मलाखी 4

4
न्याय आणि कराराचे नूतनीकरण
1सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, “निश्चितच तो दिवस येत आहे, जो धगधगत्या भट्टीसारखा ज्वलंत असेल. त्या भट्टीत गर्विष्ठ आणि दुष्ट लोक गवताच्या काडीप्रमाणे जळून जातील. तो दिवस येत आहे, जो त्यांना अग्नीत भस्मसात करेल. त्यांचे एकही मूळ अथवा फांदी त्यावर उरणार नाही. 2परंतु तुम्ही जे माझे नाव सन्माननीय मानता, त्या तुम्हासाठी नीतिमत्वाचा सूर्य उगवेल आणि त्याच्या किरणात आरोग्य असेल. मग तुम्ही बाहेर जाल व धष्टपुष्ट वासरांप्रमाणे बागडाल. 3जेव्हा मी कार्य करेन, त्या दिवशी तुम्ही दुष्ट लोकांना तुडवाल, ते तुमच्या पायाखालच्या राखेप्रमाणे होतील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.
4“होरेब पर्वतावर माझा सेवक मोशेमार्फत सर्व इस्राएली लोकांसाठी मी जे नियमशास्त्र दिले त्याची आठवण ठेवा.
5“पाहा! याहवेहचा तो महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी, मी तुमच्याकडे संदेष्टा एलीयाहला पाठवेन. 6तो पालकांचे अंतःकरण त्यांच्या मुलांकडे व मुलांचे अंतःकरण त्यांच्या पालकांकडे करेल; अन्यथा मी फटकारून त्यांच्या देशाचा संपूर्ण नाश करेन.”

高亮显示

分享

复制

None

想要在所有设备上保存你的高亮显示吗? 注册或登录