मत्तय 19

19
विवाहबंधनाची ईश्वरनिर्मित दृढता
1हे प्रबोधन केल्यावर येशू गालीलहून निघून यार्देन नदीच्या पलीकडे यहुदिया प्रांतात गेला. 2लोकांचा समुदाय त्याच्यामागे गेला आणि त्याने त्यांना तेथे बरे केले.
3त्यानंतर काही परुशी तेथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने विचारू लागले, “कोणत्याही कारणावरून पतीने पत्नीला सूटपत्र देणे धर्मशास्त्राला धरून आहे काय?”
4त्याने उत्तर दिले, “तुम्ही हे वाचले नाही काय?:
त्यांच्या निर्माणकर्त्याने त्यांना
सुरुवातीला स्त्री व पुरुष
असे निर्माण केले,
5त्यामुळेच पती आपल्या आईवडिलांना
सोडून त्याच्या पत्नीला जडून राहील
आणि ती दोघे एकदेह होतील.
6परिणामी ती पुढे दोन नव्हेत
तर एकदेह आहेत
म्हणून देवाने जे जोडले आहे,
ते मनुष्याने विभक्त करू नये.”
7ते त्याला म्हणाले, “तर मग सूटपत्र देऊन तिला सोडून द्यावे, असा कायदा मोशेने कसा दिला?”
8तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हांला तुमच्या बायका सोडून देण्याची परवानगी दिली, पण प्रारंभी तसे नव्हते. 9मी तुम्हांला सांगतो, जो कोणी स्वतःच्या पत्नीला विवाहबाह्य संबंधाच्या कारणाशिवाय सूटपत्र देतो व दुसरे लग्न करतो तो व्यभिचार करतो [आणि जो कोणी अशा सोडून दिलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो, तोही व्यभिचार करतो.]”
10शिष्य त्याला म्हणाले, “पत्नीच्या बाबतीत पुरुषाची जबाबदारी अशी असली तर लग्न न केलेले बरे.”
11तो त्यांना म्हणाला, “सर्व जण हे वचन स्वीकारू शकत नाहीत, पण ज्यांच्याकरता ते देण्यात आले आहे, तेच ते स्वीकारू शकतात; 12कारण लग्न न करण्याची विविध कारणे आहेतः काही जणांची जन्मतःच अशी जडणघडण झालेली असते की, ते लग्न करू शकत नाहीत; काही जणांना माणसांनी तसे बदलले म्हणून लग्न करता येत नाही आणि इतर काही जण स्वर्गाच्या राज्यासाठी लग्न करत नाहीत. ज्याला हे स्वीकारता येते, त्याने स्वीकारावे.”
लहान मुलांना आशीर्वाद
13येशूने लहान मुलांवर हात ठेवून प्रार्थना करावी म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी त्या लोकांना दटावले. 14येशू म्हणाला, “लहान मुलांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना अडवू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.”
15त्यांच्यावर हात ठेवून प्रार्थना केल्यानंतर तो तेथून निघून गेला.
शाश्वत जीवनप्राप्तीविषयी प्रश्न
16एकदा एक जण येऊन येशूला म्हणाला, “गुरुजी, आपण किती चांगले आहात! मला शाश्‍वत जीवन मिळावे, म्हणून मी कोणते चांगले काम केले पाहिजे?”
17तो त्याला म्हणाला, “चांगले म्हणजे काय ह्याविषयी मला का विचारतोस? एकट्या परमेश्वराशिवाय कोणीही चांगला नाही. तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ.”
18तो त्याला म्हणाला, “कोणत्या?” येशू म्हणाला, “खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, 19तुझ्या वडिलांचा व तुझ्या आईचा सन्मान कर आणि जशी स्वतःवर तशी तुझ्या शेजाऱ्यावर प्रीती कर.”
20तो युवक त्याला म्हणाला, “मी हे सर्व पाळले आहे; माझ्यात अजून काय उणे आहे?”
21येशू त्याला म्हणाला, “तू पूर्ण होऊ पाहतोस तर जा. तुझे जे काही असेल ते विकून जे मिळेल ते गोरगरिबांना दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि नंतर येऊन माझा शिष्य हो.”
22पण हे ऐकून तो युवक खिन्न होऊन निघून गेला; कारण त्याच्याकडे फार संपत्ती होती.
संपत्तीची आडकाठी
23नंतर येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, स्वर्गाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण असेल! 24मी पुन्हा तुम्हांला सांगतो, धनवानाने देवाच्या राज्यात जाणे, ह्यापेक्षा उंटाने सुईच्या नेढ्यातून जाणे सोपे आहे.”
25हे ऐकून शिष्य अत्यंत विस्मित होऊन म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?”
26परंतु येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “माणसांना हे अशक्य आहे. देवाला मात्र सर्व काही शक्य आहे.”
27पेत्राने उत्तरादाखल त्याला म्हटले, “पाहा, आम्ही सर्व काही सोडून आपल्यामागे आलो आहोत, तर आम्हांला काय मिळेल?”
28येशूने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, नव्या उत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल, तेव्हा माझ्यामागे आलेले तुम्हीही बारा राजासनांवर बसून इस्राएलच्या बारा वंशांचा न्यायनिवाडा कराल. 29तसेच ज्याने घरे, भाऊ, बहिणी, वडील, आई, पत्नी, मुले किंवा शेते माझ्या नावाकरता सोडली आहेत, त्याला शंभरपटीने मिळून शाश्‍वत जीवन वतन म्हणून प्राप्त होईल. 30तरी आता जे पहिले आहेत त्यांच्यापैकी पुष्कळ शेवटचे व आता जे शेवटचे आहेत त्यांच्यापैकी पुष्कळ पहिले होतील.

Okuqokiwe okwamanje:

मत्तय 19: MACLBSI

Qhakambisa

Dlulisela

Kopisha

None

Ufuna ukuthi okuvelele kwakho kugcinwe kuwo wonke amadivayisi akho? Bhalisa noma ngena ngemvume

Ividiyo ye- मत्तय 19