योहान 21

21
येशूचे सात शिष्यांना दर्शन
1ह्या घटनांनंतर येशूने पुन्हा एकदा तिबिर्या सरोवराजवळ शिष्यांसमोर स्वतःला अशा प्रकारे प्रकट केले: 2शिमोन पेत्र, ज्याला दिदुम म्हणजे जुळा म्हणत तो थोमा, गालीलमधील काना येथील नथनेल, जब्दीचे मुलगे व येशूचे दुसरे दोघे शिष्य हे एकत्र जमले होते. 3शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, “मी मासे धरायला जातो.” ते त्याला म्हणाले, “आम्हीही तुझ्याबरोबर येतो.” ते निघून मचव्यात बसले, पण त्या रात्री त्यांना एकही मासा मिळाला नाही. 4पहाट होत असता येशू सरोवराच्या काठावर उभा होता. तरी पण तो येशू आहे, हे शिष्यांनी ओळखले नव्हते. 5येशूने त्यांना विचारले, “मुलांनो, तुमच्याकडे मासे नाहीत काय?” त्यांनी “नाही” असे त्याला उत्तर दिले.
6त्याने त्यांना म्हटले, “मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका म्हणजे तुम्हांला सापडतील”, त्यांनी ते टाकले, तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना.
7ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती, तो पेत्राला म्हणाला, “हा तर प्रभू आहे.” ‘प्रभू आहे’, हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घेऊन तो कमरेशी गुंडाळला, कारण तो उघडा होता आणि त्याने पाण्यात उडी टाकली. 8दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढत होडीतून आले, कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते, सुमारे शंभर मीटर अंतरावर होते. 9किनाऱ्यावर उतरल्यानंतर त्यांनी कोळशांचा विस्तव आणि त्यावर ठेवलेली मासळी तसेच काही भाकरी पाहिल्या. 10येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आताच धरलेले काही मासे आणा.”
11शिमोन पेत्राने मचव्यावर चढून जाळे किनाऱ्यावर ओढून आणले. त्यात एकशे त्रेपन्न मोठे मासे होते. असे असतानाही जाळे फाटले नाही. 12येशू त्यांना म्हणाला, “या, न्याहरी करा.” तो प्रभू आहे, असे त्यांना समजले, म्हणून आपण कोण आहात, हे त्याला विचारायला शिष्यांतील कोणी धजला नाही. 13येशूने येऊन भाकरी घेतल्या व त्यांना दिल्या, तसेच मासेही दिले.
14येशू मेलेल्यांतून उठल्यावर त्याच्या शिष्यांना त्याने दर्शन दिल्याची ही तिसरी वेळ होती.
पेत्राबरोबर येशूचे शेवटचे भाषण
15त्यांनी न्याहरी केल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानच्या मुला शिमोन, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय प्रभो, मी आपल्यावर प्रेम करतो, हे आपल्याला ठाऊक आहे.” त्याने त्याला म्हटले, “माझी कोकरे चार.” 16पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, “योहानच्या मुला शिमोन, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय प्रभो, मी आपल्यावर प्रेम करतो, हे आपल्याला ठाऊक आहे.” त्याने त्याला म्हटले, “माझी मेंढरे पाळ.” 17तिसऱ्यांदा त्याने त्याला विचारले, “योहानच्या मुला शिमोन, तू माझ्यावर प्रेम करतोस काय?” ‘तू माझ्यावर प्रेम करतोस काय?’, असा प्रश्न प्रभूने तिसऱ्यांदा विचारल्यामुळे पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, “प्रभो, आपल्याला सर्व काही ठाऊक आहे. मी आपल्यावर प्रेम करतो, हे आपण जाणता.” येशूने त्याला म्हटले, “माझी मेंढरे चार.” 18मी तुला खातरीपूर्वक सांगतो, तू तरुण होतास तेव्हा स्वतः कमरपट्टा बांधून तुझी इच्छा असेल तेथे जात होतास, परंतु तू म्हातारा होशील, तेव्हा हात लांब करशील आणि दुसरा माणूस तुझा कमरपट्टा बांधून तुझी इच्छा नसेल, तेथे तुला नेईल.” 19तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचा गौरव करील, हे सुचवण्याकरता तो हे बोलला, आणि असे बोलल्यावर त्याने त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.”
20पेत्र मागे वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती त्याला त्याने मागे येताना पाहिले. भोजनाच्या वेळेस जो त्याच्या उराशी टेकला असता म्हणाला होता, ‘प्रभो, तुला धरून देणारा तो कोण आहे?’ 21त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला, “प्रभो, ह्याचे काय?”
22येशूने त्याला म्हटले, “मी येईपर्यंत त्याने राहावे, अशी माझी इच्छा असली, तर तुला त्याचे काय? तू माझ्यामागे ये.”
23ह्यावरून तो शिष्य मरणार नाही, असा समज बंधुवर्गामध्ये पसरला. तो मरणार नाही असे येशूने त्याला म्हटले नव्हते, पण ‘मी येईपर्यंत त्याने राहावे, अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय’, असे म्हटले होते.
समारोप
24जो ह्या घटनांविषयी साक्ष देतो व ज्याने ह्या लिहिल्या तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे. हे आम्हांला माहीत आहे.
25येशूने केलेली दुसरी पुष्कळ कृत्ये आहेत. ती सर्व लिहून ठेवली तर त्यांची पुस्तके ह्या जगात मावणार नाहीत, असे मला वाटते.

Vurgu

Paylaş

Kopyala

None

Önemli anlarınızın tüm cihazlarınıza kaydedilmesini mi istiyorsunuz? Kayıt olun ya da giriş yapın