उत्पत्ती 3

3
मानवाचे पतन
1परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरांत सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, “तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हांला सांगितले हे खरे काय?” 2स्त्रीने सर्पाला म्हटले, “बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हांला मोकळीक आहे: 3पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका; त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल.”
4सर्प स्त्रीला म्हणाला, “तुम्ही खरोखर मरणार नाही;
5कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील. आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.”
6त्या झाडाचे फळ खायला चांगले, दिसायला मनोहर आणि शहाणे करायला इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले; तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले, आणि आपल्याबरोबर आपल्या पतीलाही ते दिले व त्याने ते खाल्ले.
7तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि ‘आपण नग्न आहोत’ असे त्यांना कळून आले; तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली.
8ह्यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता, त्याचा आवाज त्यांना ऐकू आला, तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडांमध्ये लपली.
9तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला हाक मारून म्हटले, “तू कोठे आहेस?”
10तो म्हणाला, “मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिऊन लपलो.”
11देवाने म्हटले, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस काय?”
12आदाम म्हणाला, “जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले.”
13परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, “हे तू काय केलेस?” स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले.”
14तेव्हा परमेश्वर देव सर्पाला म्हणाला, “तू हे केलेस म्हणून सर्व ग्रामपशू व वनचर ह्यांच्यापेक्षा तू शापग्रस्त हो; तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील;
15आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडशील.”
16तो स्त्रीला म्हणाला, “मी तुझे दु:ख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन; तू क्लेशाने लेकरे प्रसवशील; तरी तुझा ओढा नवर्‍याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील.”
17आदामाला तो म्हणाला, “तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस; म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे; तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील;
18ती तुला काटे व कुसळे देईल; तू शेतातले पीक खाशील;
19तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन: मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे; तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.”
20आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय.
21परमेश्वराने आदाम व त्याची स्त्री ह्यांच्यासाठी चर्मवस्त्रे करून त्यांना घातली.
22मग परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, मनुष्याला बरेवाईट कळू लागून तो आमच्यातल्या एकासमान झाला आहे; तर आता कदाचित तो आपला हात जीवनाच्या झाडाला लावून त्याचेही फळ काढून खाईल व सर्वकाळ जिवंत राहील;”
23ह्यास्तव ज्या जमिनीतून त्याला उत्पन्न केले होते, तिची मशागत करावी म्हणून परमेश्वर देवाने त्याला एदेन बागेतून बाहेर काढून लावले.
24देवाने मनुष्याला बाहेर घालवले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणार्‍या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्वभागी करूबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली.

Vurgu

Paylaş

Kopyala

None

Önemli anlarınızın tüm cihazlarınıza kaydedilmesini mi istiyorsunuz? Kayıt olun ya da giriş yapın