YouVersion Logo
تلاش

लूक 20

20
येशूंच्या अधिकाराबद्दल प्रश्न
1एके दिवशी येशू मंदिराच्या अंगणात लोकांना शिकवीत होते आणि शुभवार्तेची घोषणा करीत होते, तेव्हा मुख्य याजक आणि यहूदी पुढारी त्यांच्याकडे आले. 2त्यांनी येशूंना विचारले, “आम्हाला हे सांगा की तुम्ही कोणत्या अधिकाराने हे करत आहात? तुम्हाला हा अधिकार कोणी दिला?”
3येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मला सांगा: 4योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून किंवा मनुष्याकडून होता?”
5या प्रश्नावर त्यांनी एकमेकांबरोबर चर्चा केली आणि म्हणाले, “जर आपण म्हणालो, ‘स्वर्गापासून होता,’ तर ते विचारतील, ‘त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही?’ 6पण जर आपण म्हणालो ‘मनुष्यापासून होता,’ तर सर्व लोक आपल्याला दगडमार करतील. कारण योहान संदेष्टा होता, याबद्दल लोकांची पुरेपूर खात्री होती.”
7शेवटी त्यांनी उत्तर दिले, “तो कुठून होता हे आम्हाला माहीत नाही.”
8यावर येशू त्यांना म्हणाले, “तर मग मीही या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो, हे तुम्हाला सांगणार नाही.”
शेतकर्‍यांचा दाखला
9नंतर लोकांकडे वळून येशूंनी त्यांना हा दाखला सांगितला, “एका मनुष्याने एक द्राक्षमळा लावला. तो मळा काही शेतकर्‍यांना भाड्याने देऊन तो बर्‍याच दिवसासाठी दूर निघून गेला. 10हंगामाचे दिवस आल्यावर द्राक्षमळ्यातील फळातून काही मिळावे, म्हणून त्याने आपला एक सेवक शेतकर्‍यांकडे पाठविला. परंतु शेतकर्‍यांनी त्याला मार दिला आणि रिकाम्या हाताने माघारी पाठवून दिले. 11त्याने दुसर्‍या सेवकाला त्यांच्याकडे पाठविले, परंतु त्यांनी त्यालासुद्धा मारले आणि लज्जास्पद वागणूक दिली व रिकाम्या हाताने परत पाठविले. 12तरी त्याने तिसर्‍याला पाठविले आणि त्यांनी त्याला जखमी केले आणि मळ्याबाहेर फेकून दिले.
13“तेव्हा द्राक्षमळ्याचा धनी स्वतःशीच म्हणाला, ‘मी काय करावे बरे? आता माझा पुत्र ज्याच्यावर मी प्रीती करतो त्याला त्यांच्याकडे पाठवितो. कदाचित ते त्याचा मान राखतील.’
14“पण शेतकर्‍यांनी मालकाच्या पुत्राला येताना पाहिले, तेव्हा ते आपसात विचार करून म्हणाले, ‘हा तर वारस आहे. आपण त्याला ठार करू या, म्हणजे हे वतन आपलेच होईल.’ 15तेव्हा त्यांनी त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून त्याला मारून टाकले.
“आता त्या द्राक्षमळ्याचा धनी त्यांचे काय करेल? 16तो येईल आणि त्या भाडेकर्‍यांना मारून टाकेल आणि द्राक्षमळा दुसर्‍यांना देईल.”
लोकांनी हे ऐकले, तेव्हा ते म्हणाले, “परमेश्वर करो असे कधीही न होवो!”
17येशूंनी त्यांच्याकडे निरखून पाहिले व विचारले, “तर मग,
“ ‘जो दगड बांधणार्‍यांनी नापसंत केला,
तोच कोनशिला झाला’#20:17 स्तोत्र 118:22 असे जे धर्मशास्त्रात लिहिले आहे, त्याचा अर्थ काय आहे?
18जे सर्व त्या खडकावर आदळतील त्यांचे तुकडे होतील, परंतु ज्यांच्यावर हा खडक आदळेल त्यांचा चुराडा होईल.”
19प्रमुख याजक आणि नियमशास्त्र शिक्षक यांनी हा दाखला ऐकला, तेव्हा येशूंना ताबडतोब अटक करण्याचा मार्ग ते शोधू लागले, कारण तो दाखला त्यांच्याविरुद्ध सांगितला होता हे त्यांनी ओळखले पण त्यांना लोकांची भीती वाटत होती.
कैसराला कर देणे
20त्यांच्यावर बारकाईने पाळत ठेऊन, त्यांनी गुप्तहेरांना प्रामाणिक माणसे आहेत असे ढोंग करून त्यांच्याकडे पाठविले यासाठी की येशूंना त्यांच्या शब्दात पकडावे आणि त्यांना राज्यपालाच्या अधिकारकक्षेत आणावे. 21त्या गुप्तहेरांनी येशूंना प्रश्न विचारला: “गुरुजी, हे आम्हाला माहीत आहे की तुम्ही जे योग्य आहे ते बोलता व शिकविता आणि पक्षपात न करता परमेश्वराचा मार्ग सत्याने शिकविता. 22आम्ही कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?”
23येशूंनी त्यांच्या मनातील कपट ओळखले आणि ते त्यांना म्हणाले, 24“मला एक नाणे दाखवा. या नाण्यावर कोणाचा मुखवटा आणि कोणाचे नाव आहे?”
“कैसराचे,” त्यांनी उत्तर दिले.
25मग येशू म्हणाले, “कैसराचे ते कैसराला, जे परमेश्वराचे आहे ते परमेश्वराला द्या.”
26अशा रीतीने लोकांपुढे त्यांना ते शब्दात पकडू शकले नाही. त्यांच्या उत्तराने ते आश्चर्यचकित झाले आणि गप्प राहिले.
पुनरुत्थानविषयक प्रश्न
27पुनरुत्थान नाही असे मानणार्‍या सदूकी लोकांपैकी काहीजण येशूंकडे आले आणि त्यांनी त्यांना विचारले, 28“गुरुजी, मोशेने आम्हासाठी असे लिहिले आहे की, एखादा मनुष्य मूलबाळ न होता मरण पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेशी विवाह करून त्याच्यासाठी संतती वाढवावी. 29आता एका कुटुंबात सात भाऊ होते. त्यातील पहिल्याने लग्न केले पण काही मूलबाळ न होता, तो मरण पावला. 30-31मग दुसर्‍या आणि तिसर्‍यानेही तिच्याशी लग्न केले आणि याप्रमाणे ते सातही भाऊ संतान न होताच मरण पावले. 32शेवटी ती स्त्री मरण पावली. 33आता पुनरुत्थान होईल त्यावेळी ती स्त्री कोणाची पत्नी होईल, कारण त्या सातही जणांनी तिच्याशी लग्न केले होते?”
34येशूंनी उत्तर दिले, “लग्न करण्याची रीत या पृथ्वीवरील लोकांसाठीच आहे. 35तरी, त्या युगात वाटेकरी होण्यासाठी आणि जे मृतांतून पुनरुत्थित होणार आहेत, ते लग्न करत नाही किंवा लग्न करूनही देत नाही. 36आणि ते मरणार नाहीत, कारण ते देवदूतांसारखे आहेत. ती परमेश्वराची लेकरे आहेत, कारण ती पुनरुत्थानाची लेकरे झाली आहेत. 37मोशेच्या जळत्या झुडूपांच्या निवेदनात, तो प्रभूला ‘अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोब यांचा परमेश्वर आहे’#20:37 निर्ग 3:6 असे म्हणतो यावरून त्याने हेच दर्शविले आहे की, मेलेले उठविले जातात. 38कारण ते मृतांचे परमेश्वर नसून, जिवंतांचे परमेश्वर आहेत आणि त्यांच्या दृष्टीने सर्व लोक जिवंत आहेत.”
39काही नियमशास्त्र शिक्षकांनी प्रतिसाद दिला, “गुरुजी, आपण फार योग्य उत्तर दिले.” 40मग कोणी त्यांना आणखी प्रश्न विचारावयास धजले नाहीत.
ख्रिस्त कोणाचा पुत्र आहे?
41नंतर येशूंनी त्यांना एक प्रश्न विचारला, “ख्रिस्त हा दावीदाचा पुत्र आहे असे का म्हटले जाते? 42-43कारण दावीदाने स्वतः स्तोत्रांच्या पुस्तकात म्हटले आहे:
“ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले,
“मी तुझ्या शत्रूंना तुझ्या
पायाखाली ठेवीपर्यंत
माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’#20:42‑43 स्तोत्र 110:1
44दावीदच ख्रिस्ताला ‘प्रभू’ म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असू शकेल?”
नियमशास्त्राच्या शिक्षकांविरुद्ध इशारा
45सभोवतालचा लोकसमुदाय हे ऐकत असतानाच ते आपल्या शिष्यांकडे वळून त्यांना म्हणाले, 46“या नियमशास्त्राच्या शिक्षकांपासून सावध राहा. त्यांना लांब झगे घालून बाजारात लोकांकडून आदरपूर्वक अभिवादन घेणे, सभागृहामध्ये आणि मेजवान्यामध्ये उत्तम व मानाच्या जागा मिळविणे प्रिय आहे. 47ते देखाव्यासाठी लांबलचक प्रार्थना करतात आणि विधवांची घरे लुबाडतात. अशा लोकांना अधिक शिक्षा होईल.”

موجودہ انتخاب:

लूक 20: MRCV

سرخی

شئیر

کاپی

None

کیا آپ جاہتے ہیں کہ آپ کی سرکیاں آپ کی devices پر محفوظ ہوں؟ Sign up or sign in