YouVersion 標誌
搜尋圖標

योहा. 2

2
काना येथील लग्न
1नंतर तिसर्‍या दिवशी गालील प्रांतातील काना नगरात एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. 2येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमत्रंण होते. 3मग द्राक्षरस संपला तेव्हा, येशूची आई त्यास म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही.” 4येशू तिला म्हणाला, “मुली, याच्याशी तुझा माझा काय संबंध आहे? माझी वेळ अजून आली नाही.” 5त्याची आई नोकरांना म्हणाली, “हा तुम्हास जे काही सांगेल ते करा.” 6तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण, यहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते, त्यामध्ये दोन दोन, तीन तीन मण पाणी मावेल असे ते होते. 7येशू त्यांना म्हणाला, “रांजण पाण्याने भरा.” आणि त्यांनी ते काठोकाठ भरले. 8मग त्याने नोकरांना सांगितले, “आता आता त्यातले काढून भोजनकारभार्‍याकडे घेऊन जा,” तेव्हा त्यांनी ते नेले. 9द्राक्षरस बनलेले पाणी? भोजनकारभार्‍याने जेव्हा चाखले आणि तो कुठला होता हे त्यास माहीत नव्हते, पण ज्या नोकरांनी पाणी काढले त्यांना माहीत होते, तेव्हा भोजनकारभारी वराला बोलावून, 10त्यास म्हटले, “प्रत्येक मनुष्य अगोदर चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग बेचव वाढतो, पण तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहेस.” 11येशूने गालील प्रांतातील काना नगरात आपल्या अद्भुत चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
12त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य खाली कफर्णहूमास गेले; पण ते तेथे फार दिवस राहिले नाहीत.
मंदिराचे शुध्दीकरण
13मग यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला व येशू यरूशलेम शहरास वर गेला. 14आणि त्यास परमेश्वराच्या भवनात गुरे, मेंढरे आणि कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले आढळले. 15तेव्हा त्याने दोर्‍यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वांना परमेश्वराच्या भवनातून घालवून दिले. सराफांचा पैसाही ओतून टाकला आणि चौरंग पालथे केले. 16व त्याने कबुतरे विकणार्‍यांना म्हटले, “ह्यांना येथून काढा, माझ्या स्वर्गीय पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.” 17तेव्हा ‘तुझ्या भवनाविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील,’ असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले. 18त्यावरून यहूदी त्यास म्हणाले, “तुम्ही हे करता तर आम्हास तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखवता?” 19येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही हे परमेश्वराचे भवन मोडून टाका आणि मी तीन ते दिवसात उभारीन.” 20यावरुन यहूदी अधिकारी म्हणाले, “परमेश्वराचे हे भवन बांधण्यास शेहचाळीस वर्षे लागली आणि आणि तुम्ही हे तीन दिवसात उभारणार काय?” 21तो तर आपल्या शरीररूपी भवनाविषयी बोलला होता. 22म्हणून तो असे म्हणत असे हे तो मरण पावलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रलेखावर व येशूने उच्चारलेल्या वचनावर विश्वास ठेवला.
23आता वल्हांडण सणाच्या वेळी, तो यरूशलेम शहरात असता, त्याने केलेली चिन्हे पाहून पुष्कळ जणांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला. 24असे असले तरी येशू त्यांना ओळखून असल्यामुळे त्यास स्वतःला त्यांच्यावर विश्वास नव्हता. 25शिवाय, मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी याची त्यास गरज नव्हती; कारण मनुष्यात काय आहे हे तो ओळखीत होता.

醒目顯示

分享

複製

None

想在你所有裝置上儲存你的醒目顯示?註冊帳戶或登入