योहान 1

1
शब्द देही झाला
1प्रारंभी शब्द होता आणि शब्द परमेश्वरा समवेत होता आणि शब्द परमेश्वर होता. 2तोच प्रारंभीपासून परमेश्वराबरोबर होता. 3शब्दाद्वारे सर्वगोष्टी निर्माण झाल्या आणि जे काही निर्माण झाले ते त्यांच्याशिवाय निर्माण झाले नाही. 4त्यांच्यामध्ये जीवन होते आणि तेच जीवन संपूर्ण मनुष्यजातीला प्रकाश देत होते. 5तो प्रकाश अंधारात उजळत होता आणि अंधाराने त्या प्रकाशाला ओळखले नाही.
6परमेश्वराने योहान नावाच्या मनुष्याला पाठविले. 7तो त्या प्रकाशाविषयी प्रमाण पटावे व साक्ष द्यावी म्हणून आला, यासाठी की त्यांच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. 8तो स्वतः प्रकाश नव्हता; तो केवळ त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला होता.
9जो खरा प्रकाश प्रत्येकाला प्रकाश देतो तो जगात येणार होता. 10तो जगात होता आणि जगाची निर्मिती त्यांच्याद्वारे झाली, तरी जगाने त्यांना ओळखले नाही. 11ते त्यांच्या स्वतःच्या लोकांकडे आले, परंतु त्यांनी त्यांचा स्वीकार केला नाही. 12परंतु ज्या सर्वांनी त्यांना स्वीकारले, त्यांच्या नावावर विश्वास ठेवला, त्यांना त्याने परमेश्वराची मुले होण्याचा अधिकार दिला— 13लेकरांचा जन्म ना वंशाने, ना मानवी इच्छेने किंवा पतीच्या इच्छेने, तर परमेश्वरापासून झाला.
14शब्दाने मानवी शरीर धारण केले व आमच्यामध्ये त्यांनी वास्तव्य केले. आम्ही त्यांचे गौरव पाहिले, ते गौरव एकमेव पुत्राचे, जो पित्यापासून आला व जो अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होता त्यांचे होते.
15योहानाने त्यांच्याबद्दल साक्ष दिली. तो ओरडून म्हणाला, “ज्यांच्याविषयी मी म्हणालो होतो, ‘जे माझ्यानंतर येणार आहे, ते माझ्यापेक्षा थोर आहे कारण जे माझ्या अगोदर होते, ते हेच आहेत.’ ” 16त्यांच्या पूर्णतेतून आम्हा सर्वांना कृपेवर कृपा भरून मिळाली आहे. 17कारण मोशेद्वारे नियमशास्त्र देण्यात आले होते; परंतु येशू ख्रिस्ताद्वारे कृपा व सत्य देण्यात आले आहे. 18परमेश्वराला कोणी कधीही पाहिलेले नाही, परंतु त्यांचा एकुलता एक पुत्र, जे स्वतः परमेश्वर आहेत आणि पित्याच्या निकट सहवासात राहतात, त्या पित्याने त्यांना प्रकट केले आहे.
बाप्तिस्मा करणारा योहान स्वतः ख्रिस्त असल्याचे नाकारतो
19जेव्हा यहूदी पुढार्‍यांनी यरुशलेम येथून याजक आणि लेवी यांना योहानाकडे विचारपूस करावयास पाठविले की तो कोण आहे, त्यावेळी योहानाने दिलेली ही साक्ष होय. 20तो कबूल करण्यास कचरला नाही, त्याने मोकळेपणाने सांगितले, तो म्हणाला, “मी ख्रिस्त नाही.”
21त्यावर त्यांनी परत विचारले, “मग तुम्ही कोण आहात? तुम्ही एलीया आहात काय?”
त्याने उत्तर दिले, “नाही.”
“मग आपण संदेष्टा आहात काय?”
त्याने उत्तर दिले, “नाही.”
22शेवटी ते म्हणाले, “तर मग आपण आहात तरी कोण? आम्हाला सांगा, म्हणजे ज्यांनी आम्हाला हे विचारण्यास पाठविले आहे त्यांना उत्तर देता येईल.”
23यशया संदेष्टा याच्या शब्दात योहानाने उत्तर दिले, मी अरण्यात घोषणा करणारी वाणी आहे, ती म्हणते, “ ‘प्रभुचे मार्ग सरळ करा.’ ”#1:23 यश 40:3
24आता ज्या परूश्यांनी त्यांना पाठविले होते, 25त्यांनी प्रश्न विचारला की, “तुम्ही ख्रिस्त नाही, एलीया नाही व संदेष्टाही नाही तर तुम्ही बाप्तिस्मा का करता?”
26तेव्हा योहान उत्तरला, “मी पाण्याने बाप्तिस्मा करतो, परंतु तुम्हामध्ये एकजण असा आहे की, ज्याला तुम्ही ओळखत नाही. 27तो हाच आहे जो माझ्यानंतर येत आहे आणि त्याच्या वहाणांचे बंद सोडण्यासाठी एक दास होण्याची देखील माझी पात्रता नाही.”
28हे सर्व यार्देन नदीच्या पलीकडे बेथानी येथे घडले, जेथे योहान बाप्तिस्मा देत होता.
योहानाची येशूंबद्दल साक्ष
29दुसर्‍या दिवशी येशूंना आपणाकडे येत असताना योहानाने पाहिले आणि तो म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप वाहून नेणारा परमेश्वराचा कोकरा! 30ते हेच आहेत, ज्यांच्या संदर्भात मी म्हणत होतो, ‘हा मनुष्य जो माझ्यानंतर येणार आहे, ते माझ्यापेक्षा थोर आहे कारण ते माझ्यापूर्वी होता.’ 31मला स्वतः त्यांची ओळख नव्हती, पण मी याच कारणासाठी पाण्याने बाप्तिस्मा करत आलो की त्यांनी इस्राएल लोकांस प्रकट व्हावे.”
32मग योहानाने अशी साक्ष दिली: “स्वर्गातून पवित्र आत्मा कबुतरासारखा खाली आला व त्यांच्यावर स्थिरावला. 33मी स्वतः त्यांना ओळखत नव्हतो, परंतु ज्यांनी मला पाण्याने बाप्तिस्मा करण्यासाठी पाठविले त्यांनी मला सांगितले होते की, ‘ज्या मनुष्यावर आत्मा उतरताना आणि स्थिरावताना तुम्ही पाहाल, तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देईल.’ 34हे घडताना मी स्वतः पाहिले आहे आणि साक्ष देतो की हे परमेश्वराचे पुत्र आहेत.”#1:34 पाहा यश 42:1 अनेक मूळप्रतींमध्ये परमेश्वराचा पुत्र.
योहानाचे शिष्य येशूंना अनुसरतात
35दुसर्‍या दिवशी योहान आपल्या दोन शिष्यांसह उभा असताना, 36येशूंना जाताना पाहून, योहानाने म्हटले, “हा पाहा, परमेश्वराचा कोकरा!”
37त्या दोन शिष्यांनी त्याला हे बोलताना ऐकले, तेव्हा ते येशूंना अनुसरले. 38येशूंनी मागे वळून ते आपल्याला अनुसरत आहेत हे पाहून विचारले, “तुम्हाला काय पाहिजे?”
त्यांनी उत्तर दिले, “रब्बी” म्हणजे “गुरुजी, आपण कोठे राहता?”
39येशूंनी म्हटले, “या आणि पाहा.”
त्यांनी जाऊन त्यांचे निवासस्थान पाहिले आणि तो संपूर्ण दिवस त्यांनी त्यांच्याबरोबर घालविला. त्यावेळी दुपारचे चार वाजले होते.
40योहानाचे बोलणे ऐकून ज्यांनी येशूंना अनुसरले होते, त्या दोन शिष्यांमधील एक आंद्रिया, शिमोन पेत्राचा भाऊ होता. 41आंद्रियाने पहिली गोष्ट ही केली की त्याने त्याचा भाऊ शिमोन याला शोधले आणि त्याला सांगितले, “आम्हाला मसीहा म्हणजे ख्रिस्त सापडला आहे.” 42मग तो त्याला येशूंकडे घेऊन आला.
येशूंनी त्याच्याकडे पाहून म्हटले, “तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस, तुला केफा, म्हणजे खडक असे म्हणतील.” भाषांतर केल्यानंतर पेत्र#1:42 केफा अरेमिक आणि पेत्र ग्रीक दोन्हीचा अर्थ खडक असा होतो..
येशू, फिलिप्प व नथनेल यांना पाचारण करतो
43दुसर्‍या दिवशी येशूंनी गालील प्रांतात जाण्याचे ठरविले. त्यांना फिलिप्प सापडल्यावर ते त्याला म्हणाले, “माझ्यामागे ये.”
44फिलिप्प हा आंद्रिया आणि पेत्र यांच्याप्रमाणेच बेथसैदा नगरचा रहिवासी होता. 45मग फिलिप्पाला नाथानाएल सापडल्यानंतर तो त्याला म्हणाला, “ज्यांच्याबद्दल मोशेने नियमशास्त्रात लिहून ठेवले आणि ज्यांच्याबद्दल संदेष्ट्यांनीसुद्धा कथन केले ते, येशू नासरेथकर, योसेफाचे पुत्र आम्हाला सापडले आहेत.”
46त्यावर नाथानाएलाने विचारले, “नासरेथ! तेथून काही चांगले निघू शकेल काय?”
यावर फिलिप्पाने त्याला म्हटले, “तू ये आणि पाहा.”
47आपल्याकडे नाथानाएल येताना पाहून, येशू म्हणाले, “हा खरा इस्राएली असून याच्यामध्ये फसवणूक आढळत नाही.”
48तेव्हा नाथानाएलाने विचारले, “तुम्ही मला कसे ओळखता?”
येशूंनी त्याला उत्तर दिले, “फिलिप्पाने तुला बोलवण्यापूर्वी मी तुला अंजिराच्या झाडाखाली उभे असताना पाहिले होते.”
49नाथानाएलाने जाहीर केले, “गुरुजी, आपण परमेश्वराचे पुत्र; आपण इस्राएलचे राजे आहात.”
50त्यावर येशू म्हणाले, “मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे सांगितले म्हणून तू विश्वास ठेवतोस. परंतु यापेक्षा अधिक मोठ्या गोष्टी तू पाहशील.” 51ते पुढे असेही म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, की तुम्ही स्वर्ग उघडलेला आणि परमेश्वराचे स्वर्गदूत वर चढताना व मानवपुत्रावर उतरताना पाहाल.”

Айни замон обунашуда:

योहान 1: MRCV

Лаҳзаҳои махсус

Паҳн кунед

Нусха

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in