जखर्‍याह 12

12
यरुशलेमच्या शत्रूंचा नाश होणे
1एक भविष्यवाणी: इस्राएलच्या बाबत याहवेहचे वचन.
याहवेह, ज्यांनी आकाश विस्तारले, पृथ्वीचा पाया घातला आणि मनुष्यांच्या अंतर्यामी आत्मा घातला, ते जाहीर करतात: 2“मी यरुशलेमला प्याल्याप्रमाणे करेन, जो पिऊन सभोवतालची राष्ट्रे झोकांड्या खातील. यहूदीया तसेच इस्राएलच्या सभोवती वेढा घातल्या जाईल. 3त्या दिवशी, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे एकत्र होतील, तेव्हा मी यरुशलेमला हालविता न येणारा खडक करेन. जे तिला हालविण्याचा प्रयत्न करतील, उलट ती राष्ट्रेच घायाळ होतील. 4त्या दिवशी, मी प्रत्येक घोड्याला भयचकित करेन व त्याच्या स्वारांची मति भ्रष्ट करेन. मी यहूदीयाच्या लोकांवर लक्षपूर्वक नजर ठेवेन, पण इतर राष्ट्रांना आंधळे करेन,” असे याहवेह जाहीर करतात. 5“मग यहूदाहची कुळे आपल्या मनात म्हणतील, ‘यरुशलेमचे लोक सामर्थ्यशाली आहेत, कारण सर्वसमर्थ याहवेह त्यांचे परमेश्वर आहेत.’
6“त्या दिवशी मी यहूदीयाच्या कुळांना, लाकडाच्या ढिगाऱ्यातील आगटीसारखे, पेंढ्यांमध्ये टाकलेल्या पेटत्या मशालीसारखे करेन; ती कुळे उजवीकडील व डावीकडील सर्व शेजारील राष्ट्रांना जाळून भस्म करतील. यरुशलेम मात्र अचल अशी राहील.
7“याहवेह यहूदीयाच्या आवासाला प्रथम वाचवतील, जेणेकरून दावीदाच्या घराण्याचा व यरुशलेमच्या रहिवाशांचा आदर यहूदीयापेक्षा महान होणार नाही. 8त्या दिवशी याहवेह यरुशलेमच्या रहिवाशांचे रक्षण करतील, जेणेकरून त्यांच्यातील अत्यंत दुर्बलदेखील दावीद राजासारखे होतील, महापराक्रमी ठरतील. आणि दावीदाचे राजघराणे परमेश्वरासारखे होईल, त्यांच्या अग्रभागी चालणार्‍या याहवेहच्या दूतासारखे होईल. 9त्या दिवशी यरुशलेमवर हल्ला करणार्‍या सर्व राष्ट्रांना मी नष्ट करण्यास निघेन.
विंधलेल्यासाठी शोक
10“मग मी दावीदाच्या घराण्यावर व यरुशलेमच्या सर्व रहिवाशांवर कृपेचा आणि विनंतीचा आत्मा ओतेन आणि ज्याला त्यांनी भोसकले त्या माझ्याकडे ते पाहतील आणि एकुलत्या एका पुत्रासाठी करावा, तसा ते त्याच्यासाठी शोक करतील आणि प्रथम पुत्रासाठी करावा, तसा ते त्याच्यासाठी विलाप करतील. 11त्या दिवशी यरुशलेमातील आकांत इतका मोठा असेल, जसा मगिद्दोच्या खोर्‍यात ठार झालेल्या हदाद-रिम्मोनासाठी होता. 12संपूर्ण इस्राएल राष्ट्र दुःखाने आक्रंदन करेल, प्रत्येक गोत्र, ते स्वतः व त्यांच्या पत्नींसहः दावीदाच्या घराण्याचे गोत्र व त्यांच्या पत्नी, नाथानाच्या घराण्याचे गोत्र व त्यांच्या पत्नी, 13लेवी घराण्याचे गोत्र व त्यांच्या पत्नी, शिमी घराण्याचे गोत्र व त्यांच्या पत्नी, 14आणि राहिलेले सर्व गोत्र व त्यांच्या पत्नी.

ที่ได้เลือกล่าสุด:

जखर्‍याह 12: MRCV

เน้นข้อความ

แบ่งปัน

คัดลอก

None

ต้องการเน้นข้อความที่บันทึกไว้ตลอดทั้งอุปกรณ์ของคุณหรือไม่? ลงทะเบียน หรือลงชื่อเข้าใช้