उत्पत्ती 13

13
अब्राम आणि लोट विभक्त होतात
1अशा रीतीने अब्रामाने आपली पत्नी, सर्व संपत्ती आणि लोटाला घेऊन इजिप्त देश सोडला आणि ते नेगेव, म्हणजे दक्षिण, येथे पोहोचले. 2अब्राम जनावरांचे मोठे कळप, सोने व चांदी यांनी खूप श्रीमंत झाला होता.
3नंतर ते नेगेवहून बेथेलच्या रोखाने उत्तरेकडे गेले. बेथेल व आय यांच्यामध्ये त्यांनी पूर्वी तळ दिला होता 4व वेदी बांधली होती, तिथे पोहोचल्यावर अब्रामाने पुन्हा एकदा याहवेहची उपासना केली.
5आता लोट, जो अब्रामासह फिरत होता, त्याच्याजवळही मेंढरे, गुरे आणि डेरे होते. 6परंतु ते एकत्र राहत असताना ती जमीन त्यांना पुरेशी होऊ शकत नव्हती, कारण त्यांची संपत्ती इतकी मोठी होती की ते एकत्र राहू शकत नव्हते. 7कनानी व परिज्जी हे लोक देखील तिथे राहत होते. अब्राम व लोट यांच्या गुराख्यामध्ये भांडणे होऊ लागली.
8तेव्हा अब्राम लोटाला म्हणाला, “तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये, किंवा माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यात भांडणे नसावी. कारण आपण जवळचे भाऊबंद आहोत. 9तुझ्यापुढे संपूर्ण देश नाही काय? आपण विभक्त होऊ या. जर तू डावीकडे गेला तर मी उजवीकडे जाईन आणि जर तू उजवीकडे गेला तर मी डावीकडे जाईन.”
10तेव्हा लोटाने आपली नजर सभोवार फिरविली आणि यार्देन नदीकडील सोअरकडे पाहिले की भरपूर पाणी असलेले, याहवेहच्या बागेसारखे आणि इजिप्त देशासारखे ठिकाण होते. (ही घटना याहवेहने सदोम आणि गमोराचा नाश करण्याआधीची आहे.) 11मग लोटाने यार्देनेची सगळी तळवट निवडली आणि तो पूर्वेकडे निघाला. अशा रीतीने लोट व अब्राम विभक्त झाले. 12अब्राम कनान देशात राहिला आणि लोटाने यार्देनेच्या पूर्वतीरावरील तळवटीतील शहरांमध्ये मुक्काम करीत सदोम शहरापाशी तळ दिला. 13सदोम शहरातील लोक दुष्ट होते आणि याहवेहच्या विरुद्ध महापातक करणारे होते.
14लोट अब्रामापासून विभक्त झाल्यानंतर याहवेह अब्रामाला म्हणाले, “तू जिथे आहेस तिथून उत्तर, नेगेव दक्षिण आणि पूर्व, पश्चिम अशी चहूकडे आपली नजर टाक. 15जो सर्व देश तू पाहतोस तो मी तुला आणि तुझ्या वंशजांना देईन. 16मी तुझी संतती पृथ्वीवरील धुळीच्या कणांइतकी करेन, जर कोणाला धुळीच्या कणांची गणती करता आली, तर तुझ्या संततीचीही गणना होईल. 17आणि मी जो देश तुला देणार आहे, त्याच्या लांबी व रुंदीपर्यंत चालत जा.”
18मग अब्रामाने हेब्रोनजवळ असलेल्या मम्रेच्या महान एलावृक्षाजवळ जाऊन तळ दिला आणि तिथे त्याने याहवेहसाठी एक वेदी बांधली.

醒目顯示

分享

複製

None

想在你所有裝置上儲存你的醒目顯示?註冊帳戶或登入