मत्तय 28

28
येशूचे पुनरुत्थान
1साबाथनंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी भल्या पहाटेस मग्दालिया मरिया व दुसरी मरिया ह्या कबर पाहायला आल्या. 2त्या समयी पाहा, भयंकर भूकंप झाला. प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला. त्याने येऊन शिळा एकीकडे लोटली आणि तो तिच्यावर बसला. 3त्याचे रूप आकाशातील विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. 4त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले.
5परंतु देवदूताने त्या स्त्रियांना म्हटले, “भिऊ नका. तुम्ही क्रुसावर खिळलेल्या येशूचा शोध करीत आहात, हे मला ठाऊक आहे. 6तो येथे नाही, त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या. त्याला ठेवले होते ती ही जागा पाहा. 7तर मग लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा, “तो मेलेल्यांतून उठला आहे, पाहा, तो तुमच्या आधी आता गालीलमध्ये जात आहे. तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल!’ पाहा, मी तुम्हांला सांगितले आहे.”
8तेव्हा लगेच त्या स्त्रिया भीतीने परंतु अत्यंत आनंदाने कबरीजवळून निघाल्या व त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगायला धावत जात असता 9येशू त्यांना वाटेत अचानक भेटून म्हणाला, “तुम्हांला शांती लाभो.” त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून त्याची आराधना केली. 10येशूने त्यांना म्हटले, “भिऊ नका, जा. माझ्या भावांना सांगा की, त्यांनी गालीलमध्ये जावे, तेथे ते मला पाहतील.”
पहारेकऱ्यांचा अहवाल
11त्या स्त्रिया जात असता, पहारेकऱ्यांतील कित्येकांनी शहरात जाऊन झालेले सर्व वर्तमान मुख्य याजकांना सांगितले. 12त्यांनी व वडीलजनांनी मिळून मसलत केली आणि शिपायांना पुष्कळ पैसे देऊन सांगितले, 13“‘आम्ही झोपेत असताना त्याच्या शिष्यांनी रात्री येऊन त्याला चोरून नेले’, असे तुम्ही म्हटले पाहिजे. 14ही गोष्ट राज्यपालांच्या कानांवर गेली तर तुम्ही निर्दोष आहात, अशी आम्ही त्यांची समजूत घालू आणि तुम्हांला संरक्षण देऊ.”
15त्यांनी पैसे घेतले व त्यांना शिकवल्याप्रमाणे केले. ही जी गोष्ट यहुदी लोकांमध्ये पसरवण्यात आली, ती आजपर्यंत प्रचलित आहे.
गालीलमध्ये प्रेषितांना दिलेले दर्शन
16इकडे येशूचे अकरा शिष्य गालीलातील ज्या डोंगरावर येशूने त्यांना जायला सांगितले होते, त्यावर गेले. 17त्यांनी त्याला तेथे पाहून त्याची आराधना केली. मात्र त्यांच्यापैकी काही जणांना शंका आली. 18तेव्हा येशू जवळ येऊन त्यांना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. 19म्हणून तुम्ही जा, सर्व राष्ट्रांतील लोकांना माझे शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. 20जे काही मी तुम्हांला आज्ञापूर्वक सांगितले आहे, ते सर्व त्यांना पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या अंतापर्यंत मी सर्वदा तुमच्याबरोबर आहे.”

Vurgu

Paylaş

Kopyala

None

Önemli anlarınızın tüm cihazlarınıza kaydedilmesini mi istiyorsunuz? Kayıt olun ya da giriş yapın

मत्तय 28 için video