उत्पत्ती 21

21
इसहाकाचा जन्म
1यानंतर याहवेहने आपल्या म्हणण्याप्रमाणे साराहवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पूर्ण केले. 2साराह गर्भवती झाली आणि परमेश्वराने नियुक्त केलेल्या वेळी अब्राहामाला त्याच्या वृद्धापकाळात तिच्यापासून एक पुत्र झाला. 3अब्राहामाने साराहपासून जन्मलेल्या पुत्राचे नाव इसहाक असे ठेवले. 4इसहाक जन्मल्यानंतर आठ दिवसांनी, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे, अब्राहामाने त्याची सुंता केली. 5जेव्हा इसहाकाचा जन्म झाला, त्यावेळी अब्राहाम शंभर वर्षांचा होता.
6साराह म्हणाली, “परमेश्वराने मला हसविले आहे आणि जे याबद्दल ऐकतील, ते माझ्याबरोबर आनंद करतील.” 7आणि ती अजून म्हणाली, “अब्राहामाला कोणी सांगितले असते काय की साराह तिच्या बाळाला स्तनपान करेल? तरीही मी अब्राहामाला त्याच्या म्हातारपणी एक अपत्य दिले आहे.”
हागार आणि इश्माएल यांना घालवून देणे
8ते बाळ वाढू लागले आणि ज्या दिवशी इसहाकाचे दूध तोडण्यात आले, त्या दिवशी अब्राहामाने एक मोठी मेजवानी दिली. 9परंतु अब्राहामाला इजिप्त देशाची स्त्री हागार, हिच्यापासून झालेला पुत्र, इसहाकाला चिडवीत असताना साराहने पाहिले. 10तेव्हा ती अब्राहामाला म्हणाली, “दासी व तिचा पुत्र यांना घालवून द्या; कारण त्या स्त्रीचा पुत्र कधीही माझा पुत्र इसहाक याच्याबरोबर वारसा वाटून घेणार नाही.”
11ही बाब अब्राहामाला खूप त्रास देत होती कारण ती त्याच्या मुलाची होती. 12तरी परमेश्वराने अब्राहामाला सांगितले, “तुझी स्त्री गुलाम आणि तिचा पुत्र यांच्यामुळे तू मनस्ताप करून घेऊ नकोस. साराहच्या म्हणण्याप्रमाणे कर, कारण इसहाकाद्वारेच तुझी संतती#21:12 किंवा बीज वाढेल. 13त्या दासीपुत्रापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करेन, कारण तोही तुझा पुत्र आहे.”
14दुसर्‍या दिवशी अब्राहाम सकाळीच उठला, त्याने प्रवासासाठी भोजन आणि पाण्याची कातडी पिशवी हागारेला दिली. ती तिच्या खांद्यावर अडकवून मुलासह तिची रवानगी केली. ती तिथून निघाली व बेअर-शेबाच्या अरण्यात भटकू लागली.
15जवळचे पाणी संपल्यावर तिने आपल्या पुत्राला एका झुडूपाखाली ठेवले, 16आणि ती त्याच्यापासून सुमारे बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन बसली, “माझ्या बाळाचा मृत्यू मला पाहावयाला नको आहे,” असे म्हणून ती हुंदके देऊन रडू लागली.
17मग परमेश्वराने त्या मुलाच्या रडणे ऐकले आणि परमेश्वराचा दूत आकाशातून हागारेला हाक मारून म्हणाला, “हागारे, तुला काय झाले आहे? भिऊ नकोस; कारण परमेश्वराने मुलाचे रडणे ऐकले आहे. 18ऊठ, त्याला उचलून घे, कारण मी त्याच्यापासून एक मोठे राष्ट्र निर्माण करेन.”
19मग परमेश्वराने तिचे डोळे उघडले आणि तिला एक पाण्याची विहीर दिसली. तेव्हा तिने आपली पाण्याची मसक भरून घेतली आणि त्या मुलाला पाणी पाजले.
20परमेश्वर त्या मुलासोबत होते. तो पारानच्या रानात लहानाचा मोठा होऊन एक तरबेज तिरंदाज झाला; 21पुढे तो पारानच्या रानात राहत असताना त्याच्या आईने त्याचा इजिप्त देशातील एका मुलीसह विवाह करून दिला.
अबीमेलेखाचा अब्राहामाशी करार
22याच सुमारास अबीमेलेख राजा व त्याचा सेनापती पीकोल. हे अब्राहामाकडे आले, ते त्याला म्हणाले, “तू जे काही करतोस त्यात परमेश्वर तुला साहाय्य करतात. 23तर परमेश्वराच्या नावाने तू मला असे वचन दे की, तू माझ्याशी, माझ्या मुलांशी किंवा वंशजांशी कपटनीतीने वागणार नाहीस. ज्याप्रमाणे मी तुझ्याशी मित्रत्वाने वागलो आहे, त्याप्रमाणेच तूही माझ्या देशाशी मित्रत्वानेच वागशील.”
24अब्राहाम म्हणाला, “ठीक आहे, मी तुला शपथ देतो.”
25“पण तुझ्या सेवकांनी माझ्या नोकरांपासून जबरदस्तीने एक विहीर हिरावून घेतली आहे त्याचे काय?” अब्राहामाने अबीमेलेखकडे तक्रार केली. 26“हे तर मी पहिल्यांदाच ऐकत आहे,” अबीमेलेख राजाने उद्गार काढले, “आणि याला कोण जबाबदार आहे याची मला काहीच कल्पना नाही. हे तू मला आधी का सांगितले नाहीस?”
27मग अब्राहामाने मेंढरे आणि बैल घेतले आणि अबीमेलेखाला दिले आणि त्या दोघांनी करार केला. 28पण अब्राहामाने सात मेंढ्या बाजूला काढून ठेवल्या, 29तेव्हा अबीमेलेखाने अब्राहामाला विचारले, “तू असे का करीत आहेस? त्या मेंढ्या बाजूला का काढीत आहेस?”
30यावर अब्राहामाने उत्तर दिले, “ही विहीर मीच खोदली आहे, याचे जाहीर प्रमाण म्हणून या मेंढ्या मी तुला देणगीदाखल देत आहे.”
31म्हणून त्या वेळेपासून त्या विहिरीचे नाव बेअर-शेबा#21:31 बेअर-शेबा अर्थात् शपथेची विहीर पडले. कारण दोघांनी त्याच ठिकाणी शपथ घेऊन करार केला होता.
32बेअर-शेबा येथे करार केल्यानंतर अबीमेलेख आणि त्याचा सेनापती पीकोल पलिष्ट्यांच्या देशात परतले. 33अब्राहामाने बेअर-शेबा येथे टमरिस्क म्हणजे एशेल नावाचे झाड लावले आणि सनातन परमेश्वर याहवेहची आराधना केली. 34आणि अब्राहाम पलिष्ट्यांच्या देशात दीर्घकाल राहिला.

Qhakambisa

Dlulisela

Kopisha

None

Ufuna ukuthi okuvelele kwakho kugcinwe kuwo wonke amadivayisi akho? Bhalisa noma ngena ngemvume