प्रेषितांचे कार्य 1
1
विषयप्रवेश
1-2प्रिय थियफिल, येशूने कार्य करायला आरंभ केल्यापासून त्याला स्वर्गात घेतले गेले, तोपर्यंत त्याने जे जे केले व शिकविले त्या सर्वांविषयी मी माझ्या पहिल्या पुस्तकात लिहिले. स्वर्गात घेतला जाण्यापूर्वी ज्यांना त्याने प्रेषित म्हणून निवडले होते, त्यांना त्याने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आदेश दिला. 3मरण सोसल्यानंतरही त्याने चाळीस दिवस त्यांना दर्शन देऊन अनेक ठोस पुराव्यांनिशी आपण जिवंत आहोत, हे दाखवले. त्यांनी त्याला पाहिले व त्याने त्यांना देवाच्या राज्याविषयी सांगितले. 4ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आदेश दिला, “यरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने दिलेल्या ज्या वचनाविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे, त्याची वाट पाहा. 5योहानने पाण्याने बाप्तिस्मा दिला, पण तुम्हाला थोड्या दिवसांत पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देण्यात येईल.”
येशूचे स्वर्गारोहण
6प्रेषित येशूबरोबर एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, “प्रभो, तुम्ही इस्राएलचे राज्य पुन्हा स्थापन करणार त्याची वेळ हीच आहे का?”
7तो त्यांना म्हणाला, “जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत, ते तुम्हांला जाणून घेता येणार नाही. 8परंतु तुमच्यावर पवित्र आत्म्याचा अभिषेक झाल्यावर तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेममध्ये, सर्व यहुदियात, शोमरोनात व जगभर तुम्ही माझे साक्षीदार व्हाल.” 9असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यांदेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टिआड केले.
10तो जात असता, ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा त्यांनी शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष अचानक त्यांच्याजवळ उभे राहिलेले पाहिले 11आणि ते म्हणाले, “अहो गालीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे पाहत उभे का राहिला आहात? हा येशू जो तुमच्यापासून वर स्वर्गात घेतला गेला तो, तुम्ही त्याला जसे वर जाताना पाहिले, तसाच पुन्हा येईल.”
यहुदाच्या जागी मत्थियाची निवड
12यरुशलेमपासून सुमारे एक किलोमिटर दूर असलेल्या ऑलिव्ह डोंगरावरून प्रेषित यरुशलेममध्ये परत आले 13आणि ज्या माडीवरच्या खोलीत पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप, थोमा, बर्थलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, राष्ट्रवादी शिमोन व याकोबचा मुलगा यहुदा हे राहत होते त्या ठिकाणी ते गेले. 14हे सर्व जण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ प्रार्थना करण्यासाठी वारंवार एकत्र जमत असत.
15काही दिवसांनंतर पेत्र सुमारे एकशे वीस श्रद्धावंतांच्या समुदायात उभा राहून म्हणाला, 16“बंधुजनहो, येशूला धरून नेणाऱ्यांना वाट दाखविणाऱ्या यहुदाविषयी पवित्र आत्म्याने दावीदच्या मुखावाटे जे भविष्य वर्तविले, ते पूर्ण होणे आवश्यक होते. 17जो आपल्यामध्ये गणला जात होता आणि ज्याला आपल्या सेवाकार्यात सहभागी करण्यात आले होते. 18त्याने त्याच्या दुष्टाईच्या मोबदल्यातून जे शेत विकत घेतले, त्यात तो पालथा पडल्याने त्याचे पोट मधोमध फुटले व त्याची सर्व आतडी बाहेर पडली. 19यरुशलेममध्ये राहणाऱ्या सर्वांना हे कळले म्हणून त्यांच्या भाषेत त्या शेताला हकलदमा म्हणजे रक्ताचे शेत असे नाव पडले आहे.
20स्तोत्रसंहितेत असे लिहिले आहे:
त्याचे घर उजाड पडो
व त्यात कोणीही न राहो
आणि त्याचे अधिकारपद दुसरा घेवो.
21योहानच्या बाप्तिस्म्यानंतर ज्या दिवशी येशूला आपल्यापासून वर घेण्यात आले, तोपर्यंत 22म्हणजे येशू आपणामध्ये येत जात असे, त्या सगळ्या कालावधीत जी माणसे आपल्याबरोबर होती त्यांच्यांतून एकाने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा साक्षीदार म्हणून आमच्याबरोबर सहभागी व्हावे.”
23तेव्हा बर्सबा म्हटलेला योसेफ ऊर्फ युस्त व मत्थिया ह्या दोघांची नावे सुचविण्यात आली. 24मग त्यांनी अशी प्रार्थना केली: “सर्वांची हृदये जाणणाऱ्या हे प्रभो, 25हे सेवकपद व प्रेषितपद सोडून त्याच्या स्वतःच्या नेमलेल्या जागी गेलेल्या यहुदाचे पद ज्याला मिळावे, असा ह्या दोघांपैकी तू कोण निवडलास ते दाखव.” 26मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्यावर मत्थियाची चिठ्ठी निघाली, तेव्हा त्याची अकरा प्रेषितांत भर घालण्यात आली.
Seçili Olanlar:
प्रेषितांचे कार्य 1: MACLBSI
Vurgu
Paylaş
Kopyala

Önemli anlarınızın tüm cihazlarınıza kaydedilmesini mi istiyorsunuz? Kayıt olun ya da giriş yapın
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.