मत्तय 7

7
इतरांचे दोष न काढण्याबाबत
1तुमचा न्याय केला जाऊ नये म्हणून तुम्ही कोणाचा न्याय करू नका. 2ज्या न्यायानुसार तुम्ही न्याय कराल त्यानुसार तुमचा न्याय केला जाईल. ज्या मापाने तुम्ही मोजून द्याल, त्याच मापाने तुम्हांला मोजून दिले जाईल. 3तू तुझ्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न घेता तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? 4अथवा ‘तुझ्या डोळ्यांतले कुसळ मला काढू दे’, असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. 5अरे ढोंग्या, प्रथम तुझ्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढायला तुला स्पष्ट दिसेल.
6जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका. तुमचे मोती डुकरांपुढे टाकू नका. टाकाल तर कदाचित त्यांच्या पायांखाली ती तुडवतील व उलटून तुमच्या अंगावर धावून येतील.
प्रार्थना करायला प्रोत्साहन
7मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल. ठोठावा म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. 8जो कोणी मागतो त्याला मिळते; जो शोधतो त्याला सापडते व जो ठोठावतो त्याच्यासाठी उघडले जाते. 9आपल्या मुलाने भाकर मागितल्यावर त्याला दगड देणारा 10आणि मासा मागितल्यावर त्याला साप देणारा असा कोणी तुमच्यामध्ये आहे का? 11मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हांला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात, त्यांना तो किती मोठ्या प्रमाणात चांगल्या देणग्या देईल!
सुवर्ण नियम
12लोकांनी तुमच्याशी जसे वागावे अशी तुमची इच्छा असेल, तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा. नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ हेच शिकवतात.
दोन मार्ग
13अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाणारा दरवाजा रुंद व मार्ग सोपा आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. 14परंतु जीवनाकडे जाणारा मार्ग अरुंद व अवघड आहे. हा मार्ग थोड्यांनाच सापडतो.
खरे व खोटे शिक्षक
15खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषात तुमच्याकडे येतात पण ते आतून क्रुर लांडगे असतात. 16त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडांवरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडांवरून अंजीर काढतात काय? 17त्याचप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. 18चांगल्या झाडाला वाईट फळे येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही. 19चांगले फऴ न देणारे प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते. 20अर्थात, त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल.
प्रार्थना आणि कृती
21‘प्रभो, प्रभो’, म्हणून माझा धावा करणारा प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करील असे नाही, पण जो माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो तो करील. 22न्यायाच्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, “प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय?’ 23तेव्हा मी त्यांना जाहीरपणे सांगेन, “मी तुम्हांला मुळीच ओळखत नाही. अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा.’
खडकावरील पाया
24म्हणून जो कोणी माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो, तो खडकावर घर बांधणाऱ्या सुज्ञ मनुष्यासारखा आहे; 25पाऊस पडला; पूर आला; वाराही सुटला व त्या घरावर आदळला, तरी ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावर घातलेला होता.
26उलट, जो कोणी माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही, तो वाळूवर घर बांधणाऱ्या मनुष्याप्रमाणे मूर्ख ठरतो. 27पाऊस पडला; पूर आला; वाराही सुटला व त्या घरावर आदळला; ते घर कोसळले आणि त्याचा नाश भयानक होता.”
28येशूने हे सर्व बोलणे पूर्ण केल्यावर त्याच्या ह्या प्रबोधनामुळे लोकसमुदाय थक्क झाला; 29कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्र्यांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत होता.

موجودہ انتخاب:

मत्तय 7: MACLBSI

سرخی

شئیر

کاپی

None

کیا آپ جاہتے ہیں کہ آپ کی سرکیاں آپ کی devices پر محفوظ ہوں؟ Sign up or sign in