उत्प. 19

19
देवदूतांची सदोमास भेट
1संध्याकाळी ते दोन देवदूत सदोमास आले, त्या वेळी लोट सदोमाच्या वेशीजवळ बसला होता. लोटाने त्यांना पाहिले, तो त्यांना भेटण्यास उठला, आणि त्याने भूमीपर्यंत तोंड लववून त्यांना नमन केले. 2तो म्हणाला, “माझ्या स्वामी, मी तुम्हास विनंती करतो की, कृपा करून तुम्ही आपल्या सेवकाच्या घरात या, आपले पाय धुवा, आणि आजची रात्र मुक्काम करा.” मग तुम्ही लवकर उठून तुमच्या मार्गाने जा. पण ते म्हणाले, “नाही, आम्ही रात्र नगरातील चौकात घालवू.” 3परंतु लोटाने त्यांना आग्रहाने विनंती केली, म्हणून ते त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेले. त्याने त्यांच्यासाठी जेवण तयार केले व बेखमीर भाकरी भाजल्या आणि ते जेवले. 4परंतु ते झोपण्यापूर्वी, त्या नगरातील मनुष्यांनी, सदोम नगराच्या सर्व भागातील तरुण व वृद्ध अशा सर्व माणसांनी लोटाच्या घराला वेढले. 5त्यांनी लोटाला हाक मारून म्हटले “आज रात्री तुझ्याकडे आलेली माणसे कोठे आहेत? त्यांना आमच्याकडे बाहेर आण; म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू.” 6लोट घराच्या दारातून बाहेर त्यांच्याकडे आला व त्याने आपल्यामागे दार बंद करून घेतले. 7तो म्हणाला, “माझ्या बंधूनो, मी तुम्हास विनंती करतो, तुम्ही असे भयंकर वाईट काम करू नका. 8पाहा, माझ्या दोन मुली आहेत ज्यांचा अद्याप कोणाही पुरुषाशी संबंध आला नाही. मी तुम्हास विनंती करतो, मला त्यांना तुमच्याकडे बाहेर आणू द्या, आणि तुम्हास जे चांगले दिसेल तसे त्यांना करा. फक्त या मनुष्यांना काही करू नका, कारण ते माझ्या छपराच्या सावलीखाली राहण्यास आले आहेत.” 9ते म्हणाले, “बाजूला हो!” ते असेही म्हणाले, “हा आमच्यात परराष्ट्रीय म्हणून राहण्यास आला. आणि आता हा आमचा न्यायाधीश बनू पाहत आहे! आता आम्ही तुझे त्यांच्यापेक्षा वाईट करू.” ते त्या मनुष्यास म्हणजे लोटाला अधिक जोराने लोटू लागले व दरवाजा तोडण्यास ते जवळ आले. 10परंतु त्या पुरुषांनी त्यांचा हात बाहेर काढून लोटाला आपणाजवळ घरात घेऊन दार बंद केले. 11लोटाच्या पाहुण्यांनी घराच्या दाराबाहेर जी सर्व तरुण व म्हातारी माणसे होती, त्यांना आंधळे करून टाकले. ते घराचे दार शोधण्याचा प्रयत्न करून करून थकून गेले.
सदोम आणि गमोरा ह्या नगरांचा नाश
मत्त. 11:23-24; लूक 17:28-32
12मग ते पुरुष लोटाला म्हणाले, “तुझे दुसरे कोणी येथे आहे काय? जावई, तुझी मुले, तुझ्या मुली आणि तुझे जे कोणी या नगरात आहेत त्यांना येथून बाहेर काढ. 13यासाठी की, आम्ही या ठिकाणाचा नाश करणार आहोत. कारण या लोकांच्या दुष्टतेचा फार मोठा बोभाटा परमेश्वरासमोर झाला आहे, म्हणून त्याने आम्हांला या नगराचा नाश करण्यासाठी पाठवले आहे.” 14मग लोट बाहेर गेला व ज्या मनुष्यांनी त्याच्या मुलींशी लग्न केले होते त्या आपल्या जावायांना तो म्हणाला, “उठा, तुम्ही, लवकर या ठिकाणातून बाहेर पडा; कारण परमेश्वर देव या नगराचा नाश करणार आहे.” परंतु लोट गंमत करत आहे असे त्याच्या जावयांना वाटले. 15मग पहाट झाल्यावर दूत लोटाला घाई करून म्हणाले, “ऊठ, या नगराला शिक्षा होणार आहे; तेव्हा तू, तुझी पत्नी व तुझ्या येथे असलेल्या दोन मुली यांना घेऊन नीघ म्हणजे मग या नगराच्या शिक्षेत तुमचा नाश होणार नाही.” 16परंतु तो उशीर करीत राहिला. तेव्हा परमेश्वराची त्याच्यावर कृपा होती, म्हणून त्या पुरुषांनी त्याचा हात आणि त्याच्या पत्नीचा आणि त्याच्या दोन मुलींचे हात धरून त्यांना बाहेर आणले आणि नगराबाहेर आणून सोडले. 17त्यांनी त्यांना बाहेर आणल्यावर त्यातील एक पुरुष म्हणाला, “आता पळा व तुमचे जीव वाचवा, नगराकडे मागे वळून पाहू नका आणि या मैदानात कोणत्याही ठिकाणी थांबू नका; डोंगराकडे निसटून जा म्हणजे तुमचा नाश होणार नाही.” 18लोट त्यांना म्हणाला, “हे माझ्या प्रभू, असे नको, कृपा कर! 19माझा जीव वाचवून तू माझ्यावर मोठी दया दाखवली आहेस आणि तुझी कृपादृष्टी तुझ्या दासास प्राप्त झाली आहे, परंतु मी डोंगरापर्यंत पळून जाऊ शकणार नाही, कारण आपत्ती मला गाठेल व मी मरून जाईन. 20पाहा, पळून जाण्यासाठी हे नगर जवळ आहे, आणि ते लहान आहे, कृपा करून मला तिकडे पळून जाऊ दे, ते लहान नाही काय? म्हणजे माझा जीव वाचेल.” 21तो त्यास म्हणाला, “ठीक आहे, मी तुझी ही विनंतीसुद्धा मान्य करतो. तू उल्लेख केलेल्या नगराचा नाश मी करणार नाही. 22त्वरा कर! तिकडे पळून जा, कारण तू तेथे पोहचेपर्यंत मला काही करता येणार नाही.” यावरुन त्या नगराला सोअर असे नाव पडले. 23जेव्हा लोट सोअर नगरामध्ये पोहचला तेव्हा सूर्य उगवला होता, 24नंतर परमेश्वराने सदोम व गमोरा या नगरांवर आकाशातून गंधक व अग्नी यांचा वर्षाव केला. 25त्याने त्या नगरांचा नाश केला, तसेच त्या सगळ्या खोऱ्याचा आणि त्या नगरात राहणाऱ्या सगळ्यांचा, आणि जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींचा नाश केला. 26परंतु लोटाची पत्नी त्याच्यामागे होती, तिने मागे वळून पाहिले, आणि ती मिठाचा खांब झाली. 27अब्राहाम सकाळी लवकर उठला आणि परमेश्वरासमोर तो ज्या ठिकाणी उभा राहिला होता तेथे गेला. 28त्याने तेथून सदोम व गमोरा नगराकडे आणि खोऱ्यातील सर्व प्रदेशाकडे पाहिले. त्याने पाहिले तेव्हा पाहा, त्या अवघ्या प्रदेशातून भट्टीच्या धुरासारखा धूर त्या प्रदेशातून वर चढताना त्यास दिसला. 29देवाने जेव्हा त्या खोऱ्यातील नगरांचा नाश केला तेव्हा अब्राहामाची आठवण केली. त्याने लोट राहत होता त्या नगरांचा नाश करण्यापूर्वी लोटाला त्या नाशातून काढले.
मवाबी आणि अम्मोनी ह्यांच्या वंशांचा प्रारंभ
30परंतु लोट त्याच्या दोन मुलींबरोबर सोअर नगरातून निघून डोंगरात राहण्यासाठी चढून गेला, कारण त्यास सोअरात राहण्याची भीती वाटली. तो आपल्या दोन मुलींसह एका गुहेत राहिला. 31थोरली मुलगी धाकटीला म्हणाली, “आपला पिता म्हातारा झाला आहे आणि जगाच्या रीतीप्रमाणे आपल्याबरोबर संबंध ठेवण्यास येथे कोठेही कोणी पुरुष नाही. 32चल, आपल्या पित्याला द्राक्षरस पाजू, आणि त्याच्याबरोबर झोपू. अशा रीतीने आपल्या पित्याचा आपण वंश चालवू.” 33म्हणून, त्या रात्री त्यांनी आपल्या पित्याला द्राक्षरस पाजला. नंतर थोरली मुलगी आपल्या पित्याबरोबर झोपली; ती कधी झोपली व कधी उठली हे त्यास समजले नाही. 34दुसऱ्या दिवशी थोरली धाकटीला म्हणाली, “मी काल रात्री माझ्या बापाबरोबर झोपले, तर आज रात्री पुन्हा आपण बापाला द्राक्षरस पाजू या, मग रात्री तू बापाबरोबर झोप. अशा रीतीने आपण बापाचा वंश चालवू.” 35तेव्हा त्या रात्रीही त्यांनी आपल्या बापाला द्राक्षरस पाजला, नंतर धाकटी मुलगी आपल्या बापाबरोबर झोपली, आणि ती कधी झोपली व कधी उठली हे त्यास समजले नाही. 36अशा रीतीने लोटाच्या दोन्हीही मुली आपल्या बापापासून गरोदर राहिल्या. 37वडील मुलीला मुलगा झाला, तेव्हा तिने त्याचे नाव मवाब ठेवले. आजपर्यंत जे मवाबी लोक आहेत, त्यांचा हा मूळ पुरुष. 38धाकट्या मुलीलाही मुलगा झाला; तिने त्याचे नाव बेनअम्मी असे ठेवले; आजमितीला जे अम्मोनी लोक त्यांचा हा मूळ पुरुष.

Айни замон обунашуда:

उत्प. 19: IRVMar

Лаҳзаҳои махсус

Паҳн кунед

Нусха

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in