योहान 5

5
बेथेस्दा तळ्याजवळचा पंगू मनुष्य
1त्यानंतर यहूद्यांचा सण होता, तेव्हा येशू वर यरुशलेमेस गेला.
2यरुशलेमेत मेंढरेदरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेथेस्दा म्हणतात; त्याच्याजवळ पाच पडव्या आहेत.
3त्यांमध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे ह्यांचा मोठा समुदाय पडलेला असे. [ते पाणी हलण्याची वाट पाहत असत;
4कारण की, देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलवल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे.]
5तेथे अडतीस वर्षे आजारी असलेला कोणीएक माणूस होता.
6येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, “तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?”
7त्या दुखणेकर्‍याने त्याला उत्तर दिले, “महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही; मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्याआधी उतरतो.”
8येशू त्याला म्हणाला, “ऊठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.”
9लगेचच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. त्या दिवशी शब्बाथ होता.
10ह्यावरून यहूदी त्या बर्‍या झालेल्या माणसाला म्हणाले, “आज शब्बाथ आहे, बाज उचलणे तुला योग्य नाही.”
11त्याने त्यांना उत्तर दिले, “ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.”
12त्यांनी त्याला विचारले, “‘आपली बाज उचलून चाल,’ असे ज्याने तुला सांगितले, तो कोण माणूस आहे?”
13तो कोण आहे हे त्या बर्‍या झालेल्या माणसाला ठाऊक नव्हते; कारण त्या ठिकाणी लोकसमुदाय असल्यामुळे येशू निसटून गेला होता.
14त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस; आतापासून पाप करू नकोस; करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.”
15त्या माणसाने जाऊन यहूद्यांना सांगितले, “ज्याने मला बरे केले तो येशू आहे.”
16ह्यामुळे यहूदी येशूच्या पाठीस लागून त्याला जिवे मारायला पाहू लागले, कारण तो शब्बाथ दिवशी अशी कामे करत असे.
17येशूने त्यांना उत्तर दिले, “माझा पिता आजपर्यंत काम करत आहे आणि मीही काम करत आहे.”
18ह्यामुळे तर यहूदी त्याला जिवे मारण्याची अधिकच खटपट करू लागले; कारण तो शब्बाथ मोडत असे इतकेच नाही, तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवासमान करत असे.
स्वर्गीय पित्यावर येशू कसा अवलंबून राहतो ह्याचा त्याने केलेला खुलासा
19ह्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले : मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्यावाचून त्याला स्वतः होऊन काहीही करता येत नाही; कारण जे काही तो करतो ते पुत्रही तसेच करतो.
20कारण पिता पुत्रावर प्रीती करतो आणि स्वतः जे काही करतो ते सर्व त्याला दाखवतो. तुम्हांला आश्‍चर्य वाटावे म्हणून तो ह्यांहून मोठी कामे त्याला दाखवील.
21कारण जसा पिता मेलेल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो.
22पिता कोणाचाही न्याय करत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे;
23ह्यासाठी की, जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही तो, ज्याने मला पाठवले, त्या पित्याचा सन्मान करत नाही.
24मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे.
25मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो की, मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे.
26कारण पित्याच्या ठायी जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठायीही स्वत:चे जीवन असावे असे त्याने त्याला दिले;
27आणि तो मनुष्याचा पुत्र आहे, ह्या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्याला दिला.
28,29ह्याविषयी आश्‍चर्य करू नका; कारण कबरांतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.
येशूविषयी देण्यात आलेली साक्ष
30मला स्वत: होऊन काही करता येत नाही; जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करतो; आणि माझा निवाडा यथार्थ आहे; कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला पाहतो.
31मी स्वतःविषयी साक्ष दिली तर माझी साक्ष खरी नाही.
32माझ्याविषयी साक्ष देणारा दुसरा आहे; आणि जी साक्ष तो माझ्याविषयी देतो, ती खरी आहे हे मला ठाऊक आहे.
33तुम्ही योहानाकडे पाठवून विचारले व त्याने सत्याविषयी साक्ष दिली आहे.
34पण मी माणसांची साक्ष मान्य करत नाही; तथापि तुम्हांला तारण प्राप्त व्हावे म्हणून मी हे सांगतो.
35तो जळता व प्रकाश देणारा दिवा होता, आणि तुम्ही त्याच्या प्रकाशात काही वेळ हर्ष करण्यास राजी झालात.
36परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे; कारण जी कार्ये सिद्धीस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपवले आहे, म्हणजे जी कार्ये मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की, पित्याने मला पाठवले आहे.
37आणखी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच माझ्याविषयी साक्ष दिली आहे. तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही व त्याचे स्वरूपही पाहिले नाही,
38आणि त्याचे वचन तुम्ही आपणांमध्ये दृढ राखले नाही; कारण ज्याला त्याने पाठवले त्याचे तुम्ही खरे मानत नाही.
39तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता;1 कारण त्यांच्या द्वारे तुम्हांला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हांला वाटते; आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत;
40तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हांला इच्छा होत नाही.
41मी मनुष्यांकडून प्रशंसा करून घेत नाही.
42परंतु मी तुम्हांला ओळखले आहे की, तुमच्या ठायी देवाची प्रीती नाही.
43मी आपल्या पित्याच्या नावाने आलो आहे पण तुम्ही माझा स्वीकार करत नाही; दुसरा कोणी स्वतःच्या नावाने आला तर त्याचा तुम्ही स्वीकार कराल.
44जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करत नाही, त्या तुम्हांला विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे?
45मी पित्यासमोर तुम्हांला दोष लावीन असे समजू नका; ज्याच्यावर तुम्ही आशा ठेवली आहे तो मोशे तुम्हांला दोष लावणार आहे.
46तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता, तर माझ्यावर विश्वास ठेवला असता; कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे.
47तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवत नाही तर माझ्या वचनांवर विश्वास कसा ठेवाल?”

ที่ได้เลือกล่าสุด:

योहान 5: MARVBSI

เน้นข้อความ

แบ่งปัน

คัดลอก

None

ต้องการเน้นข้อความที่บันทึกไว้ตลอดทั้งอุปกรณ์ของคุณหรือไม่? ลงทะเบียน หรือลงชื่อเข้าใช้

แผนการอ่าน และบทใคร่ครวญประจำวัน ตามหัวข้อ योहान 5 ฟรี

YouVersion ใช้คุกกี้สำหรับการปรับแต่งการใช้งาน และประสบการณ์ของคุณ การที่คุณได้ใช้เว็บไซต์ของเรา ถือเป็นการที่คุณยอมรับวัตถุประสงค์ของการใช้คุกกี้ ซึ่งมีคำอธิบายอยู่ในนโยบายความเป็นส่วนตัวของเรา