उत्पत्ती 13

13
अब्राम आणि लोट विभक्त होतात
1अब्राम आपली बायको, आपले सर्वस्व आणि लोट ह्यांना घेऊन मिसर देश सोडून नेगेबकडे गेला.
2तो कळप, रुपे व सोने ह्यांनी संपन्न होता.
3मग मजला करत करत तो नेगेबपासून बेथेलपर्यंत गेला; बेथेल व आय ह्यांच्या दरम्यान त्याने आरंभी डेरा दिला होता त्या ठिकाणी तो आला.
4त्याने प्रथम वेदी बांधली होती त्या ठिकाणी तो आला; तेथे त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली.
5अब्रामाबरोबर लोट जात होता त्याचीही मेंढरे, गुरेढोरे व पाले होती.
6त्यांना एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना; कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यांना एकत्र राहता येईना.
7शिवाय अब्रामाच्या व लोटाच्या गुराख्यांची भांडणे होऊ लागली; त्या काळी त्या देशात कनानी व परिज्जी ह्यांची वस्ती होती.
8अब्राम लोटाला म्हणाला, “हे पाहा, माझ्यातुझ्यामध्ये, आणि माझे गुराखी व तुझे गुराखी ह्यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहोत.
9सर्व देश तुला मोकळा नाही काय? तर माझ्यापासून वेगळा हो, तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन.”
10तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले; परमेश्वराने सदोम व गमोरा ह्यांचा नाश केला त्यापूर्वी सोअराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता.
11ही यार्देनची सर्व तळवट लोटाने स्वतःसाठी पसंत केली व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला; ते ह्याप्रमाणे एकमेकांपासून वेगळे झाले.
12अब्राम कनान देशात राहिला व लोट तळवटीच्या नगरांत राहिला, आणि मुक्काम करत करत त्याने आपला डेरा सदोमापर्यंत दिला.
13सदोमातील रहिवासी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातके करणारे होते.
14लोट अब्रामापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू आहेस तेथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्‍चिमेकडे दृष्टी लावून पाहा.
15कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देईन.
16मी तुझी संतती पृथ्वीच्या रज:कणांसारखी करीन; कोणाला पृथ्वीच्या रज:कणांची गणना करता आली तर तुझ्या संततीचीही गणना होईल.
17ऊठ, ह्या देशाची लांबीरुंदी फिरून पाहा, कारण तो मी तुला देणार आहे.”
18मग अब्राम मुक्काम करत करत हेब्रोनाजवळ मम्रेच्या एलोन राईत येऊन तेथे आपला डेरा देऊन राहिला; तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली.

醒目顯示

分享

複製

None

想在你所有裝置上儲存你的醒目顯示?註冊帳戶或登入