उत्पत्ती 7

7
1याहवेह नोआहला म्हणाले, “तू आणि तुझे पूर्ण कुटुंब तारवात जा, कारण या पिढीत तूच नीतिमान असल्याचे मला आढळले आहे. 2तुझ्याबरोबर शुद्ध अशा प्राण्यांच्या प्रत्येक जातीच्या नर व मादी अशा सात जोड्या आणि अशुद्ध प्राण्यांच्या प्रत्येक जातीची नर व मादी अशी एकच जोडी ने, 3आणि प्रत्येक जातीच्या पक्ष्याच्या नरमादीच्या सात जोड्या, म्हणजे पृथ्वीवर त्यांचे विविध प्रकार जिवंत राहतील. 4आजपासून बरोबर सात दिवसानंतर मी पृथ्वीवर चाळीस दिवस आणि चाळीस रात्र पाऊस पाडेन आणि मी निर्माण केलेल्या सर्व जिवंत प्राण्यांना पृथ्वीवरून नष्ट करून टाकेन.”
5याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे नोआहने सर्वकाही केले.
6जलप्रलय आला, तेव्हा नोआह सहाशे वर्षांचा होता. 7जलप्रलयापासून वाचण्यासाठी नोआह आणि त्याचे पुत्र आणि त्याची पत्नी, व पुत्रांच्या पत्नी यांनी तारवात प्रवेश केला. 8तारवात त्याच्याबरोबर शुद्ध आणि अशुद्ध पशू, पक्षी व सरपटणारे प्राणी होते. 9परमेश्वराने नोआहला आज्ञा दिल्याप्रमाणे ते सर्व प्राणी नर व मादी अशा जोडीने तारवात आले. 10आणि सात दिवसानंतर पृथ्वीवर जलप्रलय आला.
11नोआहच्या आयुष्याच्या सहाशेव्या वर्षात, दुसर्‍या महिन्याच्या सतराव्या दिवशी—त्याच दिवशी पृथ्वीच्या पोटातील सर्व झर्‍यातील पाणीही उफाळून वर आले आणि आकाशाची दारे उघडली. 12आणि पृथ्वीवर आकाशातून चाळीस दिवस आणि चाळीस रात्र पाऊस पडला.
13त्याच दिवशी नोआह आणि त्याचे पुत्र शेम, हाम व याफेथ, त्यांच्यासोबत त्याची पत्नी आणि त्याच्या मुलांच्या पत्नी तारवात गेले. 14त्यांच्याबरोबर प्रत्येक वन्यजातीचे प्राणी, सर्वप्रकारचे पाळीव पशू, जमिनीवर सरपटणारे प्राणी आणि प्रत्येक जातीचे, पंख असलेले सर्व पक्षी तारवात गेले. 15ज्यांच्यामध्ये जीवनाचा श्वास आहे, अशा प्रत्येक जातीच्या प्राण्यांची एकएक जोडी नोआहकडे आली आणि त्यांनी नोआहसोबत तारूत प्रवेश केला. 16नर व मादी असे ते परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जोडीजोडीने आले. मग याहवेहने त्यांना आत ठेवून तारवाचे दार बंद केले.
17जलप्रलय चाळीस दिवस चालू होता. यामुळे सर्व पृथ्वी पाण्याने व्यापून गेली आणि तारू पृथ्वीच्यावर पाण्यात तरंगू लागले. 18पाणी जमिनीवर वाढू लागले आणि तारू पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगू लागले. 19शेवटी पाणी इतके वाढले की, आकाशाखाली असलेले सर्व उंच पर्वतदेखील बुडून गेले. 20पाणी वाढले आणि पर्वतांना पंधरा हातापेक्षा#7:20 पंधरा हात अंदाजे 6.8 मीटर जास्त खोलीपर्यंत झाकले. 21पृथ्वीवर जिवंत असलेले सर्व प्राणी नष्ट झाले—त्यात आकाशातील पक्षी, पाळीव जनावरे, वन्यपशू, सरपटणारे प्राणी आणि अखिल मानवजात या सर्वांचा समावेश होता. 22कोरड्या जमिनीवर राहणारा, श्वास घेणारा प्रत्येक प्राणी मरण पावला. 23पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक सजिवांचा नाश झाला; मानव आणि प्राणी आणि सरपटणारे प्राणी आणि पक्षी पृथ्वीवरून नाहीसे झाले. फक्त नोआह आणि त्याच्यासोबत तारवात असलेलेच वाचले.
24पृथ्वी पाण्याच्या पुराखाली दीडशे दिवस राहिली.

Märk

Dela

Kopiera

None

Vill du ha dina höjdpunkter sparade på alla dina enheter? Registrera dig eller logga in