YouVersion 標識
搜索圖示

उत्पत्ती 2

2
1ह्याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्वकाही सिद्ध झाले.
2देवाने केलेले आपले काम सातव्या दिवशी संपवले, केलेल्या सर्व कामापासून त्याने सातव्या दिवशी विसावा घेतला.
3देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला; कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला.
4आकाश व पृथ्वी ह्यांची परमेश्वर1 देवाने उत्पत्ती केली, तेव्हाचा उत्पत्तिक्रम हा होय.
5परमेश्वर देवाने आकाश व पृथ्वी ही केली तेव्हा शेतातले कोणतेही उद्भिज्ज पृथ्वीवर नव्हते आणि शेतातली कोणतीही वनस्पती अद्याप उगवली नव्हती, कारण परमेश्वर देवाने अजून पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता, आणि जमिनीची मशागत करायला कोणी मनुष्य नव्हता;
6मात्र पृथ्वीवरून धुके वर जात असे व त्याने जमिनीच्या सर्व पृष्ठभागावर सिंचन होत असे.
7मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यांत जीवनाचा श्वास फुंकला; तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला.
एदेन बाग
8परमेश्वर देवाने पूर्वेला एदेनात बाग लावली आणि तिच्यात आपण घडवलेल्या मनुष्याला ठेवले.
9परमेश्वर देवाने दिसण्यात सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातींची झाडे, बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड, आणि बर्‍यावाइटाचे ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून उगववली.
10बागेला पाणी देण्यासाठी एदेनात एक नदी उगम पावली; तेथून ती निघून तिचे फाटे फुटून चार नद्या झाल्या.
11पहिलीचे नाव पीशोन; ही सगळ्या हवीला देशाला वेढते; तेथे सोने सापडते;
12ह्या देशाचे सोने उत्तम असून येथे मोती व गोमेद सापडतात.
13दुसर्‍या नदीचे नाव गीहोन; ही सगळ्या कूश देशाला वेढते.
14तिसर्‍या नदीचे नाव हिद्दकेल; ही अश्शूरच्या पूर्वेला वाहते. चौथ्या नदीचे नाव फरात.
15परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करायला ठेवले.
16तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की, “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा;
17पण बर्‍यावाइटाचे ज्ञान करून देणार्‍या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.”
18मग परमेश्वर देव बोलला, “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही; तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करीन.”
19परमेश्वर देवाने सर्व वनपशू आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडवल्यावर आदाम त्यांना कोणती नावे देतो हे पाहावे म्हणून त्याच्याकडे ते त्याने नेले; तेव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले.
20आदामाने सर्व ग्रामपशू, आकाशातील पक्षी व सर्व वनपशू, ह्यांना नावे दिली; पण आदामाला कोणी अनुरूप साहाय्यक मिळेना.
21मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली, आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली, तिची जागा मांसाने भरून आली;
22परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले.
23तेव्हा आदाम म्हणाला, “आता ही मात्र माझ्या हाडांतले हाड व मांसातले मांस आहे; हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनवली आहे.”
24ह्यास्तव पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.
25आदाम व त्याची स्त्री ही दोघे नग्न होती; तरी त्यांना संकोच वाटत नसे.

醒目顯示

分享

複製

None

想要在所有設備上保存你的醒目顯示嗎? 註冊或登入

YouVersion 使用 cookie 來個性化你的體驗。透過使用我們的網站,你即接受我們按照我們的 隱私政策所述來使用 cookie。