Logo ng YouVersion
Hanapin ang Icon

योहान 9

9
जन्मांधाला दृष्टी देणे
1तो तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला.
2तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “गुरूजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? ह्याच्या किंवा ह्याच्या आईबापांच्या?”
3येशूने उत्तर दिले, “ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठायी देवाची कार्ये प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला.
4ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला2 केली पाहिजेत; रात्र येणार आहे, तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही.
5मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.”
6असे बोलून तो भूमीवर थुंकला, थुंकीने त्याने चिखल केला; आणि तो चिखल त्या आंधळ्याच्या डोळ्यांना लावला,
7आणि त्याला म्हटले, “जा; शिलोह (म्हणजे पाठवलेला) नावाच्या तळ्यात धू.” मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला.
8ह्यावरून शेजारीपाजारी व ज्यांनी त्याला पूर्वी भिक्षा मागताना पाहिले होते ते म्हणाले, “भीक मागत बसणारा तो हाच नाही काय?”
9कित्येक म्हणाले, “तोच हा.” दुसरे म्हणाले, “नाही, हा त्याच्यासारखा आहे;” तो म्हणाला, “मी तोच आहे.”
10ह्यावरून ते त्याला म्हणाले, “तुझे डोळे कसे उघडले?”
11त्याने उत्तर दिले, “येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यांना लावला आणि मला सांगितले, ‘शिलोह तळ्यावर जाऊन धू.’ मी जाऊन धुतले आणि मला दृष्टी आली.”
12तेव्हा त्यांनी त्याला म्हटले, “तो कोठे आहे?” तो म्हणाला, “मला ठाऊक नाही.”
13मग जो पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी परूश्यांकडे नेले.
14ज्या दिवशी येशूने चिखल करून त्याचे डोळे उघडले तो दिवस शब्बाथ होता.
15म्हणून परूश्यांनीही त्याला पुन्हा विचारले, “तुला दृष्टी कशी आली?” तो त्यांना म्हणाला, “त्याने माझ्या डोळ्यांना चिखल लावला. तो मी धुऊन टाकल्यावर मला दिसू लागले.”
16ह्यावरून परूश्यांतील कित्येक म्हणाले, “हा मनुष्य देवापासून नाही, कारण तो शब्बाथ पाळत नाही.” दुसरे म्हणाले, “पापी मनुष्य अशी चिन्हे कशी करू शकतो?” अशी त्यांच्यामध्ये फूट पडली.
17म्हणून पुन्हा ते त्या आंधळ्याला म्हणाले, “त्याने तुझे डोळे उघडले तर त्याच्याविषयी तू काय म्हणतोस?” त्याने म्हटले, “तो संदेष्टा आहे.”
18यहूद्यांनी त्या दृष्टी प्राप्त झालेल्या माणसाच्या आईबापांना बोलावून विचारपूस करीपर्यंत, तो पूर्वी आंधळा असून आता डोळस झाला आहे, हे खरे मानले नाही.
19त्यांनी त्यांना विचारले, “तुमचा जो मुलगा आंधळा जन्मला असे म्हणता तो हाच काय? तर आता त्याला दृष्टी कशी आली?”
20त्याच्या आईबापांनी उत्तर दिले, “हा आमचा मुलगा आहे व तो आंधळा जन्मला हे आम्हांला ठाऊक आहे;
21तरी आता त्याला दृष्टी कशी आली हे आम्हांला ठाऊक नाही; किंवा त्याचे डोळे कोणी उघडले हेही आम्हांला ठाऊक नाही. त्याला विचारा; तो वयात आलेला आहे, तो स्वत:विषयी सांगेल.”
22त्याच्या आईबापांना यहूद्यांचे भय होते म्हणून ते असे म्हणाले, कारण हा ख्रिस्त आहे असे कोणी पत्करल्यास त्याला सभाबहिष्कृत करावे असे यहूद्यांचे अगोदरच एकमत झाले होते.
23ह्यामुळे त्याच्या आईबापांनी म्हटले, “तो वयात आलेला आहे, त्याला विचारा.”
24मग जो मनुष्य पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी दुसर्‍यांदा बोलावून म्हटले, “देवाचा गौरव कर, तो मनुष्य पापी आहे हे आम्हांला ठाऊक आहे.”
25ह्यावरून त्याने उत्तर दिले, “तो पापी आहे किंवा नाही हे मला ठाऊक नाही, पण मला एक गोष्ट ठाऊक आहे की, मी पूर्वी आंधळा होतो व आता मला दिसते.”
26ह्यावर त्यांनी त्याला म्हटले, “त्याने तुला काय केले? त्याने तुझे डोळे कसे उघडले?”
27त्याने त्यांना उत्तर दिले, “आत्ताच मी तुम्हांला सांगितले तरी तुम्ही ऐकले नाही; पुन्हा ऐकायची इच्छा का करता? तुम्हीही त्याचे शिष्य होऊ इच्छिता काय?”
28तेव्हा त्यांनी त्याची हेटाळणी करून म्हटले, “तू त्याचा शिष्य आहेस; आम्ही मोशेचे शिष्य आहोत.
29देव मोशेबरोबर बोलला आहे हे आम्हांला ठाऊक आहे; हा कोठला आहे हे आम्हांला ठाऊक नाही.”
30त्या माणसाने त्यांना उत्तर दिले, “हेच तर मोठे आश्‍चर्य आहे की, तो कोठला आहे हे तुम्हांला ठाऊक नाही; पण त्याने तर माझे डोळे उघडले.
31आपल्याला ठाऊक आहे की, देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो.
32जन्मांधाचे डोळे कोणी उघडल्याचे युगाच्या आरंभापासून कधी ऐकण्यात आले नव्हते.
33हा देवापासून नसता तर ह्याला काही करता आले नसते.”
34त्यांनी त्याला म्हटले, “तू सर्वस्वी पापात जन्मलास आणि आम्हांला शिकवतोस काय?” मग त्यांनी त्याला बाहेर घालवले.
35त्यांनी त्याला बाहेर घालवले हे येशूने ऐकले; आणि त्याला तो सापडल्यावर तो त्याला म्हणाला, “तू मनुष्याच्या1 पुत्रावर विश्वास ठेवतोस काय?”
36त्याने उत्तर दिले, “महाराज, मी त्याच्यावर विश्वास ठेवावा असा तो कोण आहे?”
37येशूने त्याला म्हटले, “तू त्याला पाहिले आहेस व तुझ्याबरोबर आता बोलत आहे तोच तो आहे.”
38तो म्हणाला, “प्रभूजी, मी विश्वास ठेवतो,” आणि त्याने त्याला नमन केले.
39तेव्हा येशू म्हणाला, “मी न्यायनिवाड्यासाठी ह्या जगात आलो आहे; ह्यासाठी की, ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे.”
40परूश्यांतील जे त्याच्याजवळ होते त्यांनी हे ऐकून त्याला म्हटले, “आम्हीही आंधळे आहोत काय?”
41येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही आंधळे असता तर तुम्हांला पाप नसते; परंतु आम्हांला दिसते असे तुम्ही आता म्हणता, म्हणून तुमचे पाप तसेच राहते.

Kasalukuyang Napili:

योहान 9: MARVBSI

Haylayt

Ibahagi

Kopyahin

None

Gusto mo bang ma-save ang iyong mga hinaylayt sa lahat ng iyong device? Mag-sign up o mag-sign in

Mga Libreng Babasahing Gabay at Debosyonal na may kaugnayan sa योहान 9

Gumagamit ang YouVersion ng cookies para gawing personal ang iyong karanasan. Sa paggamit sa aming website, tinatanggap mo ang aming paggamit ng cookies gaya ng inilarawan sa aming Patakaran sa Pribasya