Chapa ya Youversion
Ikoni ya Utafutaji

मत्तय 5

5
डोंगरावरील प्रवचन
1लोकसमुदायाला पाहून येशू एका डोंगरावर चढला. तेथे खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. 2तेव्हा तो त्यांना शिकवू लागला.
खरी धन्यता
3“जे आत्म्याने दीन आहेत ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
4जे शोक करत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन केले जाईल.
5जे सौम्य ते धन्य, कारण त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.
6ज्यांना नीतिमत्त्वाची भूक व तहान लागलेली आहे ते धन्य, कारण ते तृप्त होतील.
7जे दयाळू ते धन्य, कारण त्यांना दया मिळेल.
8जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.
9जे शांती प्रस्थापित करण्यासाठी झटतात ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हटले जाईल.
10नीतिमत्त्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
11माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे खोटे आरोप करतील, तेव्हा तुम्ही धन्य. 12आनंद करा. उल्हास करा; कारण स्वर्गात तुमचे पारितोषिक महान आहे. तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही त्यांनी असाच छळ केला.
मीठ आणि प्रकाश
13तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? ते मीठ बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायांखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही.
14तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. 15दिवा पेटवून तो मापाखाली नव्हे तर दिवठणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. 16त्याचप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की, त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा.
जुने नियमशास्त्र व येशूची शिकवण
17नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ नष्ट करायला मी आलो आहे, असे समजू नका; मी नष्ट करायला नव्हे तर पूर्ण करायला आलो आहे. 18मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, आकाश व पृथ्वी नाहीशी होईपर्यंत व सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय, नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा नाहीशी होणार नाही.
19म्हणून जो कोणी ह्या लहान आज्ञांतील एखादी मोडील व त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील. पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात महान म्हणतील. 20मी तुम्हांला सांगतो, शास्त्री व परुशी ह्यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुम्हांला मुळीच प्रवेश मिळणार नाही.
राग व खून
21प्राचीन लोकांना जे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे, “खून करू नकोस आणि जो कोणी खून करील, त्याचा न्याय केला जाईल.’ 22मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी त्याच्या भावावर विनाकारण रागावेल, त्याचा न्याय केला जाईल. जो कोणी त्याच्या भावाला, “अरे मूर्खा’, असे म्हणेल, तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र ठरेल. तसेच जो कोणी त्याला ‘अरे महामूर्खा’, असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र ठरेल. 23तर मग तू आपले दान अर्पण करण्याकरता वेदीजवळ आणत असता तुझ्या भावाच्या मनात तुझ्याविरुद्ध काही आहे, असे तुला आठवले, 24तर तेथे वेदीपुढे तुझे दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम तुझ्या भावाबरोबर समेट कर व नंतर येऊन तुझे दान अर्पण कर.
25वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोपर्यंत त्याच्याशी समेट कर. नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल आणि तू तुरुंगात पडशील. 26मी तुला खातरीपूर्वक सांगतो, पैसा अन् पैसा फेडीपर्यंत तू त्यातून सुटणार नाहीस.
व्यभिचार
27‘व्यभिचार करू नकोस’, असे प्राचीन लोकांना जे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे. 28परंतु मी तुम्हांला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे वासनेने पाहतो, त्याने त्याच्या अंतःकरणात तिच्याशी व्यभिचार केलेलाच आहे. 29तुझा उजवा डोळा जर तुला पापास प्रवृत्त करत असेल, तर तो उपटून टाक; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवयाचा नाश व्हावा, हे तुझ्या हिताचे आहे. 30तुझा उजवा हात जर तुला पापास प्रवृत्त करत असेल, तर तो तोडून टाक; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात जावे, ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवयाचा नाश व्हावा, हे तुझ्या हिताचे आहे.
31असे सांगितले होते, “जो कोणी त्याची पत्नी टाकेल, त्याने तिला सूटपत्र द्यावे’, 32परंतु आता मी तुम्हांला सांगतो, जो कोणी त्याची पत्नी व्यभिचाराच्या कारणावाचून टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो, तो व्यभिचार करतो.
शपथा व खरेपणा
33तसेच ‘खोटी शपथ वाहू नकोस आणि प्रभूपुढे घेतलेल्या तुझ्या शपथा पूर्ण कर’, असे प्राचीन लोकांना सांगितलेले तुम्ही ऐकले आहे. 34मात्र मी आता तुम्हांला सांगतो, शपथ मुळीच वाहू नकोस, स्वर्गाची नको कारण ते देवाचे राजासन आहे; 35पृथ्वीचीही नको कारण ती त्याचे पादासन आहे आणि यरुशलेमची नको कारण ती थोर राजाची नगरी आहे. 36तुझ्या मस्तकाचीही शपथ वाहू नकोस कारण तू तुझा एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस. 37उलट तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, असे असावे. ह्यापेक्षा जे अधिक, ते वाइटाकडून येत असते.
सूड
38‘डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात’, असे जे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे. 39परंतु आता मी तुम्हांला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्यापुढे दुसरा गाल कर. 40जो कोणी तुझ्यावर फिर्याद करून तुझे शर्ट घेतो, त्याला तुझा कोटही घेऊ दे. 41जो कोणी तुझ्यावर बळजबरी करून तुला त्याचे सामान एक किलोमीटर वाहायला लावील त्याच्याबरोबर तू दोन किलोमीटर जा. 42जो तुझ्याजवळ मागतो, त्याला दे आणि जो तुझ्याकडून उसने घेऊ पाहतो, त्याला टाळू नकोस.
प्रेम व सर्वांगपूर्ण शील
43‘तू तुझ्या शेजाऱ्यावर प्रीती कर व तुझ्या शत्रूचा द्वेष कर’, असे जे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे. 44परंतु आता मी तुम्हांला सांगतो, तुम्ही तुमच्या शत्रूंवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. 45अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याची मुले व्हावेत; कारण तो दुर्जनांवर व सज्जनांवर सूर्य उदयास आणतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो. 46जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुम्हांला काय पारितोषिक मिळणार? जकातदारही तसेच करतात ना? 47तुम्ही केवळ तुमच्या बंधुजनांना प्रणाम करत असला तर विशेष ते काय करता? जकातदारही तसेच करतात ना? 48म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता पूर्ण आहे, तसे तुम्ही पूर्ण व्हा.

Iliyochaguliwa sasa

मत्तय 5: MACLBSI

Kuonyesha

Shirikisha

Nakili

None

Je, ungependa vivutio vyako vihifadhiwe kwenye vifaa vyako vyote? Jisajili au ingia