उत्पत्ती 23

23
साराहचा मृत्यू
1साराह एकशे सत्तावीस वर्षे जगली. 2साराह ही कनान देशातील किर्याथ-अर्बा (म्हणजे हेब्रोन) येथे मरण पावली. अब्राहाम तिच्यासाठी शोक व विलाप करण्यास गेला.
3आणि साराहच्या मृतदेहाजवळ उभे राहून अब्राहाम हेथीच्या लोकांना म्हणाला, 4“या देशात मी एक परकीय व अनोळखी आहे. कृपया मला माझ्या मृतास पुरण्याकरिता जमिनीचा एक भाग विकत द्या.”
5हेथी लोकांनी अब्राहामाला उत्तर दिले, 6“महाराज, आमचे ऐका. आमच्यामध्ये आपण एक पराक्रमी राजपुत्र आहात. तुम्ही आपल्या मृतांसाठी स्वतःच कबर निवडून त्यांना मूठमाती द्या. आपली खाजगी कबर तुम्हाला देण्यास आमच्यातील कोणीही नकार देणार नाही.”
7हे ऐकून अब्राहामाने त्या हेथी लोकांसमोर लवून मुजरा केला आणि तो म्हणाला, 8“मी आपल्या मयतास पुरावे अशी तुमची इच्छा असेल तर माझे ऐका, जोहराचा पुत्र एफ्रोन, 9याला त्याच्या शेताच्या टोकाला असलेली मकपेला नावाची गुहा मला विकत देण्यास माझ्यावतीने विनंती करा. तिची पूर्ण किंमत मी देईन आणि ती माझ्या कुटुंबीयांसाठी स्मशानभूमी होईल.”
10एफ्रोन हेथी हा हेथी लोकांसह बसलेला होता, त्या नगरचौकात असलेल्या सर्व हेथी लोकांसमक्ष तो अब्राहामाला म्हणाला, 11“नाही, महाराज, माझे ऐका; ती गुहा आणि ते शेत मी तुम्हाला#23:11 किंवा विकत देईन, माझ्या लोकांच्या देखत मी तुम्हाला ती देत आहे. तिथे तुम्ही तुमच्या मृतास मूठमाती द्या.”
12अब्राहामाने त्या देशातील लोकांना पुन्हा लवून मुजरा केला 13आणि त्या देशाच्या लोकांसमक्ष तो एफ्रोनास म्हणाला, “माझे ऐका, मला ती जागा तुझ्याकडून विकत घेऊ दे; त्या शेताची सर्व किंमत मी तुला देईन. मग मी माझ्या मृताला तिथे मूठमाती देईन.”
14हे ऐकून एफ्रोन अब्राहामाला म्हणाला, 15“महाराज, त्या जागेची किंमत केवळ चांदीची चारशे शेकेल#23:15 अंदाजे 4.6 कि.ग्रॅ. आहे; पण तुमच्या आणि माझ्यामध्ये त्याचे काय? तिथे आपल्या मृताला मूठमाती द्या.”
16तेव्हा अब्राहामाने कबूल केल्याप्रमाणे एफ्रोनाने हेथी लोकांच्या समक्ष सांगितलेली किंमत, म्हणजे चारशे शेकेल चांदी, त्या काळातील व्यापार्‍यांच्या परिमाणानुसार अब्राहामाने त्याला दिली.
17अशाप्रकारे मम्रेजवळील मकपेला येथे असलेले एफ्रोनाचे शेत आणि शेताच्या शेवटच्या टोकाला असलेली गुहा आणि त्याच्या चतुःसीमातील प्रत्येक झाड अब्राहामाने विकत घेण्याचा करार केला. 18हा करार शहराच्या वेशीसमोर सर्व हेथी लोकांच्या समक्ष झाला, ते सर्व अब्राहामाच्या कायमच्या मालकीचे झाले. 19त्यानंतर अब्राहामाने आपली पत्नी साराह हिला कनान देशात मम्रे (म्हणजे हेब्रोन) जवळ असलेल्या मकपेलाच्या शेतातील गुहेत पुरले. 20याप्रमाणे, हेथी लोकांनी स्मशानभूमी म्हणून शेत व त्यातील गुहा अब्राहामाच्या मालकीची झाल्याचा करार केला.

Qhakambisa

Dlulisela

Kopisha

None

Ufuna ukuthi okuvelele kwakho kugcinwe kuwo wonke amadivayisi akho? Bhalisa noma ngena ngemvume