लूक 24

24
1आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी भल्या पहाटेस, आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या स्त्रिया कबरीजवळ आल्या, 2तेव्हा कबरीबरून शिळा बाजूला केलेली आहे, असे त्यांना आढळले. 3त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. 4म्हणून त्या गोंधळून गेल्या. तेवढ्यात लखलखीत वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ अकस्मात उभे राहिले. 5भयभीत होऊन त्या खाली बघत असता, ते पुरुष त्यांना म्हणाले, “तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? 6तो येथे नाही, तर तो उठला आहे. तो गालीलात होता तेव्हा त्याने तुम्हांला काय सांगितले होते, ते आठवा. 7ते असे की, मनुष्याच्या पुत्राला पापी लोकांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला क्रुसावर चढवण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे.”
8तेव्हा त्या स्त्रियांना येशूच्या शब्दांची आठवण झाली. 9कबरीजवळून त्या परत गेल्या व त्यांनी अकरा प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना हे सगळे वर्तमान सांगितले. 10त्या स्त्रिया मरिया मग्दालिया, योहान व याकोबची आई मरिया ह्या होत्या. त्यांच्याबरोबर ज्या दुसऱ्या होत्या, त्यांनीही हे वृत्त प्रेषितांना सांगितले. 11परंतु हे वृत्त त्यांना वायफळ बडबड वाटली व त्यांनी त्या स्त्रियांवर विश्वास ठेवला नाही. 12मात्र पेत्र उठून कबरीकडे धावत गेला व ओणवे होऊन त्याने आत पाहिले, तेव्हा त्याला केवळ तागाच्या कापडाचे तुकडे दिसले. झालेल्या प्रकाराविषयी आश्चर्यचकित होऊन तो घरी गेला.
अम्माऊसच्या रस्त्यावर दोन शिष्यांना दर्शन
13त्याच दिवशी येशूच्या शिष्यांपैकी दोघे जण यरुशलेमपासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला जायला निघाले होते. 14घडलेल्या सर्व घटनांविषयी ते एकमेकांशी संभाषण करत होते. 15ते संभाषण व चर्चा करत असताना येशू स्वतः त्यांच्याजवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला. 16त्यांनी त्याला पाहिले परंतु ओळखले नाही. 17येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात, त्या कोणत्या?” ते दुःखी होऊन उभे राहिले. 18त्यांच्यातील क्लयपा नावाच्या एकाने त्याला उत्तर दिले, “अलीकडे यरुशलेममध्ये घडलेल्या घटना ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय?”
19तो त्यांना म्हणाला, “कोणत्या घटना?” त्यांनी त्याला म्हटले, “नासरेथकर येशूविषयीच्या. तो देवाच्या व सर्व लोकांच्या नजरेत कृतीने व उक्‍तीने पराक्रमी संदेष्टा होता. 20त्याला आमच्या मुख्य याजकांनी व अधिकाऱ्यांनी देहान्ताच्या शिक्षेसाठी पकडून क्रुसावर चढवले. 21इस्राएलची मुक्‍ती करणारा तो हाच, अशी आमची आशा होती. शिवाय ह्या सर्व गोष्टी होऊन आज तीन दिवस झाले. 22आणखी आमच्यातील ज्या अनेक स्त्रिया भल्या पहाटेस कबरीकडे गेल्या होत्या, त्यांनी तर आम्हांला थक्कच केले. 23त्यांना त्याचे शरीर कबरीत सापडले नाही. त्यांनी येऊन म्हटले, ‘आम्हांला देवदूतांचे दर्शन झाले व देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे.’ 24मग आमच्यापैकी काही जण कबरीकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणेच त्यांना आढळले. मात्र त्यांना त्याचे शरीर दिसले नाही.”
25मग येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही किती निर्बुद्ध व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यात किती मतिमंद आहात! 26ख्रिस्ताने ही दुःखे सोसावीत आणि आपल्या वैभवात प्रवेश करावा, हे क्रमप्राप्त नव्हते काय?” 27मग येशूने मोशे व सर्व संदेष्टे ह्यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण धर्मशास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला.
28ज्या गावास ते जात होते, त्या गावाजवळ ते आले, तेव्हा त्याला जणू पुढे जायचे आहे, असे येशूने दाखवले. 29परंतु ते त्याला विनंती करून म्हणाले, “आमच्याबरोबर राहा, संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे.” तो त्यांच्याबरोबर वसती करायला आत गेला. 30तेथे तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असता त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. 31तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले आणि तो अंतर्धान पावला. 32ते एकमेकांना म्हणाले, “तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व धर्मशास्त्राचा उलगडा करत होता, तेव्हा आपली अंतःकरणे आपल्याठायी धगधगत नव्हती काय?”
33त्याच घटकेस ते उठून यरुशलेम येथे परत गेले. तेथे अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबरचे लोक एकत्र जमलेले त्यांना आढळले. 34ते म्हणत होते की, प्रभू खरोखर उठला आहे व तो शिमोनच्या दृष्टीस पडला आहे.
35ह्या दोघा शिष्यांनी वाटेतल्या घटना त्यांना सांगितल्या व येशूने भाकर मोडली, तेव्हा आपण प्रभूला कसे ओळखले, हे निवेदन केले.
येशूचे प्रेषितांना दर्शन
36ते दोघे ह्या गोष्टी सांगत असता येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती लाभो.”
37ते भयभीत झाले. आपण भूत पाहत आहोत, असे त्यांना वाटले. 38त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही का घाबरता व तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात? 39माझे हात व माझे पाय पाहा. मी स्वतः तो आहे. मला चाचपून पाहा. जसे मला हाडमांस असलेले पाहता, तसे भुताला नसते.”
40असे बोलून त्याने त्यांना त्याचे हात व पाय दाखवले. 41तरीही त्यांना विश्वास ठेवणे अवघड वाटत होते. मात्र ते हर्षभराने आश्चर्यचकित झाल्यामुळे येशूने त्यांना म्हटले, “येथे तुमच्याजवळ खाण्यास काही आहे काय?” 42त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा दिला. 43तो घेऊन त्याने त्यांच्यादेखत खाल्‍ला.
44नंतर तो त्यांना म्हणाला, “मी तुमच्याबरोबर असताना तुम्हांला सांगितलेली माझी वचने हीच आहेत:मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे ह्यांत माझ्याविषयी जे लिहिलेले आहे ते सर्व पूर्ण होणे आवश्यक होते.”
45त्यांना धर्मशास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन जागृत केले. 46त्याने त्यांना म्हटले, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून उठावे 47आणि यरुशलेमपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांत त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी. 48तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षीदार आहात. 49पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेले वरदान मी तुमच्याकडे पाठवतो. मात्र तुम्हांला स्वर्गीय सामर्थ्याचे वरदान प्राप्त होईपर्यंत ह्या शहरात राहा.”
येशूचे स्वर्गारोहण
50त्यानंतर त्याने त्यांना बेथानीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला. 51त्यांना आशीर्वाद देत असताना तो त्यांच्यापासून दूरदूर होत वर स्वर्गात घेतला गेला. 52तेव्हा ते त्याची आराधना करून अतिशय आनंदाने यरुशलेमला परत गेले 53व मंदिरात देवाला अविरत धन्यवाद देत राहिले.

தற்சமயம் தேர்ந்தெடுக்கப்பட்டது:

लूक 24: MACLBSI

சிறப்புக்கூறு

பகிர்

நகல்

None

உங்கள் எல்லா சாதனங்களிலும் உங்கள் சிறப்பம்சங்கள் சேமிக்கப்பட வேண்டுமா? பதிவு செய்யவும் அல்லது உள்நுழையவும்