YouVersion 標誌
搜尋圖標

लूक 24

24
प्रभू येशूचे पुनरुत्थान
1मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस, आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या.
2तेव्हा कबरेवरून धोंड लोटलेली आहे असे त्यांना आढळले.
3त्या आत गेल्यावर त्यांना [प्रभू येशूचे] शरीर सापडले नाही.
4मग असे झाले की, त्याविषयी त्यांना भ्रांत पडली, तेव्हा पाहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले.
5तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, “तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता?
6तो येथे नाही, तर उठला आहे; तो गालीलात होता तेव्हाच त्याने तुम्हांला काय सांगितले ह्याची आठवण करा;
7ते असे की, मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे, व तिसर्‍या दिवशी त्याने पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे.”
8तेव्हा त्यांना त्याच्या बोलण्याची आठवण झाली;
9आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी अकरा प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना हे सगळे वर्तमान सांगितले.
10त्या मग्दालीया मरीया, योहान्ना व याकोबाची आई मरीया ह्या होत्या. त्यांच्याबरोबर ज्या दुसर्‍या होत्या त्यांनीही हे वर्तमान प्रेषितांना सांगितले;
11परंतु हे वर्तमान त्यांना वायफळ बडबड वाटली; व ते त्यांनी खरे मानले नाही.
12[तेव्हा पेत्र उठून कबरेकडे धावत गेला व ओणवे होऊन त्याने आत पाहिले तेव्हा त्याला केवळ तागाची वस्त्रे दिसली; आणि झालेल्या गोष्टीविषयी आश्‍चर्य करत तो घरी गेला.]
अम्माऊस गावच्या रस्त्यावर येशूचे दोन शिष्यांना दर्शन
13त्याच दिवशी त्यांच्यातील दोघे जण यरुशलेमेपासून सुमारे चार कोसांवरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते.
14ते घडलेल्या सर्व गोष्टींविषयी एकमेकांशी संभाषण करत होते.
15आणि असे झाले की, ते संभाषण व चर्चा करत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला;
16परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते.
17त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात त्या कोणत्या?” तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले.
18मग त्यांच्यातील क्लयपा नावाच्या इसमाने त्याला उत्तर दिले, “अलीकडे यरुशलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय?”
19तो त्यांना म्हणाला, “कसल्या गोष्टी?” त्यांनी त्याला म्हटले, “नासरेथकर येशूविषयीच्या. तो देवाच्या व सर्व लोकांच्या समोर, कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता.
20त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकार्‍यांनी देहान्त शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खिळले.
21परंतु इस्राएलाची मुक्ती करणारा तो हाच अशी आमची आशा होती. शिवाय ह्या सर्व गोष्टी झाल्या तेव्हापासून आज तिसरा दिवस आहे.
22आणखी आमच्यातील ज्या कित्येक स्त्रिया कबरेकडे मोठ्या पहाटेस गेल्या होत्या त्यांनी तर आम्हांला थक्कच केले.
23त्यांना त्याचे शरीर सापडले नाही, तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की, आम्हांला देवदूतांचे दर्शन झाले; व देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे.
24मग आमच्याबरोबर जे होते त्यांपैकी कित्येक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले; पण त्यांना तो दिसला नाही.”
25मग तो त्यांना म्हणाला, “अहो निर्बुद्ध व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो!
26ख्रिस्ताने ही दु:खे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे, ह्याचे अगत्य नव्हते काय?”
27मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे ह्यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रलेखांतील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला.
28मग ज्या गावाला ते जात होते त्याच्याजवळ ते आले तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोख दाखवला;
29परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, “आमच्याबरोबर राहा; कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे.” तेव्हा तो त्यांच्याबरोबर राहायला आत गेला.
30मग असे झाले की, तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असताना त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली.
31तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले; मग तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला.
32तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, “तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?”
33मग त्याच घटकेस ते उठून यरुशलेमेस माघारी गेले, तेव्हा अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबर लोक एकत्र जमलेले त्यांना आढळले.
34ते म्हणत होते की, “प्रभू खरोखर उठला आहे व शिमोनाच्या दृष्टीस पडला.”
35मग त्यांनी वाटेतल्या घटना आणि त्याने भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले.
येशूचे प्रेषितांना दर्शन
36ते ह्या गोष्टी सांगत असता येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती असो.”
37पण ते घाबरून भयभीत झाले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले.
38त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही का घाबरलात व तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात?
39माझे हात व माझे पाय पाहा; मीच तो आहे; मला चाचपून पाहा; जसे मला हाडमांस असलेले पाहता तसे भुताला नसते.”
40असे बोलून त्याने त्यांना आपले हातपाय दाखवले.
41मग आनंदामुळे त्यांना ते खरे न वाटून ते आश्‍चर्य करत असता त्याने त्यांना म्हटले, “येथे तुमच्याजवळ खाण्यास काही आहे काय?”
42मग त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा [व मधाच्या पोळ्याचा काही भाग] दिला.
43तो घेऊन त्याने त्यांच्यादेखत खाल्ला.
44मग तो त्यांना म्हणाला, “मी तुमच्याबरोबर असताना तुम्हांला सांगितलेली माझी वचने हीच आहेत की, मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे ह्यांत माझ्याविषयी जे लिहिले आहे ते सर्व पूर्ण होणे अवश्य आहे.”
45तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले;
46आणि त्याने त्यांना म्हटले, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दु:ख सोसावे, तिसर्‍या दिवशी मेलेल्यांतून उठावे,
47आणि यरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्‍चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी.
48तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षी आहात.
49पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत यरुशलेम शहरात राहा.”
येशूचे स्वर्गारोहण
50नंतर त्याने त्यांना बेथानीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला.
51मग असे झाले की, तो त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात घेतला गेला.
52तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने यरुशलेमेस परत गेले;
53आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करत राहिले.

目前選定:

लूक 24: MARVBSI

醒目顯示

分享

複製

None

想在你所有裝置上儲存你的醒目顯示?註冊帳戶或登入