Chapa ya Youversion
Ikoni ya Utafutaji

लूक 2

2
येशूंचा जन्म
1त्या दिवसात कैसर औगुस्ताने सर्व जगातील रोमी लोकांची शिरगणती करावी असा हुकूम काढला. 2ही पहिली जनगणना क्विरीनिय हा सीरियाचा राज्यपाल असताना घेण्यात आली होती. 3तेव्हा प्रत्येकजण आपआपल्या गावी नोंदणी करण्यासाठी गेले.
4योसेफसुद्धा दावीदाच्या घराण्यातील व वंशातील असल्यामुळे, तो यहूदीया प्रांतातील गालीलातील नासरेथ या दावीदाच्या गावी बेथलेहेम#2:4 बेथलेहेम हिब्रू भाषेनुसार बेथलेहेम येथे वर गेला. 5नाव नोंदणीसाठी त्याने आपली भावी वधू मरीया हिला बरोबर घेतले कारण तिला लवकरच बाळ होणे अपेक्षित होते. 6जेव्हा ते त्या ठिकाणी होते, तेव्हा बाळाचा जन्म होण्याची वेळ आली, 7आणि तिने आपल्या प्रथमपुत्राला जन्म दिला. तिने त्याला गोठ्यातील गव्हाणीत ठेवले, कारण तिथे त्यांच्यासाठी विश्रांतिगृह उपलब्ध नव्हते.
8आणि त्या भागात मेंढपाळ रानात राहून, रात्रीच्या समयी त्यांचे कळप राखीत होते. 9इतक्यात त्यांच्यामध्ये प्रभूचा देवदूत प्रकट झाला आणि परमेश्वराचे गौरव त्यांच्याभोवती प्रकाशले आणि ते अत्यंत भयभीत झाले. 10परंतु देवदूत मेंढपाळांना म्हणाला, “भिऊ नका. मी तुमच्यासाठी एक शुभवार्ता आणली आहे, ज्यामुळे सर्व लोकांना मोठा हर्ष होईल. 11आज दावीदाच्या नगरात तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे; तोच ख्रिस्त प्रभू आहे. 12त्याची खूण ही आहे: बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत निजविलेले असे बालक तुम्हाला सापडेल.”
13अचानक त्या दूताबरोबर स्वर्गदूतांचा एक मोठा समूह त्यांना दिसला, ते परमेश्वराची स्तुती करीत म्हणाले,
14“सर्वोच्च स्वर्गामध्ये परमेश्वराला गौरव,
आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्यांची कृपादृष्टी झाली आहे, त्यांना शांती असो.”
15देवदूत त्यांना सोडून स्वर्गात वर गेल्यानंतर, मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले: “चला, आपण बेथलेहेमला जाऊ आणि प्रभूने सांगितलेली ही जी घटना घडली आहे, ती प्रत्यक्ष पाहू.”
16ते घाईघाईने गेले आणि ज्या ठिकाणी ते बालक गव्हाणीत निजले होते तिथे त्यांनी मरीया आणि योसेफ यांना शोधून काढले. 17त्यांनी त्या बालकाला पाहिल्यानंतर, त्या बालकाविषयी त्यांना जे काही सांगण्यात आले होते, ते सर्वठिकाणी विदित केले. 18मेंढपाळांनी जे सांगितले व ज्यांनी ऐकले ते सर्वजण आश्चर्यचकित झाले. 19परंतु मरीयेने ते सर्व आपल्या हृदयात साठवून ठेवले आणि त्यावर ती विचार करीत असे. 20मेंढपाळांना जे सांगण्यात आले होते, त्याप्रमाणे सर्वगोष्टी घडल्या व त्यांनी सर्वगोष्टी ऐकल्या व पाहिल्यानंतर ते परमेश्वराचे गौरव व स्तुती करीत परत गेले.
21आठव्या दिवशी, बालकाची सुंता करण्याची वेळ आली, त्यावेळी त्यांचे नाव येशू ठेवण्यात आले, हे नाव त्यांना त्यांची गर्भधारणा होण्यापूर्वीच देवदूताने दिले होते.
मंदिरात येशूंचे समर्पण
22मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे शुद्धीकरणाच्या अर्पणाची वेळ आली, तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी त्याला प्रभूला सादर करण्यासाठी यरुशलेमला नेले. 23कारण प्रभूच्या नियमात असे लिहिलेले आहे, “प्रत्येक प्रथम जन्मलेला पुत्र प्रभूला समर्पित केला पाहिजे.”#2:23 निर्ग 13:2, 12 24प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे हे अर्पण: “दोन कबुतरे किंवा पारव्याची दोन पिल्ले,”#2:24 लेवी 12:8 असे होते.
25यरुशलेम येथे शिमोन नावाचा एक मनुष्य होता, तो नीतिमान आणि भक्तिमान होता व इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत असून पवित्र आत्मा त्याजवर होता. 26कारण प्रभू ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तुला मरण येणार नाही, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. 27पवित्र आत्म्याने प्रवृत्त होऊन तो मंदिराच्या परिसरात गेला. तेव्हा आईवडिलांनी नियमशास्त्रात सांगितलेला विधी पूर्ण करण्यासाठी येशू बाळाला मंदिरात आणले, 28तेव्हा शिमोनाने बाळाला आपल्या हातात घेतले आणि परमेश्वराची स्तुती करीत म्हटले:
29“हे सर्वशक्तिमान प्रभू, तुमच्या वचनाप्रमाणे
आता तुमच्या सेवकाला शांतीने घेऊन जावे.
30मी तुमचे तारण माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे.
31जे तुम्ही सर्व राष्ट्रांच्या नजरेसमोर सिद्ध केले आहे,
32ते गैरयहूदीयांसाठी प्रकटीकरणाचा प्रकाश,
आणि आपल्या इस्राएली लोकांचे गौरव आहे.”
33आपल्या पुत्राविषयी हे बोलणे ऐकून योसेफ आणि मरीया आश्चर्यचकित झाले. 34मग शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला आणि बाळाची आई मरीयाला म्हणाला: “इस्राएलमध्ये अनेकांचे पतन व पुन्हा उठणे आणि ज्या विरुद्ध लोक बोलतील, हा असे चिन्ह होईल, यासाठी या बालकाला नेमून ठेवले आहे. 35यावेळी अनेकांच्या हृदयातील विचार उघड केले जातील व तुझ्या जिवातून तलवार भोसकली जाईल.”
36त्यावेळी हन्ना एक संदेष्टी होती, ती आशेर वंशातील फनूएलाची कन्या असून फार वयोवृद्ध होती. विवाहानंतर सात वर्षे ती तिच्या पतीबरोबर राहिली होती. 37आणि चौर्‍याऐंशी वर्षापर्यंत विधवा#2:37 किंवा 84 वर्षे विधवा होती होती. तिने मंदिर कधीच न सोडता, रात्रंदिवस प्रार्थना व उपास करून परमेश्वराची आराधना केली. 38तिने त्यावेळी तिथे येऊन, परमेश्वराची उपकारस्तुती केली आणि जे यरुशलेमची सुटका होण्याची वाट पाहत होते त्या प्रत्येकाला त्या बाळाविषयी सांगू लागली.
39येशूंच्या आईवडिलांनी प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्वकाही केल्यानंतर ते गालीलातील नासरेथ गावी आपल्या घरी परत आले. 40तो बालक वाढत गेला आणि बलवान झाला; तो शहाणपणाने भरलेला होता आणि त्याच्यावर परमेश्वराची कृपा होती.
बालक येशू मंदिरात येतात
41येशूंचे आईवडील दरवर्षी वल्हांडण सणासाठी यरुशलेम येथे जात. 42जेव्हा येशू बारा वर्षांचे होते, तेव्हा रिवाजाप्रमाणे ते सणासाठी तिथे गेले. 43सण संपल्यानंतर येशूंचे आईवडील घरी परत जात असताना, येशू यरुशलेमातच मागे राहिले आहेत याची त्यांना कल्पना नव्हती. 44ते त्यांच्याच बरोबर येत आहेत, असा विचार करून एक दिवसाची वाट चालून गेले. तेव्हा त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे आणि मित्रमंडळींकडे त्याला शोधण्यास सुरुवात केली. 45पण त्यांना ते कुठेच सापडले नाही, म्हणून ते त्यांना शोधण्यासाठी परत यरुशलेमला गेले. 46तीन दिवसानंतर त्यांना ते मंदिराच्या परिसरात सापडले, शिक्षकांमध्ये बसून आणि त्यांचे ऐकून त्यांना ते प्रश्न विचारत होते. 47प्रत्येकजण जो त्यांचे ऐकत होता तो त्यांची बुद्धी आणि त्यांच्या उत्तरांनी आश्चर्यचकित झाला होता. 48त्यांना पाहून त्यांचे आईवडील विस्मित झाले. आईने विचारले, “मुला, तू आमच्याशी असा का वागलास? तुझे वडील आणि मी चिंतित होऊन तुला शोधत आहोत.”
49त्यांनी म्हटले, “तुम्ही माझा शोध का केला? मी माझ्या पित्याच्या घरामध्ये असावे,#2:49 किंवा पित्याच्या कामगिरीवर हे तुमच्या लक्षात कसे आले नाही?” 50परंतु ते त्यांना काय सांगत होते ते त्यांना समजले नाही.
51नंतर ते आईवडिलांबरोबर नासरेथला आले आणि त्यांच्या आज्ञेत राहिले. त्यांच्या आईने या सर्वगोष्टी आपल्या हृदयात साठवून ठेवल्या. 52आणि येशू ज्ञानाने व शरीराने परमेश्वराच्या व मनुष्याच्या कृपेत वाढले.

Iliyochaguliwa sasa

लूक 2: MRCV

Kuonyesha

Shirikisha

Nakili

None

Je, ungependa vivutio vyako vihifadhiwe kwenye vifaa vyako vyote? Jisajili au ingia