लिहू नका” तर “मी यहूद्यांचा राजा आहे, असे या मनुष्याने म्हटले होते तसे लिहा.”
22तेव्हा पिलाताने उत्तर दिले, “मी जे लिहिले, ते लिहिले.”
23सैनिकांनी येशूंना क्रूसावर खिळल्यानंतर, त्यांनी त्यांची वस्त्रे घेतली आणि एकाएका सैनिकाला एक असे त्याचे चार विभागामध्ये वाटप केले, फक्त अंतर्वस्त्रे ठेवली. हा अंगरखा शिवलेला नसून वरपासून खालपर्यंत संपूर्ण विणलेला होता.
24ते एकमेकांना म्हणाले, “त्याचा अंगरखा आपण फाडू नये, आपणापैकी तो कोणाला मिळावा, हे पाहण्यासाठी आपण चिठ्ठ्या टाकू या.”
यामुळे पुढील शास्त्रलेख पूर्ण झाला:
“त्यांनी माझी वस्त्रे आपसात वाटून घेतली,
आणि माझ्या वस्त्रासाठी चिठ्ठ्या टाकल्या.”#19:24 स्तोत्र 22:18
म्हणूनच त्या सैनिकांनी याप्रमाणे केले.
25क्रूसाच्या जवळ येशूंची आई व तिची बहीण, क्लोपाची पत्नी मरीया आणि मरीया मग्दालिया उभ्या होत्या. 26मग येशूंनी आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्यांची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, “बाई,#19:26 ग्रीकमध्ये बाई हा शब्द अनादर करावा या उद्देशाने वापरलेला नाही. पाहा, हा तुझा पुत्र!” 27आणि त्यांनी त्या शिष्याला म्हटले, “पाहा, ही तुझी आई!” त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले.
येशूंचा मृत्यू
28यानंतर सर्वगोष्टी पूर्ण झाल्या आहेत हे जाणून शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून येशूंनी म्हटले, “मला तहान लागली आहे.” 29तिथे शिरक्यात भिजविलेला एक स्पंज एजोबाच्या काठीवर ठेवून व काठी उंच करून त्यांनी येशूंच्या ओठांना लावला. 30तो चाखल्यावर, येशू म्हणाले, “पूर्ण झाले आहे,” आणि त्यांनी मस्तक लववून प्राण सोडला.
31आता क्रूसावर खिळलेल्यांची शरीरे दुसर्या दिवसापर्यंत लटकत राहू नयेत, अशी यहूदी पुढार्यांची इच्छा होती. कारण हा तयारीचा दिवस होता आणि दुसरा दिवस हा एक विशेष शब्बाथ होता. म्हणून त्यांचे पाय मोडण्याचा हुकूम द्यावा, अशी विनंती त्यांनी पिलाताला केली, मग त्यांची शरीरे उतरवून घेता येतील. 32त्याप्रमाणे सैनिकांनी येशूंबरोबर क्रूसावर टांगलेल्या पहिल्याचे पाय मोडले मग दुसर्याचे ही मोडले. 33परंतु जेव्हा ते येशूंजवळ आले, तेव्हा ते आधीच मरण पावल्याचे त्यांना दिसून आले, म्हणून त्यांनी येशूंचे पाय मोडले नाहीत. 34तरीपण, सैनिकांपैकी एकाने त्यांच्या कुशीत भाला भोसकला, तेव्हा रक्त व पाण्याचा ओघ बाहेर पडला. 35ज्या मनुष्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आणि त्याची साक्ष खरी आहे. त्याला माहीत आहे की तो सत्य बोलत आहे आणि तो साक्ष देतो यासाठी की, तुम्हीही विश्वास ठेवावा. 36सैनिकांनी जे केले त्यामुळे पुढील शास्त्रलेख पूर्ण झाले: “त्याच्या हाडांपैकी एकही हाड मोडले जाणार नाही,”#19:36 निर्ग 12:46; गण 9:12; स्तोत्र 34:20 37आणि आणखी एक शास्त्रलेख असा आहे, “ज्याला त्यांनी भोसकले ते त्याच्याकडे पाहतील.”#19:37 जख 12:10
येशूंचा अंत्यसंस्कार
38त्यानंतर अरिमथियाकर योसेफाने येशूंचे शरीर पिलाताकडे मागितले. आता योसेफ येशूंचा एक गुप्त अनुयायी असून यहूदी पुढार्यांना भीत होता. पिलाताच्या परवानगीने, तो आला आणि येशूंचे शरीर घेऊन गेला. 39जो येशूंकडे रात्री आलेला होता, तो निकदेमही त्याच्याबरोबर होता व त्याने आपल्याबरोबर गंधरस व अगरू यांचे सुमारे चौतीस कि.ग्रॅ.#19:39 मूळ भाषेत शंभर लित्रा मिश्रण आणले होते. 40येशूंचे शरीर घेऊन त्या दोघांनी ते सुगंधी द्रव्यासह तागाच्या वस्त्राने गुंडाळले. हे यहूद्यांच्या उत्तरक्रियेच्या रीतीप्रमाणे होते. 41ज्या ठिकाणी येशूंना क्रूसावर खिळले होते त्या ठिकाणी एक बाग होती आणि त्या बागेत एक नवीन कबर होती, त्यामध्ये आतापर्यंत कोणालाही ठेवले नव्हते. 42शब्बाथ सुरू होण्यापूर्वी सर्वकाही उरकण्याची घाई होती व ही कबर जवळच होती, म्हणून त्यांनी येशूंचे शरीर त्याच कबरेत ठेवले.
Okuqokiwe okwamanje:
योहान 19: MRCV
Qhakambisa
Dlulisela
Kopisha
Ufuna ukuthi okuvelele kwakho kugcinwe kuwo wonke amadivayisi akho? Bhalisa noma ngena ngemvume
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.