YouVersion 標識
搜索圖示

लूक 15

15
हरवलेले मेंढरू
1एके दिवशी पुष्कळ जकातदार व पापी लोक येशूचा संदेश ऐकण्यासाठी त्याच्याजवळ आले असता 2परुशी व शास्त्री अशी कुरकुर करू लागले की, हा पापी लोकांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो. 3तेव्हा त्याने त्यांना हा दाखला सांगितला:
4“तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की, त्याच्याजवळ शंभर मेंढरे असता त्यांतून एक हरवले तर नव्याण्णव रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध घेत नाही? 5ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यांवर घेतो. 6घरी येऊन मित्रांना व शेजाऱ्यांना एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, ‘माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’ 7त्याचप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही, अशा नव्याण्णव नीतिमान लोकांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हांला सांगतो.
हरवलेले नाणे
8तसेच अशी कोण स्त्री आहे की, जिच्याजवळ दहा चांदीची नाणी असता त्यांतून एक हरवले तर दिवा पेटवून व घर झाडून ते सापडेपर्यंत ती काळजीपूर्वक शोध घेत राहत नाही? 9ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारणींना बोलावून म्हणते, ‘माझे हरवलेले नाणे मला सापडले म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’ 10त्याचप्रमाणे, पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद केला जातो, हे मी तुम्हांला सांगतो.”
उधळपट्टी करणारा मुलगा
11नंतर येशू म्हणाला, “एका मनुष्याला दोन मुलगे होते. 12त्यांपैकी धाकटा वडिलांना म्हणाला, ‘बाबा, मालमत्तेचा माझा हिस्सा मला द्या.’ वडिलांनी त्यांच्यांत मालमत्तेची वाटणी केली. 13फार दिवस झाले नाहीत, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला, तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. 14त्याने त्याच्याजवळ जे होते ते सर्व खर्च करून टाकल्यावर त्या देशात भीषण दुष्काळ पडला. त्याला अडचण भासू लागली. 15तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ काम मागण्यासाठी गेला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारायला पाठवले. 16डुकरे खात असत त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे, अशी त्याला फार इच्छा होई. कारण त्याला कोणी काही देत नसे. 17नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, ‘माझ्या वडिलांच्या किती तरी मोलकऱ्यांना अन्‍नाची रेलचेल आहे! आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. 18मी उठून माझ्या वडिलांकडे जाईन व त्यांना म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. 19आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा.’ 20तो उठून आपल्या वडिलांकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या वडिलांनी त्याला पाहिले. त्यांना त्याचा कळवळा आला. धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्यांनी त्याचे मुके घेतले. 21मुलगा त्यांना म्हणाला, ‘बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी पात्र नाही.’ 22वडिलांनी दासांना सांगितले, ‘लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायांत जोडे घाला, 23पुष्ट वासरू आणून कापा, आपण आनंदोत्सव साजरा करू या; 24कारण हा माझा मुलगा मरण पावला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.’ त्यानंतर ते आनंदोत्सव करू लागले.
25तेव्हा त्याचा थोरला मुलगा शेतात होता, तो घराजवळ आला. त्याने गायनवादन व नृत्य ह्यांचा आवाज ऐकला. 26त्याने एका चाकराला बोलावून विचारले, ‘हे काय चालले आहे?’ 27त्याने त्याला सांगितले, ‘तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापले आहे.’
28हे ऐकल्यावर तो रागावला व आत जाईना. तेव्हा त्याचे वडील बाहेर आले व त्याची समजूत घालू लागले. 29परंतु त्याने वडिलांना उत्तर दिले, ‘पाहा, मी इतकी वर्षे तुमची सेवाचाकरी करत आहे, तुमची एकही आज्ञा मी कधी मोडली नाही, तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. 30मात्र ज्याने तुमची मालमत्ता वेश्यांबरोबर उधळून टाकली तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले.’ 31त्याने त्याला म्हटले, ‘मुला, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस, माझे जे काही आहे, ते सर्व तुझेच आहे. 32तरीदेखील उत्सव आणि आनंद करणे आवश्यक आहे; कारण हा तुझा भाऊ निधन पावला होता, तो जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.’”

目前選定:

लूक 15: MACLBSI

醒目顯示

分享

複製

None

想要在所有設備上保存你的醒目顯示嗎? 註冊或登入